पंढरपूरः श्री विठ्ठल मंदिर समितीच्या निर्णयाला स्थगिती

अभय जोशी
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

पंढरपूर ः श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या मालकीच्या पंढरपूर शहर व परिसरातील परिवार देवता मंदिरे खंडाने देण्याचे समितीने प्रस्तावित केले होते. त्या विषयी आजच जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. समितीच्या या प्रस्तावाला संबंधित कर्मचारी आणि वारकरी फडकरी संघटनेकडून विरोध सुरु झाल्यावर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी या प्रस्तावाला सायंकाळी तातडीने स्थगिती दिली.

पंढरपूर शहर व परिसरात श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिराच्या मालकीची 28 परिवार देवतांची मंदिरे आहेत. या मंदिरातील पूजा अर्चा व देखभाल दुरुस्ती समिती मार्फत केली जाते. तेथील व्यवस्थेसाठी मागील मंदिर समितीने कराराने लोक नियुक्त केले आहेत. दरम्यान, आता नवीन समितीने परिवार देवता मंदिरे खंडाने देण्याचे प्रस्तावित केले आहे. त्या विषयी आज (शुक्रवार)जाहीरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

परिवार देवतांची मंदिरे खंडाने देण्याचा निर्णय झाला तर आपले काम जाणार अशी भिती संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली. वारकरी फडकरी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर यांनी ही समितीच्या या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला. परिवार देवतांचे व्यवस्थापन मंदिर समितीनेच केले पाहिजे. आज परिवार देवतांची मंदिरे खंडाने देण्याची गोष्ट समितीने सुरु केली आहे. उद्या श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर सुध्दा खंडाने देणार का असा सवाल उपस्थित करुन त्यांनी समितीच्या या निर्णया विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या संदर्भात मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, परिवार देवतांच्या मंदिरात देवाची पूजा, अर्चा व्यवस्थापन योग्य पध्दतीने होत नसल्याच्या तक्रारी समितीकडे आल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेऊन समितीने ही मंदिरे खंडाने देण्याविषयी प्रस्तावित केले होते. तथापी तुर्त या विषयाच्या पुढील कार्यवाहीला आपण स्थगिती दिली आहे. समितीच्या आगामी बैठकीत या संदर्भात समन्वयाने निर्णय घेतला जाईल असे श्री.भोसले यांनी स्पष्ट केले.

Web Title: pandharpur news shree vitthal rukmini mandir news