अन्यथा जुना पूल कायमचा बंद करू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

कोल्हापूर - शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे काम दहा दिवसांत सुरू होऊन मे महिन्याअखेर पूर्ण झाले पाहिजे. दहा दिवसांत शासकीय कामाची आणि कागदपत्रांची पूर्तता झाली पाहिजे; अन्यथा जुन्या पुलावर विटांचे बांधकाम करून हा पूल कायमचा बंद करण्याचा इशारा सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे यांना दिला. पंचगंगा नदी पुलावरील शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे काम रखडले आहे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आज बैठक झाली. 

कोल्हापूर - शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे काम दहा दिवसांत सुरू होऊन मे महिन्याअखेर पूर्ण झाले पाहिजे. दहा दिवसांत शासकीय कामाची आणि कागदपत्रांची पूर्तता झाली पाहिजे; अन्यथा जुन्या पुलावर विटांचे बांधकाम करून हा पूल कायमचा बंद करण्याचा इशारा सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे यांना दिला. पंचगंगा नदी पुलावरील शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे काम रखडले आहे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आज बैठक झाली. 

या वेळी निवासराव साळोखे म्हणाले, ‘‘ऐतिहासिक शिवाजी पुलाचे बांधकाम ब्रिटिश सरकारच्या काळात म्हणजेच शंभर वर्षांपूर्वी झाले आहे. या पुलाची सक्षमता संपली आहे. महाडचा सावित्री पूल वाहून गेल्यानंतर शिवाजी पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा मुद्दा पुढे आला; मात्र याबाबत पुढे काहीच  झाले नाही. शासनाने आता लोकांचा अंत न पाहता मे महिन्याच्या आत बांधकाम पूर्ण करावे, अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवला जाईल.’’

आर. के. पोवार म्हणाले, ‘‘शासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला कोल्हापूरकरांची भावना समजत नाही. त्यांना वेगळ्या पद्धतीने सांगावे लागणार आहे.  वर्ष-दीड वर्ष या कामात चालढकल केली जात आहे. सरकारला याचे गांभीर्य नाही तसेच अधिकाऱ्यांनाही या पुलाबाबत देणे-घेणे नाही. त्यामुळे कोल्हापूरवासीयांच्या जिवाशी हा खेळ सुरू आहे. पंधरा दिवसांत कागदपत्रांची पूतर्ता करून प्रत्यक्ष कामाला सुरवात करावी तसेच मे महिन्याअखेर पुलाचे संपूर्ण काम पूर्ण झाले पाहिजे, अन्यथा जुना पूल कायमचा बंद केला जाईल.’’  

सुजित चव्हाण म्हणाले, ‘‘शासनाला वारंवार सांगूनही फरक पडत नाही. आता त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवावा लागेल. 

राष्ट्रीय महामार्ग विभागाने आवश्‍यक त्या सर्व परवानग्या ताबडतोब घेतल्या पाहिजेत. दहा दिवसांनंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात करावी आणि मे महिन्याअखेर हे काम पूर्ण झाले पाहिजे.’’  

चंद्रकांत यादव म्हणाले, ‘‘वारंवार निवेदन देणे आता बंद केले पाहिजे. एकजूट करूनच शासनाला हा पूल तयार करण्यासाठी प्रवृत्त 
केले पाहिजे.’’ 

बाबा पार्टे म्हणाले, की प्रत्येक वेळी केवळ आश्‍वासने देऊनच आंदोलनकर्त्यांची बोळवण केली आहे. लोकांच्या जिवाशी खेळ सुरू असताना शासन या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष देत नाही. पुलाला काही झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनावर असेल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. 

सतीशचंद्र कांबळे म्हणाले, ‘‘पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले आहे का? झाले असेल तर त्याचा रिपोर्ट काय, याची माहिती त्वरित द्या. एकीकडे पुलाची कालमर्यादा संपली आहे आणि दुसरीकडे नवीन पूल बांधणीस विलंब केला जातो, हे दुर्दैवी आहे.’’ 

या वेळी अजित राऊत, श्रीकांत भोसले, गणी आजरेकर, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, लाला गायकवाड, शीतल तिवडे, पूनम सुळगावकर, सुमन वाडेकर, जयश्री पोवार आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्रिमंडळासमोर हा विषय ठेवला आहे. आठ-दहा दिवसांत याचा निकाला लागेल. त्यानंतर कामाला सुरवात होईल. याबाबत पहिल्यापासूनच पाठपुरावा केला आहे. आवश्‍यक कागदपत्रे किंवा कामाबाबतची माहिती दिली जात आहे. 
- आर. के. बामणे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

Web Title: Otherwise, the old bridge will close permanently