तुकाराम मुंढेंच्या काळातील कामांच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह

तुकाराम मुंढेंच्या काळातील कामांच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह

पंढरपूर - चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत मुरुमीकरण करून वारकऱ्यांना मुक्कामास प्लॉट तयार केले आहेत. शिस्तीप्रिय प्रशासकीय अधिकारी अशी प्रतिमा असलेल्या सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या काळात ही कामे झाली होती. मात्र, आज विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी श्री. मुंढे यांच्या काळात झालेल्या या कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ दोन आषाढी यात्रा झालेल्या असताना ते काम खराब झाले आहे. त्याची चौकशी करून ते काम करणारे कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज सायंकाळी येथे पत्रकार परिषदेत केली.

सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना आषाढी यात्रा काळात वारकऱ्यांना राहण्यास ६५ एकरांत तुकाराम मुंढे यांनी विकासकामे केली होती. त्या कामामुळेच त्यांची राज्यभर वाहवा झाली होती, मात्र आता त्याच कामाबाबत खुद्द विभागीय आयुक्तांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे हा विषय चर्चेचा झाला आहे. श्री. दळवी यांनी सकाळी साडेसात वाजता श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचे दर्शन घेऊन नदीच्या पैलतीरावरील ६५ एकरपासून विविध विकासकामांच्या पाहणीला सुरवात केली. पूर्ण झालेली कामे योग्य गुणवत्तेची आहेत का, याची पाहणी करून त्यांनी अपूर्ण असलेली कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. उपस्थित स्थानिक अधिकाऱ्यांची त्यांनी कानउघाडणीही केली. आषाढी यात्रेस येणाऱ्या वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यात कोणीही हलगर्जीपणा करू नये, असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. दुपारी दीडपर्यंत तब्बल सहा तास त्यांनी सर्वत्र फिरून पाहणी केली. त्यानंतर आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, उपनगराध्यक्षा सुजाता बडवे यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

श्री. दळवी म्हणाले, ‘‘६५ एकर जागेत सुमारे २० कोटी रुपये खर्च करून एमटीडीसीने स्वच्छतागृहे, स्नानगृहे, डॉरमेटरीज बांधले आहेत. ते काम येत्या आषाढीपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. तेथे पाण्यासाठी नळ जोडण्यात आले आहेत. परंतु नळ कोंडाळी नाहीत. त्यासंदर्भात चौकशी करून कारवाई केली जाणार आहे. त्या जागेलगत रेल्वेची १५ एकर जमीन शासनाकडे हस्तांतरित झाल्याने आता तिथे ८० एकर जागा उपलब्ध झाली आहे. पोलिसांसाठी पोलिस प्रशासनाने जागेची मागणी केली आहे. आमदार श्री. भारत भालके व आमदार श्री. प्रशांत परिचारक यांनी ६५ एकर जागेबरोबरच सांगोला रस्त्याच्या बाजूला पोलिसांसाठी जागा देण्याची सूचना आज केली आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाणार असल्याचे श्री. दळवी यांनी नमूद केले. 

नवीन पूल बांधणार
शेगाव दुमाला ते गोपाळपूर स्मशानभूमीजवळील रस्ता नवीन पूल बांधून जोडण्यात येणार आहे. या पुलाचा उपयोग वाहनांसाठी आणि ६५ एकरमधील वारकऱ्यांना थेट दर्शन बारीकडे येता यावे यासाठी होणार. 

पत्रा शेडजवळ नवीन दर्शन मंडप
गोपाळपूर स्मशानभूमीजवळ मंदिर समितीने नवीन दर्शन मंडप बांधून त्यात वारकऱ्यांची रांग फिरवावी. उड्डाणपूल गोपाळपूर स्मशानभूमीजवळील पत्रा शेडपर्यंत नेण्यात येणार. संत नामदेव पायरी ते महाव्दार चौकीपर्यंत पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले आहेत.

मंदिर परिसरात कायमस्वरूपी अच्छादन
श्री विठ्ठल मंदिर परिसरात व्यापाऱ्यांनी भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी नेट शेड उभा केले आहे. विमानतळावर ज्या पद्धतीने एका खांबाच्या आधारे संपूर्ण परिसर अच्छादित केलेला असतो त्याधर्तीवर ऊन, पावसापासून वारकऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही भागांत काम केले जाईल, दर्शन मंडपात स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवा, दर्शन मंडपात गुदमरण्यासारखी स्थिती आहे. काही वर्षांपूर्वी दर्शन मंडपात ए. सी. बसवण्याची योजना केली होती. त्याची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत, असे श्री. दळवी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com