ऐतिहासिक ठिकाणी रात्री ‘ओपन बार’

ऐतिहासिक ठिकाणी रात्री ‘ओपन बार’

सातारा शहरात दारू रिचवण्यासाठी झाले अड्डे

सातारा - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य व राष्ट्रीय महामार्गालगतची दारूविक्री बंद झाली असली, तरीही मद्यपींनी आता मोकळ्या जागांसह ऐतिहासिक ठिकाणी रात्रीच्या वेळी ओपन बार सुरू केलेले दिसतात. बिअर शॉपी व परमिटरूममधून आणलेली दारू या ठिकाणी रिचवली जात आहे. हॉटेल, धाब्यांवरही दारू पिण्यासाठी टेबलला १०० रुपये आकारले जात असल्याची चर्चा आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर ५०० मीटरच्या आत दारूविक्रीवर बंदी घातली. त्यामुळे मद्यपींची कोंडी झाली, असे वाटत असेल. मात्र, कायद्याला सहजासहजी जुमानतील ते मद्यप्रेमी कसले. आता सातारा शहरातील चार भिंती, किल्ले अजिंक्‍यतारा, यवतेश्‍वर रस्ता, कुरणेश्‍वर यांसारख्या ऐतिहासिक स्थळांबरोबर जिल्हा परिषद मैदान, अंधाऱ्या गल्लीतील कट्ट्यांवर मद्यपींकडून सर्रास रात्री ओपन बार भरविला जात आहे. महामार्गावरील दारूविक्री बंदीमुळे शहरानजीक देशी दारू विक्रीच्या दुकानांवरही सध्या गर्दी वाढली आहे. हे मद्यपी बिअर शॉपी आणि दारूच्या दुकानांतून बाटल्या घेऊन चार भिंती, यवतेश्‍वरच्या कठड्यांवर बसून दारू रिचवताना दिसतात. दारू पिऊन तेथेच बाटल्या टाकल्या जात आहेत. बॉम्बे रेस्टॉरंटजवळील उड्डाण पूल, जिल्हा परिषद मैदान या ठिकाणीही रात्रीच्या वेळी मद्यपी ठाण मांडून बसलेले असतात. 

रात्रीच्या वेळचे ओपन बार...
चार भिंती  किल्ले अजिंक्‍यतारा 
यवतेश्‍वर रस्ता   जिल्हा परिषद मैदान
कुरणेश्‍वर  बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाण पूल

नियम फक्त कागदावरच...!
दारू पिणे, दारू खरेदी करणे, जवळ बाळगणे आदींसाठी परमिट (परवाना) लागते. परमिट नसताना दारूविक्री करणाऱ्या विक्रेत्यावर आणि जवळ परमिट नसतानाही बिनधास्त दारू खरेदी करणाऱ्यावरही कारवाई होऊ शकते. दारू विकत घेताना संबंधिताचे नाव दुकानदाराने नोंदवहीत नोंदविणे आवश्‍यक आहे. या नियमांची योग्य पद्धतीने कार्यवाही होत असेल, अशी स्थिती सध्या तरी दिसत नाही. 

ढाब्यांवर टेबलला १०० रुपये
काही जण जवळच्या ढाब्यांवर, हॉटेलमध्ये जाऊन पिऊ लागलेत. विशेष म्हणजे या सर्व ठिकाणी ‘दारू पिण्यास सक्त मनाई आहे’ असे फलक लावले आहेत. पण, दुसरीकडे त्याच ठिकाणी मद्यपींना थंड पाणी आणि चकण्याची सोय करून दिली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील बहुतांश हॉटेल, ढाब्यांबरोबरच गोडोली, कोडोली, कोंडवे परिसरातील हॉटेल, ढाब्यांवर रात्री आठ वाजल्यापासून मद्यपींची गर्दी दिसते. काही ढाबे, हॉटेलमध्ये न जेवणाऱ्या, पण केवळ मद्यपान करणाऱ्यांकडून प्रति टेबल १०० रुपये आकारले जात आहेत, अशीही चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com