नवीन वर्षात व्यवहार सुरळीत होतील - अनिल गोडबोले

नवीन वर्षात व्यवहार सुरळीत होतील - अनिल गोडबोले

सातारा - नोटाबंदीचा निर्णय हा देशहिताचा असून, नजीकच्या काळात याचे फायदे लोकांनाच मिळणार आहेत. सध्या चलन तुटवडा असल्याने नागरिकांना त्रास होत आहे; परंतु त्यावर डिजिटल बॅंकिंगचा सक्षम पर्याय उपलब्ध आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. तीस डिसेंबरनंतर नवीन वर्षात व्यवहार सुरळीत होतील, अशी आशा ‘आयडीबीआय’ बॅंकेचे उपमहाप्रबंधक अनिल गोडबोले यांनी व्यक्‍त केली.

श्री. गोडबोले यांनी ‘सकाळ’मधील संपादकीय सहकाऱ्यांशी नोटाबंदी, डिजिटल बॅंकिंग यासह आर्थिक क्षेत्राशी निगडित विविध विषयांवर आज बातचित केली. नोटाबंदीच्या अनुषंगाने नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांमध्ये उमटणाऱ्या प्रतिक्रिया, डिजिटल बॅंकिंगमधील अडचणी ‘सकाळ’च्या वतीने मांडण्यात आल्या. 

काळा पैसा, दहशतवादाला खोडा
श्री. गोडबोले म्हणाले, ‘‘नोटाबंदीचा निर्णय हा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण, मोठा निर्णय आहे. भारतीय अर्थकारण, बॅंकिंग क्षेत्रावर त्याचे परिणाम उमटत आहेत. या निर्णयामुळे काळा पैसा रद्द होणार आहे. टॅक्‍स न भरता तिजोरीत ठेवलेला पैसा हा काळा पैसा ठरतो. त्यानंतर सोने, रिअल इस्टेटमध्ये गुंतविलेला काही प्रमाणातील पैसा हा काळा असतो. आता तिजोरीत ठेवलेला काळा पैसा रद्द होईल. भविष्यात इ-प्रॉपर्टी, सोन्याबाबत नवीन धोरणे ठरविली जाणार असून, त्यातील काळ्या पैशालाही आळा बसेल. नोटाबंदीमुळे नक्षलवादी, दहशतवाद्यांचा पैसा एका रात्रीत शून्य ठरला आहे. नक्षलवादी लोक दरवर्षी १३०० कोटी रुपये वसूल करून ते जंगलात पुरून ठेवायचे, असे सांगितले जाते. हा पैसा निष्कामी ठरला आहे. इतर दहशतवादी संघटनांच्या बाबतीतही तेच झाले आहे.’’

त्रास होतोय; पण आशादायक
नोटांच्या तुटवड्यावर बोलताना श्री. गोडबोले म्हणाले, ‘‘सध्या नोटांना कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याने तुटवडा भासतोय. त्याचा लोकांना त्रास होतोय; पण त्याचा परिणाम सकारात्मक होईल. नोटाबंदी निर्णयाला अर्थतज्ज्ञांनीही पाठिंबा दिला आहे. एका अर्थतज्ज्ञांच्या मते दीड लाख कोटीचा काळा पैसा रद्द होणार आहे. नोटांचा भासणारा तुटवडा हा डिजिटल बॅंकिंग पर्यायाकडे वळल्यास लोकांना त्रास कमी होईल. नोटांची छपाई आधी करणे शक्‍य होते. मात्र, तसे केले असते तर निर्णयाची गुप्तता राहिली नसती.’’

डिजिटलची पंचसूत्री
डिजिटल बॅंकिंगमध्ये इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल ॲप्लिकेशन्स, स्वाइप मशिन, मोबाइल पेमेंट, चेक हे पाच पर्याय वापरून चलन तुटवड्यावर मात करू शकतो. त्याचा वापर कसा करावा, याचीही माहिती देऊन श्री. गोडबोले म्हणाले, ‘‘स्वाइप मशिन सध्या कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. या पर्यायांवर पूर्वी दीड ते तीन टक्‍के चार्ज आकारले जात होते. सध्या ते एक ते पावणेदोन टक्‍के कर आकारले जात आहेत. भविष्यात डिजिटल व्यवहार वाढल्यास ते करही कमी होत जातील. लहान व्यावसायिक कर भरण्यास घाबरत नाहीत; परंतु त्या संबंधातील प्रक्रियांना घाबरतात. मात्र, त्यावरही उपाय निघण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे लहान व्यावसायिकांनीही डिजिटल पर्यायांकडे वळले पाहिजे. डिजिटल व्यवहारात सुरक्षितता हा विषय महत्त्वाचा असल्याने ‘पिन’ नंबर कोणालाही सांगणे टाळणे आवश्‍यक आहे.’’

बॅंकिंग व्यवहार वाढणार
देशात ९६ टक्‍के लोकांची विविध बॅंकांमध्ये खाती आहेत; परंतु त्यातील २६ टक्‍के खाती ही कार्यरत आहेत. २८ टक्‍के लोक बॅंकेत कमी प्रमाणात व्यवहार करतात. चार टक्‍के लोकांची बॅंकेत खाती नसून, त्यांची खाती काढण्यासाठी बॅंका शिबिरे घेत आहेत. बॅंकिंग व्यवहार वाढविण्यासाठी भविष्यात बॅंकांमार्फतही नवनवे पर्याय पुढे केले जातील. नोटाबंदीमुळे निश्‍चित लोकांचा फायदा होईल. ३० डिसेंबरपर्यंत लोकांना त्रास होईल; परंतु नवीन वर्षात पुन्हा व्यवहार सुधारण्यास मदत होईल, अशी आशाही श्री. गोडबोले यांनी व्यक्‍त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com