निपाणी : बाजारात विक्रीसाठी आलेला आंबा

'कॅल्शियम कार्बाइड'ने पिकविलेला आंबा बाजारात!
आंबा
आंबाsakal

निपाणी: आंबा फळांचा राजा असला तरी वाढती महागाई आणि नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या फळांचे चढे दर आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना नाईलाजाने कृत्रिमरीत्या पिकविलेली फळे बाजारातून घ्यावी लागत आहेत. कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यासाठी आरोग्यास घातक असलेल्या 'कॅल्शियम कार्बाइड'चा वापर केला जात असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये दशहरी, लालपरी, तोतापुरी, पायरी, लंगडा, हापूस, केशर आदी विविध जातीच्या आंब्यांचा यामध्ये समावेश आहे. शहरातील मुख्य बाजार, सर्व प्रमुख रस्ते व चौका-चौकात आणि हातगाडीवर विक्री सुरू असलेले हे आंबे बहुतांशी कृत्रिमरित्या पिकविलेले आहेत. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने नफा मिळविण्यासाठी झटपट आंबे पिकवून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यावर व्यापाऱ्यांचा भर आहे.

यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा सर्रास वापर केला जात आहे. अन्न सुरक्षा कायद्यान्वये फळे पिकविण्यासाठी 'कॅल्शिअम कार्बाईड'चा वापर करण्यास मनाई आहे. मात्र नैसर्गिक पद्धतीने फळे पिकविण्यासाठी लागणारा कालावधी व त्या तुलनेत ग्राहकांकडून मिळणारा भाव यात फरक आहे. दर परवडणारा नसल्याने अनेक व्यापारी छुप्यापद्धतीने कार्बाइडचा वापर करून आंबे पिकवित आहेत. शहरात अनेकांकडून सध्या नैसर्गिक पद्धतीने पिकविलेले आंबे घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यांची २५० ते ६०० रुपयांप्रमाणे विक्री होत आहेत. दुसरीकडे कृत्रिमरीत्या पिकविलेले आंबे २०० ते ४०० रुपये प्रति डझनप्रमाणे मिळत आहेत.

जागरुकता महत्त्वाची

कॅल्शियम कार्बाइडने पिकविलेल्या आंब्यांमुळे घसा खवखवणे, जीभ व तोंड येणे, कॅन्सर, किडनीचे विकार, अल्सर, डायरिया, जळजळ असे आजार होण्याची शक्यता असते. अन्न सुरक्षा कायदा २००६ नुसार यावर बंदी घातलेली आहे. दरम्यान सध्याच्या काळात आरोग्य विषयक जागरुक असणे गरजेचे असल्याने नागरिकांनी आंबे खरेदी करताना आपण आजाराला निमंत्रण तर देत नाही ना, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

असा ओळखा फरक!

नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवण्यासाठी किमान आठ दिवस लागतात. ती दिसायला आकर्षक नसली तरी मनमोहक वास व चव चांगली असते. तर कार्बाइडने केवळ १५ तासात आंबे पिकतात. ते दिसायला पिवळे व आकर्षक असतात. मात्र त्यातून लसणासारखा वास येतो व गरम वाफ निघते.

'आंबे व इतर उन्हाळी फळांचा हंगाम कमी-जास्त वेळाने सुरू होत आहे. तरीही या काळात आंबे कृत्रिमपरित्या पिकवून बाजारात आणले जात आहेत. अशा व्यापा-यांबाबत तक्रार आल्यास त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. त्यासाठी नागरिकांनीही जागरुकता बाळगणे आवश्यक आहे.'

-डॉ. राजेंद्र भालके, अन्न, औषध व आहार निरीक्षक, बेळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com