खून प्रकरणी चार जणांना जन्मठेप, सहा जणांना सक्तमजूरी

खून प्रकरणी चार जणांना जन्मठेप, सहा जणांना सक्तमजूरी

पंढरपूरः मंगळवेढा तालुक्‍यातील जंगलगी येथील एकाच्या खून प्रकरणी चार जणांना जन्मठेप तर खूनाचा प्रयत्न केल्यावरुन दुसऱ्या बाजूच्या सहा जणांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी सुनावली.

या खटल्याची हकीगत अशी की, मंगळवेढा तालुक्‍यातील जंगलगी गावातील जलस्वराज्य योजनेतील गैरकारभारा बाबत राजकुमार हणमंत बिराजदार आणि महासिध्द सिध्दाण्णा चौगुले यांच्या गटात वाद निर्माण झाला होता. 26 मार्च 2010 रोजी राजकुमार बिराजदार याला महासिध्द चौगुले, गुणाण्णा चौगुले, सुरेश तेलगाव, सुरेश चौगुले, भगवंत चौगुले, अवधूत चौगुले, मलाप्पा तेलगाव, आण्णाप्पा तेलगाव, महादेव चौगुले, महतेश उमराणी, बबन उमराणी, काशिराम चौगुले, आणि रेवणसिध्द चौगुले अशा तेरा जणांनी संगमनत करुन तलवार व काठ्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी राजकुमार बिराजदार यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

त्यानंतर राजकुमार बिराजदार याच्यासह सोमलिंग हणमंत बिराजदार, निगोंडा हणमंत बिराजदार, सुभाष हणमंत बिराजदार, श्रीकांत ओगप्पा चोखंडे, अवधूत गोडाप्पा बिराजदार, आमसिध्द गोडाप्पा बिराजदार, मुत्याप्पा गोडाप्पा बिराजदार यांनी महासिध्द चौगुले याचे वडील सिध्दाण्णा कल्लाप्पा चौगुले ( वय 61) यांच्यावर प्राणघातक शस्त्रानी हल्ला करुन त्यांचा खून केला. खूनाच्या घटनेनंतर चौगुले गटातील महासिध्द चौगुले, गुणाप्पा चौगुले, सुरेश तेलगाव यांनी तलवार व कोयत्याने सोमलिंग बिराजदार याच्या वर हल्ला करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही गुन्ह्याचे प्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक डी.बी. निघोट यांनी तपास करुन येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

दोन्ही प्रकरणातील नेत्र साक्षीदार, तसेच जखमी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी तसेच तपास अधिकारी श्री.निघोट यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.त्यावरुन न्यायाधीश श्री.देशमुख यांनी सिध्दाण्णा चौगुले यांच्या खून प्रकरणी सोमलिंग बिराजदार, निगोंडा बिराजदार, श्रीमंत चोखंडे, अवधूत बिराजदार या चार जणांना दोषी धरुन जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षे सक्तमुजरी शिक्षा सुनावली. तर उर्वरीत आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात सरकार तर्फे ऍड.आनंद कुर्डूकर, मूळ फिर्यादीच्या वतीने ऍड.धनंजय माने, ऍड.अमर देशमुख तर आरोपींच्या वतीने ऍड.मिलिंद थोबडे, ऍड. राजकुमार म्हात्रे, ऍड.पोरे यांनी काम पाहिले.

बिराजदार याच्या खूनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी आरोपी महासिध्द चौगुले, गुणाप्पा चौगुले, सुरेश तेलगाव, मल्लाप्पा तेलगाव, महादेव चौगुले आणि आण्ण्णाप्पा तेलगाव या सहा आरोपींना न्यायाधीश श्री.देशमुख यांनी दोषी धरुन दहा वर्षे सक्त मजूरी, पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील अन्य सात आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात सरकार तर्फे ऍड. सारंग वांगीकर, मूळ फिर्यादीच्या वतीने ऍड. मिलिंद थोबडे, राजकुमार म्हात्रे तर आरोपीच्या वतीने ऍड. धनंजय माने, ऍड. अमर देशमुख, ऍड. अमोल नागटिळक देसाई यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com