सेंद्रियची कास धरली तर बेदाण्यातून क्रांती

manuka
manuka

सांगली जिल्हा हा द्राक्ष बेदाणाचे माहेरघर तर आहेच; पण आता ते जिल्ह्याचे वैभव झाले आहे. या वर्षी नोटाबंदीचा परिणाम सर्व शेती उत्पादनांवर झाला; मात्र कौशल्याने द्राक्ष बाजारपेठ नोटाबंदीच्या संकटातून वाचल्याचे स्पष्ट झाले आहे. निसर्गानेही या वर्षी साथ दिल्याने अतिशय संवेदनशील असलेले द्राक्षपीक या वर्षी बंपर झाले आहे. आगामी चार-पाच वर्षांत जिल्ह्यातील द्राक्ष आणि बेदाण्याला निर्यातीची मोठी संधी आहे. २०२० पर्यंत सांगली जिल्हा सर्वाधिक द्राक्ष आणि बेदाणा निर्यात करणारा जिल्हा असेल, असे मत यंदाचा द्राक्ष हंगाम या विषयावरील ‘सिटिझन एडिटर’मध्ये द्राक्ष आणि बेदाणातज्ज्ञ आणि शेतकऱ्यांनी व्यक्‍त केले. 

यंदाचा हंगाम शेतकऱ्यांना फायद्याचा
- सुभाष आर्वे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागातयदार संघ

या वर्षीचा द्राक्ष हंगाम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरला असून, निसर्गाने साथ दिल्याने द्राक्षांवर अत्यंत कमी रोगांचा प्रादुर्भाव कमी झाल्याने औषधांचा खर्च तर कमी झालाच आहे; परंतु एकरी उत्पादनही वाढले आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत जिल्ह्यातील द्राक्षांना मागणी असून दरही अतिशय चांगला मिळत आहे. यावर्षी प्रथमच बांगला देशात जिल्ह्यातील द्राक्षे निर्यात होऊ लागली आहेत. तुलनेने सांगली जिल्ह्यातील द्राक्षांचा दर्जा, गोडी रंग अतिशय चांगला असल्याने आगामी २०२० पर्यंत सर्वाधिक द्राक्षे सांगली जिल्ह्यातून निर्यात होतील. या वर्षी सांगलीच्या बेदाण्याला जीआय मानांकन मिळाल्याने बेदाणा निर्यातीसाठी मोठी संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. जगातील बाजारपेठ जीआय मानांकनामुळे सांगली बेदाण्याला खुली झाली आहे. कमीत कमी रासायनिक खते आणि औषधांचा वापर करून खर्च कमी करण्यावर शेतकऱ्यांनी आता भर दिला पाहिजे. रेसिड्यूमुक्‍त द्राक्षे आणि बेदाणे (सेंद्रिय) तयार करण्याचे आव्हान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी स्वीकारले पाहिजे, त्यासाठी द्राक्षबागातयदार संघाकडून प्रयत्न सुरू आहेत.

निर्यातीतून होतोय मोठा फायदा
- मनोज मालू, अध्यक्ष सांगली तासगाव बेदाणा मर्चंटस्‌ असोसिएशन

या वर्षी सांगली जिल्ह्यात बेदाण्याला समाधानकारक वातावरण असून, दरही चांगले मिळतील अशी स्थिती आहे. २०१४ च्या तुलनेत गेल्या वर्षी बेदाण्याला दर कमी मिळाले असले, तरी सरासरी बेदाण्याचे दर चांगले आहेत. आज बेदाणा जगातील ६० देशांमध्ये निर्यात होतो आहे. दरवर्षी बेदाण्याची निर्यात वाढतच असल्याचे चित्र दिसत आहे. चार वर्षांपूर्वी निर्यातक्षम बेदाणा तयार करण्याचे जिल्ह्यात केवळ एक युनिट होते. आज २० ते २५ युनिट उभी आहेत. बेदाण्याच्या निर्यातीचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. बेदाणा खरेदी विक्री बहुतांशी बॅंक धनादेश आरटीजीस यामुळे होत असल्याने नोटाबंदीचा परिणाम बेदाणा व्यवसायावर झाला नाही. विजापूर कर्नाटक भागातील भौगोलिक परिस्थितीमुळे बेदाण्याचा दर्जा चांगला असल्याने तेथील बेदाण्याला चांगला दर मिळताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी दर्जेदार बेदाणानिर्मितीसाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे.

योग्य औषधे हाच उपाय
- बाबूराव जाधव, अध्यक्ष शेती खते औषधे विक्रेते संघटना 

नोटाबंदीचा मोठा परिणाम शेती औषधे आणि खते विक्रेत्यांवर झाला हे नक्‍की. जिल्ह्यातील खते औषधे विक्रेते या वर्षी खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने त्याचा परिणाम खते औषधे खरेदीवर झाला. आता स्थिती सुधारत असल्याचे चित्र दिसत असला तरी खते औषध विक्रेत्यांची परिस्थिती सुधारण्याचा खूप वेळ लागणर आहे. या वर्षी हवामान द्राक्षासाठी अनुकूल असल्याने शेती औषधांवरील खर्च कमी झाला आहे. रेसिड्यूच्या समस्येवर शेतकऱ्यांनी योग्य नियोजन आणि योग्य कंपन्यांची औषधे वापरणे हाच उपाय आहे.

दृष्टिक्षेपात द्राक्ष व बेदाणा
 तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ प्रमुख उत्पादन
 द्राक्षाचे क्षेत्र १ लाख एकर
 शासकीय क्षेत्र ४० हजार एकर 
 जिल्ह्यात खते औषधे विक्रेते ३ हजारांवर, एकरी ६० हजारांवर खते व औषधांवर खर्च
 जिल्ह्यात ३२ हवामान केंद्रे
 जिल्ह्यात बेदाणा कोल्ड स्टोअरेज ६५
 ७० हजार टन बेदाणा साठवणुकीची क्षमता
 द्राक्षे शेतीकडे युवकांचा ओढा
 द्राक्ष उभारणीसाठी एकरी पाच लाखांची गुंतवणूक
 जिल्ह्यातून यंदा सर्वाधिक निर्यात
 द्राक्षाच्या गोडी अन्‌ रंगात नाशिकलाही सांगलीने टाकले मागे
 जिल्ह्यातील ८० टक्के द्राक्षे रेसिड्यू फ्री 
 सन १५-१६ च्या हंगामातील प्रयोगशाळा अहवालातील निष्कर्ष
 द्राक्षाच्या १०० टक्के क्षेत्रावर ठिबकचा वापर
 द्राक्ष संघाकडून शेतकऱ्यांना दिले जाते प्रशिक्षण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com