विठ्ठल मंदिर समितीच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा 

अभय जोशी
मंगळवार, 29 मे 2018

पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकारकडून निधी आणण्यासाठी डॉ.भोसले यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 3 ऑक्‍टोबरला त्यांनी कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज्‌ यांचा पंढरपूर दौरा ही घडवून आणला परंतु त्या संदर्भात पुढे काहीही झालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर डॉ. भोसले यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. 

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समिती अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील नोटीफिकेशनवर काल रात्री स्वाक्षरी केली. डॉ. भोसले यांचे राजकीय बळ वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला असला तरी डॉ. भोसले यांनी त्यांच्या दर्जा वाढीचा उपयोग श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी करावा अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत. 

मागील आषाढी यात्रेच्या वेळी कराड येथील भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. अतुल भोसले यांची शासनाने श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर डॉ.भोसले यांनी पंढरपूर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे देवस्थान करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे जाहीर करुन काही निर्णय ही घेतले. त्यातील काहीची कार्यवाही झाली तर काही अजून कागदावरच आहेत. येत्या आषाढी पासून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी तिरुपती व शिर्डी प्रमाणे टोकन पध्दत सुरु करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर परिसर , प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागेचे वाळवंट स्वच्छ करण्यासाठी समिती पुढाकार घेईल असे जाहीर करुन त्यांनी या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती करुन कार्यवाही सुरु केली आहे. शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम बसवण्याचे त्यांनी नियोजन केले आहे. हे काम अजून प्रलंबित आहे. संतपीठाची उभारणी करण्यासाठी डॉ.भोसले प्रयत्नशील आहेत. 

पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकारकडून निधी आणण्यासाठी डॉ.भोसले यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 3 ऑक्‍टोबरला त्यांनी कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज्‌ यांचा पंढरपूर दौरा ही घडवून आणला परंतु त्या संदर्भात पुढे काहीही झालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर डॉ. भोसले यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. 

एकीकडे डॉ. भोसले यांचे पंढरपूरला काम सुरु असताना दुसरीकडे त्यांनी आगामी निवडणूकीसाठी कराड दक्षिण मधून विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. मागील विधानसभा निवडणूकीत डॉ.भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्याशी चुरशीने लढत दिली होती. आगामी निवडणूकीत देखील पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात डॉ.अतुल भोसले यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डॉ.भोसले यांना पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याची भूमिका घेतल्याचे दिसते. परंतु या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षाला प्रथमच राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला ही स्वागताची गोष्ट आहे. 

कारण काही का असेना परंतु या निमित्ताने डॉ.भोसले यांना मिळालेल्या दर्जा वाढीचा उपयोग त्यांनी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या गोरगरीब भाविकांना अधिकाधिक उत्तम सुविधा देण्यासाठी करावा अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत.

Web Title: Pandharpur Dr Atul Bhosale gets state minister rank