पर्याय मिळाल्यास कोरेगाव व वाईतही होणार दमछाक

पर्याय मिळाल्यास कोरेगाव व वाईतही होणार दमछाक

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील यशामुळे वाई आणि कोरेगाव या दोन विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाईत मकरंद पाटील आणि कोरेगावात शशिकांत शिंदे या दोन्ही आमदारांचा लोकांशी असणारा संपर्क, कार्यकर्त्यांशी असणारी जवळीक त्यांना नेहमीच फायद्याची ठरली आहे. मात्र, मतदारसंघात सक्षम पर्यायाचा अभाव त्यांच्या मजबुतीला नेहमीच पूरक राहतो, हे कारणही त्यामागे आहे. वाईत ऐन निवडणुकीत पळ काढून विरोधकांनी अवसानघातकीपणा केल्याने मकरंद पाटील यांना जिल्हा परिषद सोपी गेली. कोरेगावात काँग्रेसमधील गटबाजीमुळे शशिकांत शिंदे यांची गणिते जुळली. भविष्यात सक्षम पर्याय पुढे आला तर दोघांचीही पळताभुई थोडी होऊ शकते, हे विरोधात गेलेल्या मतांतून लक्षात घ्यायला हवे.   
(उद्याच्या अंकात - फलटण व माण)

विरोधकांच्या बोटचेपेपणामुळे मकरंद पाटील शाबूत

वाई मतदारसंघातील वाई, महाबळेश्‍वर व खंडाळा या तिन्ही तालुक्‍यांतून राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले पाठबळ मिळाले आहे. वाई व महाबळेश्‍वरमध्ये दोन्ही पंचायत समित्यांमध्ये सत्ता मिळण्याची खात्री आहे. तर खंडाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अपक्षांची मदत घेऊन पाच वर्षे सत्तेसाठी कसरत करावी लागणार आहे. आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वामुळे पक्षाने यश गाठले असले तरी महाबळेश्‍वरमध्ये शिवसेनेने दिलेला धक्का आणि खंडाळ्यात निर्भेळ यशाला अपक्षांनी लावलेला ब्रेक या गोष्टी त्यांना विचार करावयास भाग पडणार आहेत. वाईमधील यशवंतनगर, बावधन, ओझर्डे व भुईंज हे जिल्हा परिषेदेचे चारही गट ताब्यात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले. आठपैकी सहा गण राष्ट्रवादीकडे आले. बावधन गटातील बावधन व शेंदूरजणे या दोन गणांत काँग्रेसने विजय मिळविला. वाईत निर्विवाद सत्ता मिळविण्यात यश आले तरी राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत कुरघोडींतून या दोन जागा गेल्याची कुजबूज पुढील काळात चर्चेची ठरू शकते. महाबळेश्‍वरमध्ये तर अंतर्गत गटबाजी विरोधकांसाठी मदतीचीच ठरली. तळदेव गटातून अपक्ष प्रणिता जंगम विजयी झाल्या. त्यांना शिवसेनेने पुरस्कृत केले होते. त्याच गटातील कुंभरोशी गणही शिवसेनेकडे गेला. राजेंद्र राजपुरे यांच्या ताकदीमुळे व संघटनकौशल्याने भिलार गटातील तिन्ही जागा राखण्यात यश मिळाले. त्यामुळेच महाबळेश्‍वर पंचायत समितीत किमान सत्ता राखण्याची कामगिरी होऊ शकली. खंडाळ्यात शिरवळ गटातून नितीन भरगुडे-पाटील यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसला धक्कादायक आहे, असे मानले जात आहे. प्रत्यक्षात भरगुडे-पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. २५ वर्षे सातत्याने पदांवर असणारे भरगुडे-पाटील प्रवाहातून बाजूला गेले. शिरवळ गटात उदय कबुले यांच्यासह पळशी व भादे गणांत अपक्ष विजयी झाले आहेत. त्याशिवाय खेड बुद्रुक गणातही काँग्रेसच्या वंदना धायगुडे यांनी जागा टिकवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी निर्भेळ यश मिळण्यात यावेळीही अपयशच आले आहे.

तिन्ही तालुक्‍यांत सत्तेची बेरीज राष्ट्रवादी काँग्रेसकडे जात आहे. तरीही विरोधात सक्षम पर्यायाचा अभाव होता. वाई मतदारसंघातील काँग्रेस ही नेतृत्वाअभावी दुबळी होत चालली आहे. या निवडणुकीत ते तीव्रतेने परिणामकारक ठरले. किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याची उघड चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक वाई मतदारसंघातील पाटील-भोसले गटांतील अटीतटीच्या लढती लोकांनी अनेक वर्षे अनुभवल्या. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेस कार्यकर्त्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली आहे. यावेळी तर श्री. भोसले यांनी अजिबातच लक्ष दिले नसावे; अन्यथा भुईंज गटातील पराभव तरी काँग्रेसला टाळता आला असता. भारतीय जनता पक्षाशी कळत-नकळत होणारी जवळीक मदन भोसले कार्यकर्त्यांमध्ये द्वंद निर्माण करते. सक्षम नेतृत्व असूनही संघटनात्मक बांधणीकडे होणारे दुर्लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसविरोधातील प्रवाहाला एकत्रित आणण्यातील अडथळा बनून राहिले आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. या मतदारसंघातील आपली फळी मजबूत केली तर पर्यायही बळकट होऊ शकतो. पण, ध्यानात कोण घेतो, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे काँग्रेसला अधिक दुबळे करण्याकडेच घेऊन जात आहे.

काँग्रेसच्या गटबाजीमुळे शशिकांत शिंदे यांना दिलासा

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला दणदणीत यश मिळाले. आमदार शशिकांत शिंदे यांचा वाटा मोठा आहे. तरीही काँग्रेसमधील सुंदोपसुंदीमुळे शिंदे यांची समीकरणे जुळली आहेत, हे विसरता येत नाही. खटाव तालुक्‍यातील पुसेगाव व खटाव हे दोन गट, कोरेगाव तालुक्‍यातील सातारारोड व ल्हासुर्णे हे दोन गट तसेच वाठार स्टेशन गटातील किन्हई गण या मतदारसंघात येतात. कोरेगाव तालुका पंचायत समितीची निर्विवाद सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे पहिल्यांदाच गेली आहे. पण, त्यातील वाठार किरोली गट, वाठार स्टेशन गट व गण, पिंपोडे गट अन्य मतदारसंघात (कऱ्हाड उत्तर व फलटण) येतात. ल्हासुर्णे गटातील लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. कोरेगाव नगरपंचायत झाल्यामुळे शहरालगतच्या गटातील घडामोडी सर्वांना महत्त्वाच्या वाटत होत्या. त्यातच सातारा पालिकेच्या राजकारणात उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारलेले जयवंत भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने मैदानात आणले होते. कोरेगावमधील गेल्या सभागृहातील सदस्या अर्चना बर्गे यांचे पती किरण बर्गे काँग्रेसमधून होते. खुद्द शशिकांत शिंदे ल्हासुर्णे येथेच राहतात. त्यामुळे नकळत या गटाला महत्त्व आले. जयवंत भोसले यांनी त्यात बाजी मारल्याने शिंदे यांच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली. मात्र, या गटातील एकंबे गणात मालोजी भोसले यांनी धक्का देत शिवसेनेला सभागृहात स्थान मिळवून दिले. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नानासाहेब भोसले, युवा सेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांच्या प्रयत्नांमुळे शिवसेना विजयी ठरली तरी शिंदे यांच्या यशाला ते खुपणारे आहे. एकसळच्या दोन्ही भोसल्यांचा विजय लक्षात घेण्यासारखा आहे.

किन्हई गणासह सातारारोड गटांतील जागा जिंकून शिंदे यांनी पक्षाची स्थिती मजूबत केली. खटाव तालुक्‍यातील दोन्ही गट राष्ट्रवादी काँग्रेसकडे आले तरी पुसेगाव गणातून भाजपच्या नीलादेवी जाधव यांनी विजय मिळविला. शिंदे यांच्यासाठी बालेकिल्ल्यातील भाजपचा विजय धोकादायक ठरू शकेल की नाही, 

हे काळ ठरवणार आहे. तरीही विधानसभेच्या मैदानात भाजप आपली प्रतिष्ठा पणाला लावू शकतो, हे ध्यानात ठेवावे लागणार आहे. शिंदे यांच्या एकतर्फी विजयात शिवसेना व भाजपने हे दोन धक्के दिले. तरीही शिंदे यांचा मतदारसंघ कागदोपत्री तरी सुरक्षित वाटतो आहे. त्याला कारणीभूत मात्र केवळ शिंदे नाहीत. 
 

काँग्रेसमधील गटबाजीने शिंदे यांच्या यशाला मोठा हातभार लावला आहे. काँग्रेसमधील नेते आमदार आनंदराव पाटील व आमदार जयकुमार गोरे यांच्या समर्थकांच्या दोन गटांतील सुंदोपसुंदीने राष्ट्रवादी काँग्रेसला ही निवडणूक सोपी गेली. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असतानाही कोरेगाव पंचायत समितीमधील सत्ता आपल्याकडे ठेवण्यात काँग्रेसने दीर्घकाळ यश मिळविले होते. आता मात्र वाठार किरोली व साप गणांतील विजयी उमेदवार अनुक्रमे अण्णासाहेब निकम व शुभांगी काकडे सभागृहातील काँग्रेसचे फक्त दोन सदस्य असणार आहेत. जिल्हा काँग्रेसने अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी गेल्या १६ वर्षांत काहीच उपाय न केल्यामुळे ही अवस्था झाली आहे. कोरेगावातील पर्यायही काँग्रेसने या निवडणुकीत हरवून टाकला आहे. मतदारसंघात नसले तरी वाठार किरोलीतून विजय मिळवत जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होणारे भीमराव पाटील यांना काँग्रेसने बळ दिले तर चित्र बदलू शकते. काँग्रेसने अंतर्गत वाद टाळून बांधणी केली तरच श्री. शिंदे यांना पर्याय मिळू शकतो. अन्यथा श्री. शिंदे यांच्या एकतर्फी वर्चस्वाकडे जाण्याच्या दिशेला कोणीही रोखू शकणार नाही, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com