चंद्रभागेच्या वाळवंटी तळीरामांची दाटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

पंढरपूर - संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटाचा वापर तळीरामांकडून चक्क पार्ट्यासाठी केला जाऊ लागला आहे. दररोज रात्री वाळवंटात ठिकठिकाणी दारू पीत गटागटाने बसलेले तरुण पाहून वारकरी मंडळींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

पंढरपूर - संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटाचा वापर तळीरामांकडून चक्क पार्ट्यासाठी केला जाऊ लागला आहे. दररोज रात्री वाळवंटात ठिकठिकाणी दारू पीत गटागटाने बसलेले तरुण पाहून वारकरी मंडळींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

राज्य मार्गापासून ५०० मीटर अंतराच्या आतील परमीट रूम, वाइन शॉप, बिअर शॉपी बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर शहर हद्दीतील पाच आणि शहरालगतची सहा परमीट रूम, एक वाइन शॉप, एक बिअर शॉपी बंद करण्यात आले. आता शहरात एक वाइन शॉप व पाच परमीट रूम सुरू आहेत. तीर्थक्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन पंढरपुरातील दारू विक्री दुकाने व मटण विक्रीची दुकाने बंद करावीत ही वारकरी मंडळींची मागणी लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून शहरात नवीन वाइन शॉपचा परवाना देणे शासनाने बंद केले आहे. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षांत शहरात नवीन परमीट रूम अथवा वाइन शॉप सुरू झालेले नाही.

या पार्श्‍वभूमीवर परमीट रूममध्ये जाऊन जादा पैसे खर्च करून दारू पिण्याऐवजी वाइन शॉपमधून दारू घेऊन शहरातील पटांगणे, मैदाने येथे बसून दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा मंडळींच्या पैकी अनेकांनी दारू पिण्यासाठी आता चंद्रभागेच्या वाळवंटाचा वापर करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळेच घाटांच्या जवळील पानपट्ट्यांतून प्लास्टिकचे ग्लास, वेफर्स, थंड पाण्याच्या बाटल्या आणि पाऊच मिळू लागले आहे. वाइन शॉपमधून दारू घेऊन आलेली मंडळी घाटांच्या जवळील पान दुकानातून थंड पाणी आणि ग्लास विकत घेऊन वाळवंटात पार्ट्या रंगवत आहेत.

शहरातील काही लोक सायंकाळी सहा ते नऊच्या दरम्यान वाळवंटात दररोज फिरायला जातात. या मंडळींना वाळवंटात जागोजागी दारू पीत बसलेली टोळकी पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशा टोळक्‍यांच्या संख्येत वाढ होत चालली असल्याचे वाळवंटात फिरण्यास जाणाऱ्या लोकांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले. या संदर्भात एका परमीट रूम चालकास विचारले असता ते म्हणाले, परमीट रूम व वाइन शॉपच्या दरात सुमारे ४० ते ४५ टक्के फरक असतो. त्यामुळे खर्च वाचवण्यासाठी संबंधित मंडळी वाइन शॉपमधून दारू विकत घेऊन जागा मिळेल तिथे जाऊन पितात.

चंद्रभागा नदी आणि वाळवंटाविषयी वारकऱ्यांच्या मनात अपार श्रद्धा आहे. वाळवंट स्वच्छ असावे यासाठी वाळवंटात वारकऱ्यांना तंबू अथवा राहुट्या उभारण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी पोलिस आणि प्रशासनाकडून केली जाते आणि दुसरीकडे त्याच चंद्रभागेच्या वाळवंटाचा वापर दारू पिण्यासाठी होतो हे अतिशय दुर्दैवाचे आहे. या प्रकाराकडे पोलिस आणि प्रशासनाकडून कानाडोळा होत आहे. हा प्रकार तत्काळ थांबला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.
- ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, अध्यक्ष, वारकरी फडकरी संघटना

शहरातील तळीरामांची ठिकाणे
येथील रेल्वे मैदान, नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरवरचे टेरेस, यमाई तळ्याचा परिसर या ठिकाणांचा वापर दारू पिणाऱ्यांकडून दररोज रात्री केला जात आहे. त्यामुळे येथे दारूच्या बाटल्या जागोजागी पडल्याचे दिसते.

तळीरामांची वाळवंटातील ठिकाणे
जुन्या पुलाच्या बाजूला   नगरपालिका जुन्या इमारतीची पिछाडी   उद्धव घाट व समोरील बाजू    बंधाऱ्याचा परिसर