पोवई नाक्‍यावर एकेरी वाहतूक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

सातारा - पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोवई नाक्‍यावर जाण्या- येण्यासाठी एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. 

सातारा - पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोवई नाक्‍यावर जाण्या- येण्यासाठी एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. 

पोवई नाक्‍यावर गेल्या काही महिन्यांपासून ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. त्यामुळे पोवई नाक्‍यावरून होणारी वाहतूक वळवावी लागली आहे. राजपथाचा पोवई नाक्‍यावरून मराठा खानावळीपासून राजवाड्याकडे जाण्यासाठी वापर होत होता, तसेच मरिआई कॉम्लेक्‍सच्या शेजारून मोनार्क हॉटेलकडे जाणारा मार्ग येण्या व जाण्यासाठी वापरला जात होता. या रस्त्याची रुंदी कमी आहे. त्यामुळे त्यावरून दोन्ही बाजूने जाणारी वाहने आल्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती, तसेच बढीये पेट्रोल पंपापासून शाहूनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरही वाहतूक असते. त्यामुळे रस्ता ओलांडताना होणारा विलंब व दोन्ही बाजूची वाहने यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत होती. त्याचबरोबर मराठा खानावळीपासूनही गर्दी नसल्यावर राजवाड्याकडून पोवईनाक्‍याकडे जाणारे वाहनधारक त्याचा वापर करत होते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत होता. 

वाहतूक कोंडीची ही समस्या दूर करण्यासाठी या दोन्ही मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. त्यानुसार आयडीबीआय बॅंक ते मराठा खानावळ या मार्गाचा राजवाड्याकडून पोवईनाक्‍याकडे जाण्यासाठीच उपयोग करायचा आहे. राजवाड्याकडून येणाऱ्या व वाढे, कोरेगाव, रहिमतपूर, कऱ्हाडकडे जाण्याऱ्या वाहनांनी याचा वापर करायचा आहे. पेंढारकर हॉस्पिटल ते मरिआई कॉम्लेक्‍स (मोनार्क हॉटले मार्गे) या रस्त्याचा वापर फक्त राजवाड्याकडे जाण्यासाठी करायचा आहे. त्यामुळे कोरेगाव, कऱ्हाड, रहिमतपूर तसेच वाढे फाट्यावरून पोवई नाक्‍यावर येणाऱ्या वाहनांनी राजवाड्याकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करायचा आहे. शाहूनगरमधून व गोडोलीतून येणाऱ्या वाहनांनी राजवाड्याकडे जाण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करावयाचा आहे. दोन्ही मार्गावर एकेरी वाहतूक सुरू झाल्यास वाहतूक कोंडी टाळत वाहतुकीचे योग्य नियमन करणे शक्‍य होणार आहे. 

बंद व नो पार्किंगवरील वाहनांवर कारवाई  
पोवई नाक्‍यावरील कामामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढला जात आहे; परंतु पर्यायी रस्त्यांवर नो- पार्किंगमध्ये लावली जाणारी व बंद अवस्थेत बराच काळ एकाच ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे शहरातील पर्यायी रस्त्यांवर लावलेल्या अशा वाहनांवर कारवाईची धडक मोहीम वाहतूक शाखा सुरू करणार आहे. नागरिकांनी अशी वाहने लावू नयेत तसेच लावलेली तातडीने काढून दुसऱ्या जागी हलवावी, असे आवाहन वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक सुरेश घाडगे यांनी केले आहे.

Web Title: one way traffic powai naka