निशिकांत पाटील, सागर खोत भाजपमध्ये जाणार 

निशिकांत पाटील, सागर खोत भाजपमध्ये जाणार 

सांगली - इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांचा भाजप प्रवेश लवकरच होणार असल्याचे समजते. त्यांच्याबरोबरच इस्लामपुरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील खोत समर्थक नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र स्वतः सदाभाऊ तूर्त संघटना सोडणार नाहीत. येत्या पंधरा दिवसांतच पक्षप्रवेशाचा मुहूर्त साधला जायची शक्‍यता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कार्यक्रमाची वेळ मागण्यात आली आहे. खासदार राजू शेट्टी आणि मंत्री खोत यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच असून पुढील आठवड्यात संघटनेची कार्यकारिणीची बैठक वादळी होण्याची शक्‍यता आहे. 

येत्या शुक्रवारी मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा आहे; मात्र त्यात पुरेसा वेळ मिळू शकत नसल्याने हा पक्षप्रवेश लांबणीवर पडला आहे. सागर खोत यांना बागणी गटातून जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली होती. यावर शेट्टींनीच "घराणेशाही'ची टीका केली. येथून दोघांमधील राजकीय जुगलबंदी वाढत गेली. मंत्रिपदाला जागून सदाभाऊ दररोज सरकारची पाठराखण करतात, असे शेट्टींना वाटते, तर ते एकटेच सरकारविरोधात तुटून पडत आहेत. अर्थात सदाभाऊंबद्दल शेट्टींना मत्सर वाटतो की काय, अशी दुसऱ्याबाजूला टीका होऊ लागली. कर्जमुक्तीसाठीची संघटनेचा मार्च असो की कोल्हापुरातील मेळावा या प्रत्येक ठिकाणी दोघांमधील मतभेदांचेच दर्शन झाले. फेसबूकवरही या दोघांच्या समर्थकांमध्ये आभासी युद्ध रंगले आहे. शेट्टींनी बगलबच्च्यांना आवरावे अन्यथा मी त्यांचा बंदोबस्त करीन, असे विधान करून दोन दिवसांपूर्वी खोत यांनी शेट्टींना डिवचले. त्यावर शेट्टींनी पलटवार करताना,""संघटनेत बगलबच्चे नसतात, कार्यकर्ते असतात. बगलबच्चे सत्तेत तयार होतात.'' असा प्रतिहल्ला केला. या सर्व पार्श्‍वभूमीवर सागर खोत यांनी भाजप प्रवेशाची तयारी चालविली असल्याने संघटनेतील वाद आणखी किती ताणले जाणार, अशी चर्चा सुरू आहे. निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. अर्थात ते भाजपच्या कोट्यातील नगराध्यक्ष असे गृहीतच धरले गेले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाची औपचारिकताच असेल. अर्थात या आघाडीतील किती नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतात यावर या आघाडीतील निशिकांत पाटील यांचेही स्थान ठरणार आहे. सागर खोत यांचा भाजप प्रवेश संघटनेसाठी दणदणीत इशारा आहे. त्यांचा पक्ष प्रवेश झालाच तर खोत यांच्यासाठी संघटनेशी जुळवून घ्यायचे अखेरचे दोर कापले जातील हे निश्‍चित. निशिकांत व सागर यांच्या पक्षप्रवेशाबाबत खात्रीलायक सूत्रांनी संकेत दिले आहेत. 

शेट्टींपुढे आव्हान; पण सदाभाऊंचे काय? 
शेट्टी ज्या मतदारसंघातून खासदार होतात त्यात वाळवा व शिराळा तालुक्‍यातील मताधिक्‍य फार महत्त्वाचे आहे. सागर खोत यांच्यासह तरुणवर्ग भाजमध्ये जाण्याने शेट्टींना मदत करणारी तरुण कार्यकर्त्यांची फळी जाणे संघटनेला परवडणारे नाही. तसेच स्वाभिमानीच्या बैठकीत सदाभाऊंच्या मंत्रिपदावर "सांगोपांग' चर्चा होऊ शकते. त्यामुळे शेट्टींनी जर सदाभाऊंना मंत्रिपद सोडा म्हटले तर सदाभाऊ थेट भाजपमध्येच जातील, अशीही शक्‍यता वर्तविली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com