उजनी जलाशय : पर्यटनाचे नवे डेस्टिनेशन

उजनी जलाशय : पर्यटनाचे नवे डेस्टिनेशन
उजनी जलाशय : पर्यटनाचे नवे डेस्टिनेशन

सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटकांचा ओढा वाढत आहे. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे वाहतुकीचे जाळे यामुळे पंढरपूर, अक्कलकोट, सोलापूर आणि शेजारी जिल्ह्यांतील तुळजापूर, गाणगापूर या ठिकाणी वर्षाकाठी लाखो लोक भेट देतात. याच्या जोडीलाच उजनी धरणाच्या परिसरातही पर्यटकांना आकर्षित करता येऊ शकते. विस्तीर्ण जलाशयात नौकाविहार, स्थलांतरित परदेशी पक्ष्यांच्या विलोभनीय हालचाली पाहणे तसेच जलाशय परिसरात मिळणारे झणझणीत माशांचे जेवण पर्यटकांसाठी आनंद देणारे आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटनाचे हे नवे डेस्टिनेशन निर्माण होण्यासाठी जलाशय परिसरात तसे वातावरण आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची आवश्‍यकता आहे.

सोलापूर, नगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या उजनी धरणाला लागूनच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. तसेच दक्षिण व उत्तर भारताला जोडणारी रेल्वे वाहतूक कुर्डुवाडीपासून भिगवणपर्यंतच्या पट्ट्यातूनच गेली आहे. दळणवळणाच्या या सोयीसोबतच परिसरातील अनेक गोष्टी पर्यटनवाढीला मदत करणाऱ्या आहेत. उजनी जलाशयावर मुक्त विहार करणारे पक्षी, मच्छीमारांच्या नौका, अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे विलोभनीय प्रतिबिंब पाहण्याची मजा काही औरच आहे. यामुळे हे विस्तीर्ण जलाशय अलीकडच्या काळामध्ये पर्यटकांना आकर्षित करत आहे. धरण पाण्याने पूर्ण भरल्यानंतर तर राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून लोक येथे येतात. त्यामुळे अलीकडच्या काळात उजनी जलाशयाची ख्याती देशभर झाली आहे. याचा पर्यटनवाढीसाठी उपयोग करून घेण्याची गरज आहे.

स्थलांतरित पक्षी
उजनी जलाशयावर येणाऱ्या पक्ष्यांचे महत्त्व काही वेगळेच आहे. येथे आढळणारे जास्तीत जास्त पक्षी स्थलांतरित आहेत. फुगवट्यावर क्रौंच, रोहित, बदके, वेडर्स यांसह विविध प्रकारच्या पक्ष्यांचे वास्तव्य असते. यातील बहुतांश पक्षी रशियाच्या सैबेरिया या भागातून येतात तर काही पक्षी हिमालय, पूर्व युरोप आणि आफ्रिकेतून येतात. हिवाळी पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांना उजनीचा परिसर आणि येथे येणारा रोहित (फ्लेमिंगो) पक्षी आकर्षित करतो. रोहित पक्ष्याचे धरणात मुख्य वास्तव्य इंदापूर तालुक्‍यातील भिगवण, डिकसळ, पळसदेव दौंड तालुक्‍यातील खानोटा, राजेगाव करमाळा तालुक्‍यातील कात्रज, टाकळी या परिसरात असते. येथे मोठ्या संख्येने पक्षी येथे येण्याचे कारण म्हणजे उजनी जलाशयावर त्यांना खाद्य, संरक्षण आणि इतर अनुकूल गोष्टी आहेत.

विस्तीर्ण जलाशयावर नौकाविहार
उजनी जलाशयाचा पसारा सहा किमी रुंद तर 140 किमी लांब असा भीमानगर ते दौंड पट्ट्यापर्यंत प्रचंड मोठा आहे. त्यामुळे नौकाविहार करण्याचा एक अविस्मरणीय अनुभव येथे येतो. पक्षी पाहण्यासाठी येणारे अनेक पर्यटक किमान एकदा तरी नौकाविहार करतातच. तसेच अनेक मच्छीमार तरुण नौकाविहार आणि पक्षी पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून देतात. विस्तीर्ण जलाशयामुळे जलविहार करण्यासाठी येथे मोठी संधी आहे. जलविहार करत जलाशयावरील पक्ष्यांच्या विलोभनीय कवायती डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्याच असतात. अलीकडच्या काळात नौकाविहारासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व इंजिनचा वापर केला जात असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीनेही चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही. शासनाने शासकीय किंवा परवाना पद्धतीने बोटिंगची व्यवस्था करण्याची आवश्‍यकता आहे. सध्या काही तरुण व मच्छीमार मोडक्‍या तोडक्‍या स्वरूपात पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद देतात. पण याकडे रोजगारनिर्मितीचे मोठे साधन म्हणून पाहणे गरजेचे आहे.

झणझणीत मासे
पक्षी निरीक्षण आणि जलविहार करून थकलेल्या पर्यटकांचा कंटाळा घालविण्याचा उत्तम उपाय म्हणजे धरणाच्या परिसरात मिळणारे झणझणीत मासे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर उत्कृष्ट जेवण आणि सेवा देणारे अनेक ढाबे आहेत. या ढाबासंस्कृतीचा देखील पर्यटनवाढीसाठी उपयोग करता येऊ शकतो. राज्याच्या विविध भागांमधून मासे खाण्यासाठी येथे येणारी खाद्यप्रेमींच्या संख्याही कमी नाही. राज्यातील गोड्या पाण्यातील सर्वांत मोठी मासेमारी उजनी धरणात होते. अनेकजण खास मासे खाण्यासाठी येथे येतात. धरणाच्या काठावर अनेक ठिकाणी चवदार मासे बनवून मिळतात. टेंभुर्णी, भिगवण, इंदापूर, जेऊर ही ठिकाणे तर मत्स्य केंद्रे झाली आहेत. म्हणून नौकाविहार, पक्षी निरीक्षण आणि उत्कृष्ट मासे यामुळे उजनी धरण नावारूपास येऊ शकते.

कृषी पर्यटन
उजनी पट्ट्यात मत्स्य अभ्यास केंद्र, पक्षी निरीक्षण केंद्र, वनस्पती अभ्यास केंद्र आणि प्राणिसंग्रहालय उभारून पर्यटकांना इकडे आकर्षित करण्यासाठी वाव आहे. तसेच जलपर्यटन आणि कृषी पर्यटन या दृष्टीनेही या परिसराचा विचार होण्याची गरज आहे. कृषी पर्यटनासाठी मोठी संधी आहे. बॅकवॉटरमधील अनेक शेतकरी आपल्या आपल्या पद्धतीने वेगवेगळे प्रयोग करतात. शेतीतील हे प्रयोग पाहण्यासाठी, माहिती घेण्यासाठी अनेक लोक येत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र यासाठी सामूहिक प्रयत्न झाले तर कृषी पर्यटनात निश्‍चित वाढ होईल.

ऐतिहासिक वारसा
उजनी बॅकवॉटरमध्ये अनेक ऐतिहासिक मंदिरे, जुने वाडे, पूल आहेत. जे पर्यटकांना सध्या आकर्षित करत आहे. धरणातील पाणी कमी झाल्यावर उन्हाळ्यात काही दिवसच या वास्तू उघड्या असतात. हिवाळी पर्यटनासाठी आणि पक्षी पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. त्याचप्रमाणे उन्हाळी पर्यटनासाठीही लोकांना येथे आकर्षित करता येऊ शकते. त्यासाठी फुगवट्यातील या ऐतिहासिक वास्तूंचे मार्केटिंग व्हायला हवे.

पर्यटनवाढीसाठी...
पर्यटन विकास केंद्र, पक्षी निरीक्षण केंद्र, मत्स्य अभ्यास केंद्र, वनस्पती अभ्यास केंद्र व्हावे, प्राणिसंग्रहालय उभारावे, वृंदावन गार्डनच्या धर्तीवर विकास व्हावा, फुगवट्यापर्यंत वाहतुकीच्या साधनांची गरज, पक्षी निरीक्षणासाठी ठिकठिकाणी टॉवरची आवश्‍यकता, पर्यावरणाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्न व्हावेत, बॅकवॉटरमध्ये ठिकठिकाणी पर्यटकांना राहण्याची सोय करण्याची गरज, जुने वाडे, पूल, मंदिरे या ऐतिहासिक वास्तूंचा विकास व्हावा, शासकीय किंवा परवाना पद्धतीने बोटिंगची व्यवस्था गरजेची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com