पंढरपूर: आषाढी आली तरी वाळवंटाची दुरवस्थाच

chandrabhaga river pollution
chandrabhaga river pollution

पंढरपूर - आषाढी यात्रेचा सोहळा आठ दिवसांवर आलेला असताना येथील चंद्रभागा नदीच्या पात्रात शेवाळे, पाणकणीस, कपड्यांच्या चिंध्या, प्लॅस्टीक पिशव्यांचे ढिग साठले आहेत. अनेक दिवसांपासून साठलेल्या दुर्गंधीयुक्त घाण पाण्यात भाविकांना स्नान करावे लागत आहे. यात्राकाळात जुना दगडीपूल ते श्री पुंडलिक मंदिर या दरम्यानचे पात्र तरी किमान स्वच्छ असावे यासाठी तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज आहे. 

" ऐसी चंद्रभागा ऐसा भीमातीर , ऐसा विटेवर देव कोठे" असे संतांनी चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटाचे वर्णन केले आहे. आषाढी, कार्तिकी यात्रांच्या काळात लाखो वारकरी चंद्रभागेच्या तिरी टाळ मृदंगाचा गजर करतात. "पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे" असे सांगून संतांनी चंद्रभागेतील स्नानाला ही तितकेच महत्व असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या दृष्टीने चंद्रभागेतील स्नानाला महत्व आहे. त्यामुळे जिथे दहा लाखाहून अधिक वारकरी यात्राकाळात पवित्र स्नानाची पर्वणी साधण्यासाठी येणार आहेत. तो भाग तरी किमान स्वच्छ असावा अशी वारकऱ्यांची अपेक्षा आहे. 

आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थित 7 जून रोजी झालेल्या बैठकीत अनेक महाराज मंडळींनी चंद्रभागोतील शेवाळे, पाणवनस्पती व अन्य कचरा काढून पात्र स्वच्छ करण्याची मागणी केली होती. त्यामागणीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली जाईल असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व जिल्हाधकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सांगितले होते. परंतु अजूनही परिस्थिती "जैसे थेच" आहे. पात्रात सर्वत्र शेवाळे साठले आहे. जागोजागी कपड्यांच्या चिंध्यां, नारळाची केसरे, बाटल्या अजूनही पडलेल्या आहेत.मोकाट जनावरे कळपानी फिरत आहेत. 

वाळू माफियांनी वाळूचा उपसा केल्यामुळे पात्रात मोठ मोठे खड्डे पडले असून यात्रेत नदीला पाणी सोडल्यानंतर हे खड्डे वारकऱ्यांच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकतात. त्याही संदर्भात बैठकीत लक्ष वेधण्यात आले होते. त्यानुसार काही ठिकाणचे खड्डे बुजवण्यात आले आहेत परंतु काही ठिकाणी अजूनही धोकादायक खड्डे तसेच असल्याचे आज "सकाळ" प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत दिसून आले. विशेष म्हणजे गाढवांवरुन होणारा वाळूचा उपसा गेल्या दहा दिवसांपासून थांबला होता तो आता दोन दिवसांपासून पुन्हा सुरु झाला आहे. त्यामुळे नवीन खड्डे तयार झाल्याचे पहायला मिळाले. 

आषाढी एकादशी 4 जुलै रोजी आहे. यात्रेत गर्दीमुळे श्री विठ्ठलाचे दर्शन होत नाही त्यामुळे पालखी सोहळ्यातील हजारो वारकरी पंढरपूरला पुढे येऊन दर्शन घेतात. या वर्षीही हजारो वारकरी अशा पध्दतीने पंढरपुरात येऊ लागले आहेत. श्री विठ्‌टलाच्या दर्शनाची रांग आज दर्शन मंडपासून वीणे गल्लीतून चंद्रभागा घाटाच्या पुढे गेली आहे. असे असताना चंद्रभागेच्या पात्रात वहाते पाणी नाही. त्यामुळे वारकऱ्यांना पात्रात साठलेल्या पाण्यात स्नान करावे लागत आहे. जुन्या दगडी पूलाजवळील बंधाऱ्यातून पाणी सोडून वारकऱ्यांच्या स्नानाची सोय करावी अशी मागणी वारकऱ्यांमधून होत आहे. 

चंद्रभागेत स्नान केल्यानंतर "सकाळ" शी बोलताना शरद श्रीपती बरकले (रा. परसूल ता.चांदवड जि.नाशिक) म्हणाले, नदीपात्रात शेवाळे व पाणवनस्पती मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पाणी देखील बऱ्याच दिवसांपासून साचलेले असल्याने दुर्गंधी येत आहे. तातडीने स्वच्छता केली पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com