"ती'ची गोष्ट छोटी... डोंगराएवढी 

सुजाता वठारे - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 7 मार्च 2017

जागतिक महिलादिनी पुरुषी मक्तेदारीच्या क्षेत्रात झेंडा रोवणाऱ्या महिलांचा गौरव होताना कुटुंबासाठी खस्ता खाणाऱ्या माऊलीचं मोल खचितही कमी होत नाही. अशा दोन महिलांची... गोष्ट छोटी, डोंगराएवढी. 

सोलापूर - नवरा-बायको ही संसाराच्या रथाची दोन चाकं... एक मोडून पडलं, नियतीच्या फेऱ्यात अडकून फिरायचं थांबलं की एकावर असह्य भार पडतो. ते चाक महिलारूपी असेल तर संकटांचा फेरा महाभयानकच. तरी ती थांबत नाही. नियतीशी धडका देत घरट्याला ऊब देते. जागतिक महिलादिनी पुरुषी मक्तेदारीच्या क्षेत्रात झेंडा रोवणाऱ्या महिलांचा गौरव होताना कुटुंबासाठी खस्ता खाणाऱ्या माऊलीचं मोल खचितही कमी होत नाही. अशा दोन महिलांची... गोष्ट छोटी, डोंगराएवढी. 

निर्मला सुभाषचंद्र वाले. वय 55. शिक्षण आठवीपर्यंत. होटगी रोडवर पोळी भाजी केंद्र. लग्नानंतर व्यसनी पतीमुळे संकटांचा फेरा सुरू झाला. सुभाषचंद्र रिक्षा चालवायचे. रिक्षा थांबली अन्‌ निर्मलांच्या खांद्यावर संसाराचा भार आला. बहीण-भावाच्या साथीने संसार ओढत राहिल्या. बाळंतपणही त्यांनीच केलं. मुलाच्या जन्मानंतर "दुःख जाईल, सुख येईल' ही आशादेखील फोल ठरली. पतीला संसारात रसच नव्हता. त्या बहिणीच्या घरी आल्या, स्वबळावर उभं रहायचं ठरवलं. डॉ. वामन देगावकर यांनी सेविका म्हणून ज्ञानप्रबोधिनी संस्थेत काम दिले. त्यातून मुलाचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. स्वयंपाकाची कामे करत त्याला वाढवलं, परिस्थितीच्या चटक्‍यांतून त्याला बाजूला हॉस्टेलवर ठेवलं. त्याचा विरह सहन व्हायचा नाही, पण सकाळ-संध्याकाळ त्या स्वयंपाक कामात गुंतवून घ्यायच्या. चकली उद्योग करायच्या. नंतर पोळीभाजी कॉर्नर काढला. सात वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले. दहावीनंतर मुलगा पॉलिटेक्‍निकला गेला. आज त्याचा भागीदारीत व्यवसाय आहे. परिस्थिती सुधारतेय, मात्र त्या थांबल्या नाहीत. होटगी रोडवर पोळी भाजी कॉर्नर पुन्हा सुरू केलेय. वयोमानानुसार फार धडपड होत नाही, पण स्वावलंबी जगण्यात त्यांना समाधान मिळतं. मुलाचा जम बसला की सुनेच्या हातची गरम भाकरी खाण्याचं स्वप्न त्या बघतात. त्यानंतर त्या रुग्णसेवेला वाहून घेणार आहेत. 

शांताबाई बसराप्पा सिद्धगवळी. वय 60. सहा दीर, जावा, सासूसासरे अशा भरल्या घरात लग्न झालं. घर माणसांनी अन्‌ दारिद्रयाने भरलेलं. देव घेऊन भविष्य सांगून पोट कसं भरेल. हातातोंडाचा मेळ लागेना. दोन मुले, तीन मुली झाल्या. संसार चालवायला गवंड्याच्या हाताखाली काम सुरू केलं. काही वर्षाच्या अंतरानं एक मुलगा तापानं, दुसरा कुत्रं चावल्याचं निमित्त होऊन वारला. त्या खचल्या, पण पोटच्या पोरींसाठी जिद्दीनं उभ्या राहिल्या. पतीच्या निधनाने मुलींना शिक्षण देणं जमलं नाही, पण त्यांना उघड्यावर पाडलं नाही. गवंडीकामावर तोल जाऊन पडल्याने मणका दुखावला. त्यानंतर धुणीभांडी सुरू केली. मुलींचं लग्न यथाशक्‍ती करून दिलं. तिघी संसारात रमल्या. त्या माहेरी येतात तेव्हा कष्टाच्या पैशातून माहेरपण, नातवंडांना कपडालत्ता न चुकता करतात. माऊलीनं आजही काम थांबवलं नाही. शेवटच्या श्‍वासापर्यंत त्या झटणार आहेत, मुलींच्या सुखासाठी, सन्मानासाठी. 

Web Title: nirmala wale story