सामान्य गणिताचा पर्याय नववीसाठी रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

बीजगणित व भूमिती राहणार; "आयसीटी' विषय बंद

बीजगणित व भूमिती राहणार; "आयसीटी' विषय बंद
सोलापूर - येत्या शैक्षणिक वर्षापासून (जून 2017) नववी व दहावीसाठी प्रथमच अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके याबाबत विद्या प्राधिकरण (एनसीईआरटी) यांच्यामार्फत कार्यवाही होत आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात फेररचना केली आहे. त्यानुसार नववीसाठी गणित या विषयास सामान्य गणित हा पर्याय यापुढे राहणार नाही. सर्वांसाठी बीजगणित व भूमिती हीच पुस्तके राहतील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.

नववीचा "आयसीटी' (माहिती संप्रेषण तंत्रज्ञान) हा विषय स्वतंत्र न राहता त्याचा समावेश सर्व विषयांमध्ये केला आहे. त्यामुळे "आयसीटी'चे स्वतंत्र पाठ्यपुस्तक राहणार नसल्याचेही शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. त्याचबरोबर सामाजिकशास्त्रे विषयांतर्गत भूगोल या विषयाबरोबर अर्थशास्त्र हा स्वतंत्र विषय न राहता भूगोल व गणित या दोन्ही विषयात अर्थशास्त्रविषयक क्षमता व आशय यांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे भूगोलाच्या पुस्तकाच्या शेवटच्या भागामध्ये असलेला अर्थशास्त्र विषयाचा स्वतंत्र अभ्यासक्रम आता यापुढे भूगोल व गणित या विषयात समाविष्ट करण्यात येणार आहे.

शालेय प्रमाणपत्र व श्रेणी विषयाची फेररचना केली आहे. त्याचबरोबर विषयात बदल केले आहेत. व्यक्तिमत्त्व विकास, कार्यानुभव, समाजसेवा व व्यवसाय मार्गदर्शन हे विषय बंद केले आहेत. त्याऐवजी "स्व-विकास व कलारसास्वाद' या विषयाचा एकच विषय करण्यात आला आहे. शालेय प्रमाणपत्र विषयात संरक्षणशास्त्र हा विषय राहील. त्यात पूर्वीप्रमाणे एमसीसी (फक्त नववी), स्काऊट गाइड, नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा, एनसीसी हे विषय पूरक राहतील.

व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर
शिक्षण व्यवसायाभिमुख व्हावे, यादृष्टीने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत "नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क'चे नववी व दहावी स्तरावर एकूण दहा विषय सुरू करण्यात आले आहेत. हे विषय इंग्रजी माध्यमांतील शाळेतील विद्यार्थ्यांना द्वितीय भाषा अथवा तृतीय भाषा अथवा सामाजिकशास्त्रे या विषयास पर्याय म्हणून राहतील. इंग्रजी व्यतिरिक्त इतर माध्यमाच्या विद्यार्थ्यांना द्वितीय भाषा अथवा सामाजिकशास्त्रे या विषयास पर्याय म्हणून निवडता येतील. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाने ज्या शाळांना परवानगी दिली आहे, त्याच शाळांना सुरू करता येतील.