गव्याच्या हल्ल्यात एक ठार; पत्रकार गंभीर जखमी

संभाजी गंडमाळे
शुक्रवार, 12 मे 2017

आकुर्डे येथील तीन तरुण वैरण म्हणून उसाचा पाला काढण्यासाठी उसात गेले होते. गव्याच्या कळपातून चुकलेल्या भल्या मोठ्या गव्याने त्या तिघांपैकी अनिल पोवार या तरुणावर हल्ला केला.

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील भैरुचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारात आज (शुक्रवार) सकाळी उसाचा पाला काढायला गेलेल्या शेतकरी तरुणांवर गव्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्यात एक शेतकरी जागीच ठार झाला, तर या दुर्घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले गारगोटी येथील कॅमेरामन - पत्रकार रघुनाथ शिंदे त्याच गव्याच्या हल्यात गंभीर जखमी झाले.

आकुर्डे येथील तीन तरुण वैरण म्हणून उसाचा पाला काढण्यासाठी उसात गेले होते. गव्याच्या कळपातून चुकलेल्या भल्या मोठ्या गव्याने त्या तिघांपैकी अनिल पोवार या तरुणावर हल्ला केला. पोटात शिंगे घुसून रक्तस्त्राव झाल्याने पोवार हा जागीच ठार झाला. जीव वाचवून पळालेल्या दोघांनी ग्रामस्थाना या दुर्घटनेची माहिती दिली.

हे वृत्त कळताच तात्काळ 'बी न्यूज़'चे रघुनाथ शिंदेही घटनास्थळी येऊन शूटिंग करत होते बांधावर उभा राहून गव्याचे शूटिंग करत असताना मागे फिरून गव्याने शिंदे यांना थेट धडक देऊन 10-12 फुटांवर उडवून भिरकावून दिले. शिंदे यांच्या पोटात एक शिंग घुसल्याने आतड़ी बाहेर आली आणि दुसरे शिंग मांडीत घुसले. गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांना गारगोटी येथे प्रथमोपचार करून तातडीने कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.