श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समिती बरखास्त करण्याची बैठकीत मागणी

पंढरपूर येथे गुरुवारी दुपारी आयोजित बैठकीत बोलताना बंडातात्या कराडकर व उपस्थित महाराज मंडळी.
पंढरपूर येथे गुरुवारी दुपारी आयोजित बैठकीत बोलताना बंडातात्या कराडकर व उपस्थित महाराज मंडळी.

पंढरपूर: शासनाने नुकत्याच नियुक्त केलेल्या श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीवर राजकीय व्यक्तींचा भरणा करण्यात आला आहे. ही संमिती बरखास्त करुन समितीवर वारकरी प्रतिनिधीच घ्यावेत, या मागणीसाठी शनिवार (ता. 8) रोजी दुपारी पुन्हा महाव्दार येथे ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय निर्णय आज (गुरुवार) दुपारी येथे झालेल्या वारकरी व महाराज मंडळींच्या बैठकीत घेण्यात आला. ठिय्या आंदोलनाची दखल न घेतल्यास श्रावण एकादशीला श्री विठ्ठल मंदिरा समोर पुन्हा आंदोलन आणि त्यानंतर वेळ पडली तर मंत्रालयावर वारकऱ्यांचा मोर्चा नेण्याचा ही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे शासनाने गेल्या अडीच वर्षांपासून गठण केले नव्हते. मुंबई उच्च न्यायालयाने 30 जून पूर्वी मंदिर समितीचे गठण करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर 3 जून रोजी आषाढी दशमी दिवशी सर्व संतांच्या दिंड्या वाखरी येथे असताना शासनाने कराड येथील भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची नियुक्ती केली. त्यामध्ये भाजपाच्या चार व शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना सदस्य म्हणून घेण्यात आले आहे तर दोन वारकरी संप्रदायातील लोकाना स्थान देण्यात आले आहे. 11 पैकी 9 जणांची ही समिती गठीत करण्यात आली असून, दोन सदस्यांची पदे शासनाने रिक्त ठेवलेली आहेत.

मंदिर समितीवर केवळ दोन वारकरी प्रतिनिधींना स्थान दिले आणि बाकी राजकीय कार्यकर्त्यांना संधी देण्यात आल्याने संतापलेल्या काही महाराज मंडळींनी आषाढी दशमी दिवशी माऊलींचा सोहळा पंढरपुरात प्रवेश करत असताना हा सोहळा थांबवून सुमारे दीड तास ठिय्या आंदोलन केले होते. तेंव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली जाईल, परंतु सोहळा पुढे जाऊ द्या असे आश्‍वासन अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी आंदोलनाचे प्रमुख वारकरी फडकरी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर यांना दिले होते. दुसऱया दिवशी पहाटे श्री विठ्ठलाची महापूजा झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घेऊन रिक्त असलेल्या जागांवर सदस्य निवडताना वारकरी मंडळींशी चर्चा करुन नियुक्ती केली जाईल असे आश्‍वासन दिले होते.

दरम्यान, या संदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी आज दुपारी येथील नाथ चौकातील ज्ञानेश्‍वर पादुका मंदिरात महाराज मंडळींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला बंडातात्या कराडकर, बाळासाहेब आरफळकर, नामदास महाराज, ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, राजाभाऊ चोपदार, तात्यासाहेब वासकर, डॉ. अजित कुलकर्णी, राणू महाराज वासकर, रघुनाथबुवा गोसावी, भागवत महाराज चवरे, राजाभाऊ हंडे आदींसह महाराज मंडळी उपस्थित होती.

कराडकर यांचा गंभीर आरोप
पंढरपूर येथील या समितीवर वारकरी प्रतिनिधींना घेण्याऐवजी काही मांसाहारी व दारु पिणाऱ्या मंडळींचा समावेश करण्यात आला आहे, असा आरोप बंडातात्या कराडकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला. तर नियुक्त केलेल्या सध्याच्या समितीमध्ये वारकरी प्रतिनिधी म्हणून स्थान देण्यात आलेले गहिनीनीनाथ महाराज औसेकर आणि भास्करगीरी गुरु किसनगिरी बाबा या दोन सन्माननीय व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे. परंतु, आमच्या मागणीला पाठींबा म्हणून या दोन्ही सन्माननीय व्यक्तींनी त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला पाहिजे. समिती मधील विधानसभा सदस्य, अनुसुचित जाती व जमातीचे सदस्य नेमताना ते देखील वारकरी सांप्रदायातीलच घ्यावेत, अशी मागणी बैठकीत काही जणांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com