अंगणवाडी बांधकामासाठी आता साडेआठ लाख 

download.jpg
download.jpg

सोलापूर : अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी सहा लाख रुपये मंजूर केले होते. त्यात 12 टक्के जीएसटीचा समावेश होता. त्यामुळे अंगणवाडीचे बांधकाम करण्याकडे ठेकेदारांनी पूर्णपणे पाठ फिरवली होती. सहा लाखामध्ये इमारत बांधणे परवडणारे नसल्यामुळे मागील वर्षी अंगणवाड्यांची बांधकामे रखडली होती. आता मात्र, त्यासाठी साडेआठ लाख रुपये देण्याचा निर्णय झाल्याने बांधकामांना गती येणार आहे. 

अंगणवाडीच्या इमारतीच्या बांधकामाचा आराखडा 15 जानेवारी 2010 च्या निर्णयान्वये निश्‍चित केला आहे. बिगर आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडीच्या बांधकामासाठी सहा लाख तर आदिवासी भागातील अंगणवाड्यांसाठी साडेसहा लाख रुपये निश्‍चित केले होते. मात्र, मागील वर्षापासून त्यावर 12 टक्के जीएसटी लागू झाली होती. जीएसटीमुळे ठेकेदारांना बांधकाम करणे परवडत नव्हते. त्यामुळे अंगणवाडीच्या बांधकामासाठी टाकलेल्या निविदांना प्रतिसादच मिळत नव्हता. परिणामी अंगणवाड्यांची बांधकामे रखडली होती.

अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक नियोजन, वित्त आयोग, नाबार्ड, अल्पसंख्याक विभागाकडून निधी उपलब्ध होत असतो. त्याच्या माध्यमातून बांधकाम केले जाते. बांधकाम साहित्यामध्येही मोठी वाढ झाल्याने यासाठीच्या निधीमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे महिला व बालविकास विभागाने बांधकामाच्या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बिगर आदिवासी क्षेत्रातील एका अंगणवाडीच्या बांधकामासाठी जीएसटीसह साडेआठ लाख तर आदिवासी भागातील बांधकामासाठी जीएसटीसह नऊ लाख 40 हजार रुपये मिळणार आहेत. 

त्यांना जुनेच दर 
यापूर्वी मंजुरी दिलेल्या किंवा अपूर्ण असलेल्या बांधकामासाठी जुनेच दर लागू राहतील. 2018-19 या आर्थिक वर्षात मंजुरी दिलेल्या बांधकामासाठी नवीन दर लागू राहतील, असेही महिला व बालकल्याण विभागाने म्हटले आहे. 

''जिल्ह्यातील जवळपास 600 ते 800 अंगणवाड्यांच्या इमारतींचे बांधकाम अद्यापही झालेले नाही. बांधकामासाठी वाढीव निधी मिळावा याची मागणी केली होती. आमच्या मागणीला यश आले आहे. आता सगळ्या इमारतींचे बांधकाम करता येणे शक्‍य आहे.''
- रजनी देशमुख, सभापती, महिला व बालकल्याण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com