पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात पुजाऱ्याची भाविकाला मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

पंढरपूर - श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाने दर्शन घेताना हातातील हार विठ्ठलाच्या मूर्तीस घालण्यासाठी टाकला. तेव्हा मूर्तीशेजारी उपस्थित असलेले मंदिर समितीचे पुजारी अशोक भणगे यांनी हार अडवून त्या भाविकाला मारहाण केली. ही घटना बुधवारी सकाळी घडली. 

दत्तात्रय सुसे (रा. शेवगाव, जि. अहमदनगर) हे त्या भाविकाचे नाव आहे. सुसे हे कुटुंबीयांसह विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यांनी सोबत फुलांचा हार नेला होता. गाभाऱ्यात गेल्यानंतर त्यांनी दर्शन घेऊन हातातील हार विठ्ठलाच्या मूर्तीला घालण्यासाठी मूर्तीकडे टाकला. तेव्हा मूर्तीशेजारी मंदिर समितीचे पुजारी अशोक भणगे यांनी हार अडवला. त्यानंतर भणगे यांनी मूर्तीच्या दिशेने हार का टाकला, असे म्हणून चिडून दत्तात्रय सुसे यांना मारहाण करून शिवीगाळ केली. तेव्हा सुसे कुटुंबीयांनी हस्तक्षेप केला. याप्रकरणी सुसे यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात पुजारी अशोक भणगे याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. 

या संदर्भात मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन म्हणाले, ""मंदिरात भाविकांनी मूर्तीवर हार फेकू नये, अशा सूचना वेळोवेळी देण्यात येत असतात. आज एका भाविकाने श्रींच्या मूर्तीवर हार फेकला. या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याने सुरक्षारक्षक अथवा वरिष्ठांना कळवायला हवे होते. त्याने तसे न करता भाविकावर हात उगारल्याचे निदर्शनास आले आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून संबंधित पुजाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.''