ट्रक मोटार अपघात पुण्यातील महिला ठार ; दोघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

राधानगरी मांजर खिंड येथे ट्रक आणि मोटारीचा अपघात झाला. त्यात मोटारीतील एक महिला ठार झाली आहे. विजयालक्ष्मी वसंत घुले (वय 59, रा. विश्रांतवाडी, पुणे) असे त्यांचे नाव आहे. 

कोल्हापूर : राधानगरी मांजर खिंड येथे ट्रक आणि मोटारीचा अपघात झाला. त्यात मोटारीतील एक महिला ठार झाली आहे. विजयालक्ष्मी वसंत घुले (वय 59, रा. विश्रांतवाडी, पुणे) असे त्यांचे नाव आहे. अपघतात अन्य दोघे जण जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वसंत कृष्णाजी घुले हे विश्रांतवाडी पुणे येथे कुटुंबासोबत राहतात. ते सेवानिृत्त कर्मचारी आहेत. त्यांचा मुलगा पुण्यातील नामवंत कंपनीत नोकरीस आहे. उन्हाळी सुट्टी निमित्त ते कुटुंबातील आठ सदस्यांसोबत मोटारीतून गोव्याला जात होते. दुपारी राधानगरी येथील मांजरखिंड येथे समोरून येणाऱ्या ट्रकचा आणि त्यांच्या मोटारीचा अपघात झाला. यात घुले यांची पत्नी विजयालक्ष्मी घुले, स्नुषा योगिता घुले आणि नातू वेंदात घुले हे तिघे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यातील विजयालक्ष्मी घुले यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले. योगिता घुले व वेंदात घुले यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघाताची नोंद करण्याचे काम राधानगरी पोलिस ठाण्यात सुरू होते.