‘निर्भया’ पथक राज्यापुढे आदर्श ठरेल!

‘निर्भया’ पथक राज्यापुढे आदर्श ठरेल!

सांगलीत दोन वर्षांपूर्वी सावकारांविरुद्ध पोलिसांनी सुरू केलेली मोहीम राज्यभर चर्चेत आली. २०० सावकारांवर कारवाई करण्यात आली. सावकारांनी लाटलेली जमीन कर्जदारांना परत मिळवून दिली. सावकारीविरुद्धचा ‘सांगली पॅटर्न’ चर्चेत आला. त्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी हैदराबादच्या धर्तीवर महिला सुरक्षेसाठी सुरू केलेले ‘निर्भया’ पथक आदर्श ठरू शकेल. 

विश्‍वास नांगरे-पाटील यांनी कोल्हापूर परीक्षेत्राचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हैदराबादच्या धर्तीवर ‘निर्भया’ पथकाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. हैदराबादमध्ये तरुणी आणि महिलांच्या छेडछाडीविरोधात ‘सिक्‍युअर अँड हर इन्शुअर’ अर्थात ‘she’ टीम जोरदार काम करते. परिक्षेत्रातील महिला पोलिस अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन प्रशिक्षण घेतले. त्यानंतर जिल्ह्यातील पोलिसांना त्यांनी प्रशिक्षण दिले. निर्भया पथकाचे काम तीन महिन्यापासून सुरू झाले आहे. या पथकाचे कामकाज जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोचवून त्यांच्यामध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी ‘टूर द फ्रान्स’च्या धर्तीवर अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी ६३३ किलोमीटर अंतर कापत ‘निर्भया’ सायकल रॅली काढली.

प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन महिन्यांपासून ‘निर्भया’ पथके कार्यरत आहेत. साध्या वेशातील अधिकारी, महिला व पुरुष पोलिस कर्मचारी यांनी जिल्ह्यातील छेडछाडीचे ‘हॉट स्पॉट’ शोधून काढले आहेत. रोज हॉट स्पॉट आणि इतर ठिकाणी हे पथक फिरून टेहळणी करते. गरज पडल्यास छुप्या कॅमेऱ्यात हालचाली टिपल्या जातात. संबंधित टवाळखोरांना ताब्यात घेतले जाते. ‘बीपी ॲक्‍ट’प्रमाणे कारवाई केली जाते. पोलिस ठाण्यात इतर गुन्ह्याप्रमाणे त्यांचे रेकॉर्ड बनवले जाते. नंतर संबंधितांना तारीख देऊन समुपदेशनाला बोलावले जाते. छेडछाड करणारी मुले लहान असतील तर पालकांना बोलावून समज दिली जाते. दुसऱ्यांदा कारवाईमध्ये जर कोणी सापडला तर कोर्टात खटला पाठवला जातो.

‘निर्भया’ पथकाचे काम छुप्या पद्धतीने सुरू असल्यामुळे टवाळखोर आपोआपच जाळ्यात सापडतात. पूर्वीच्या ‘दामिनी’ पथकापेक्षा वेगळ्या पद्धतीने पथकाचे कामकाज सुरू आहे. पथकाच्या कामकाजाचा आढावा रोज घेतला जातो. सध्या पथकासमोर येत असलेल्या अडचणी आणि त्रुटी शोधून आणखी सक्षमपणे कामकाज केल्यास छेडछाडीविरोधातील ही ‘पथदर्शी’ मोहीम राज्यात यशस्वीपणे राबवली जाऊ शकेल.

महिलांच्या तक्रारी नोंदवून घेण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदाराशेजारी महिला पोलिस कर्मचारी नेमण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. तक्रार नोंदवताना महिला कर्मचारी असेल तर थोडाफार धीर मिळू शकतो हा यामागचा उद्देश आहे. महिलांविषयक गुन्ह्याचा तपास महिला अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडे द्यावा, याबाबत मध्यंतरी निर्णय घेण्यात आला. त्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्‍यक आहे. प्रत्येक जिल्ह्यात फक्त महिला अधिकारी व कर्मचारी यांचेच एक ठाणे कार्यरत ठेवण्याबाबत दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घोषणा केली होती, त्याचीही अंमलबजावणी आवश्‍यक आहे.

हेल्पलाईन, प्रतिसाद ॲप
महिलांच्या तक्रारीविषयी प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन (१०९१) कार्यरत आहे. या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करून मदत घेता येईल. व्हॉटस्‌ ॲप (९७३०९२८९५८) वरही तक्रार करता येईल. तसेच राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या कल्पनेतून सामान्य जनता, महिला, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, मुले यांच्यासाठी ‘प्रतिसाद’ हे एकच मोबाईल ॲप कार्यरत आहे. ॲन्ड्रॉईड मोबाईलमध्ये pratisad (ask) ॲप घेऊन नंबर रजिस्टर करा. ॲपमध्ये आवश्‍यक ती माहिती भरा. त्यानंतर पोलिस मदतीसाठी त्यामधील लाल रंगाच्या आयकॉनवर क्‍लिक केल्यास जवळच्या पोलिस ठाण्याकडून तत्काळ मदत मिळेल.

तज्ज्ञ म्हणतात

गेल्या वर्षात ९८१ गुन्ह्यांपैकी ६३० गुन्हे उघड झाले. गुन्हे थोडे वाढले तसेच उघड होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गुन्ह्यातील शिक्षांचे प्रमाण २७ टक्के आहे. येत्या काही दिवसांत ते ५० टक्‍क्‍यांवर नेण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येईल, असा एकही प्रसंग घडलेला नाही. 
-प्रणय अशोक, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक

इंग्रजांच्या काळातील कायदे आजही त्याच पद्धतीने राबवले जात आहेत. त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे. जनतेने पोलिसांचा आदर राखला पाहिजे; तसेच पोलिसांनीही नागरिक समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे याचे भान ठेवून त्यांचा सन्मान राखत काम केले पाहिजे. 
-प्यारे जमादार, सचिव, निवृत्त पोलिस कल्याण संस्था

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. मोबाइल कॉल डिटेल्स तपास कामातील महत्त्वाचा घटक बनत आहे. सायबर गुन्ह्यांचा तपास कशा पद्धतीने करायचा, त्याचे कौशल्यपूर्ण शिक्षण प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला मिळेल याची व्यवस्था गृह विभागाने करण्याची आवश्‍यकता निर्माण झालेली आहे.
-किशोर घाटगे, खजानीस, निवृत्त पोलिस कल्याण संस्था

दिवसातील बारा तासांहून अधिक काळ करावे लागणारे काम, त्यातून निर्माण होणारा ताणतणाव यांमुळे पोलिस कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. पोलिस प्रशासनाकडून निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा दिली जावी. 
-विठ्ठल व्हनगुत्ते, निवृत्त पोलिस हवालदार

पोलिस अधिकारी राज्यात अनेक ठिकाणी सेवा बजावतो. निवृत्तीनंतर अनेक तपासांतर्गत न्यायालयीन खटल्यांत साक्षीसाठी राज्यात अनेक ठिकाणी जावे लागते. यासाठी त्यांना फक्त प्रवास खर्चाची रक्कम तातडीने दिली जाते; मात्र निवास व जेवणाचे पैसे मिळण्यास विलंब होतो. ही रक्कम तातडीने मिळण्यासाठी नियोजन करावे.
-विजयकुमार तुप्पद, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक

पोलिस दलात कर्तव्य बजावताना राष्ट्रपती पदक मिळवले. निवृत्त होऊन तीन वर्षे उलटून गेली तरी ओळखपत्र मिळालेले नाही. त्यामुळे शासकीय लाभापासून वंचित राहावे लागले. असे अनेक कर्मचारी, अधिकारी आहेत. याचा विचार प्रशासनाने करून सेवा बजावताना उल्लेखनीय काम करणाऱ्यांना तातडीने ओळखपत्र द्यावे.
-लक्ष्मण हवालदार, सदस्य, निवृत्त पोलिस कल्याण संस्था

शासनाच्या विविध समित्यांचे कामकाज फक्त कागदोपत्री चालते. काही समित्यांवर पोलिस अधीक्षक पदाधिकारी, सदस्य आहेत. अधीक्षकांनी समितीचे कामकाज व्यवस्थित चालेल यादृष्टीने प्रयत्न करावेत. निर्भया पथक जिल्ह्यात सुरू केले आहे. त्याच्या कामकाजात आलेली उदासीनता दूर करावी. महिलांच्या समस्यासाठी असलेली हेल्पलाईन सक्षम करावी.
- डॉ. ज्ञानचंद्र पाटील 

‘बेसिक पोलिसिंग’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. पोलिसांनी नागरिकांशी समन्वय साधला तर पाहिजेच; परंतु ‘पोलिसिंग’ विसरले जाऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. शहरातील उच्चशिक्षित व चांगल्या लोकांच्या समूहाबरोबर राहण्यापेक्षा तळागाळापर्यंत पोलिस पोहोचले पाहिजे. तिथेपर्यंत त्यांचे ‘नेटवर्क’ निर्माण झाले पाहिजे.
- प्रा. आर. बी. शिंदे

सर्वोच्च न्यायालयातील सात न्यायाधीशांच्या ‘कॉन्स्टिट्यूशनल बेंच’ ने २०१५ मध्ये ‘एफआयआर’ बद्दल एक न्यायनिवाडा दिला आहे. त्यानुसार पोलिस ठाण्यात कोणी तक्रार केली तर सात दिवसांत त्यावर चौकशी करून निर्गती आवश्‍यक आहे. तसे न झाल्यास संबंधित पोलिसांवर कारवाईच्या तरतुदीची सर्वत्र अंमलबजावणी व्हावी. 
- ॲड. दत्तात्रय जाधव

गोवा बनावटीच्या दारूच्या महाराष्ट्रभर विनापरवाना होणाऱ्या वाहतुकीचे सिंधुदुर्ग हे प्रवेशद्वार आहे. बनावट दारूची वाहतूक सातत्याने होते. त्यामुळे लाखो संसार उद्‌ध्वस्त होतात. शासनाचा करोडोंचा महसूल बुडतो. सिंधुदुर्गात दारू वाहतूक रोखण्यासाठी स्वतंत्र, भ्रष्टाचारमुक्त, प्रभावी पथक नेमावे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे.
- संजू शिरोडकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com