स्वयंसेवकांना हाफ पॅन्ट घालून सीमेवर पाठवावेः शरद पवार

sharad pawar
sharad pawar

पंढरपूर ः नीरव मोदी यांच्या विषयी एका जबाबदार व्यक्तीने 2016 ला प्रधानमंत्री कार्यालयाला पूर्व सूचना दिली होती. त्याची दखल घेऊन आवश्‍यक खबरदारी घ्यायला हवी होती. तसे झाले नाही व देशाची लूट झाली. हा वर्ग भारतीय जनता पक्षाला पाठींबा देणारा आहे. या लोकांचा आत्मविश्‍वास वाढायला काय कारण आहे याच्या खोलात जायची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

वाडीकुरोली (ता.पंढरपूर) येथे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी श्री.पवार यांनी संवाद साधला.

श्री. पवार म्हणाले, नीरव मोदी प्रकरणाची सुरुवात यु.पी.ए.च्या काळात झाली असे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्याच्या खोलात मी गेलेलो नाही. पण युपीए च्या काळात 2011 ला नीरज मोदीने खाते उघडले परंतु लगेच कोणी 11 हजार कोटी मंजूर करणार नाही. हळूहळू विश्‍वास संपादन करुन हा उद्योग केला असावा. युपीच्या काळात घडले या म्हणण्यात काही तथ्य नाही. परंतु 2016 ला प्रधानमंत्री कार्यालयाला जबाबदार व्यक्तीने कळवून देखील त्याची दखल घेतली गेली नाही ही वस्तुस्थिती आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सैन्य दलाच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्या बाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. पवार म्हणाले, या देशातील सैन्याने देशाचे संरक्षण करण्यासाठी मोठी किंमत दिलेली आहे. आज काश्‍मीर मध्ये दररोज आपले सैनिक हुतात्मा होत आहेत. परंतु तरीही आपले सैनिक प्राणपणाने देशाचे रक्षण करण्याचे काम करत आहेत. केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनाच आतंकवाद्यांशी सामना करण्यासाठी हाफ पॅन्ट घालून सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी हातात काठी घेऊन पाठवावे. म्हणजे सरसंघचालक मोहन भागवतांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे हे देशाला कळेल. या मध्ये आम्हाला राजकारण करायचे नाही. परंतु, सैन्य दल हे राजकारणापासून, टिंगल टवाळी पासून दूर ठेवण्याची गरज आहे. भागवतांचे वक्तव्य भारतीय सैन्याची अप्रतिष्ठा करणारे आहे.

आत्महत्या करु नयेत म्हणून मंत्रालयात जाळ्या लावण्यात आल्या आहेत. म्हणजे "मोरीला बोळा आणि दरवाजा उघडा" असे सरकारने केले आहे असे वाटते काय या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री.पवार म्हणाले, राज्यातील लोकांना मंत्रालयातून न्याय मिळत नसल्याने तिथे जाऊन लोक संताप व्यक्त करत आत्महत्या करत आहेत. राज्यकर्त्यानी त्या विषयी ताबडतोब आवश्‍यक उपाययोजना करायला हव्या होत्या परंतु तरीही दुर्दैवाने कोणतीही पावले टाकले जात नाहीत.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित सामोरे जाणार आहे का या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री.पवार म्हणाले, अशी आम्हा लोकांची इच्छा आहे. तशा पध्दतीच्या प्राथमिक चर्चा दिल्लीच्या पातळीवर काँग्रेस अध्यक्षांशी आमच्या झालेल्या आहेत. पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्र यावे यासाठी सोनिया गांधी सतत प्रयत्न करत आहेत. एकत्रित येऊन या देशाला पर्याय द्यावा अशी त्यांची भूमिका आहे.

अलिकडच्या काळातील निवडणूकांमध्ये भाजपाच्या विरोधात निकाल लागत असल्याने निवडणूका लवकर लागतील असे वाटते काय या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री.पवार म्हणाले, राजस्थान, त्रिपुरा आणि कर्नाटक मध्ये सत्ताधाऱ्यांच्या मनासारखा झाला नाही तर निवडणूकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते थांबतील असे वाटते. घाईघाईने ते निवडणूका घेतील असे वाटत नाही.

संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई होईल असे वाटते का या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री.पवार म्हणाले, ज्या घटकांनी समाजामधील उपेक्षित वर्गाच्या संबंधी आकसाची व व्देषाची भावना वाढीस लावण्याचे प्रयत्न केले असतील तर त्यांच्या विरुध्द कठोर कारवाई करण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. हे कारवाई करतील का नाही हे सांगणे अवघड आहे.जे लोक असे वातावरण तयार करतात त्यांच्या पायाचे दर्शन घेण्यात धन्यता मानणारे लोक आज सत्तेमध्ये आहेत त्यामुळे त्यांच्याकडून किती कारवाई होईल हे सांगता येणार नाही.

सोलापूर जिल्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आपल्या पक्षातील लोक भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली जाऊन सत्तास्थाने बळकावत आहेत या विषयीच्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री.पवार म्हणाले, ज्या काही घटना घडल्या त्या स्थानिक आहेत. त्या दुरुस्त कराव्या लागतील, त्या दुरुस्त होऊ शकतील असे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार भारत भालके, कल्याणराव काळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com