पार्किंग, वाहतूक कोंडी मार्गी लावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

कोल्हापूर - शहरातील पार्किंगसह वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. तो सोडविण्यासाठी आक्रमक भूमिका घ्या. फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करण्याबाबत महापालिकेला सूचना करा, असा सूर आजच्या जनता दरबारामध्ये उमटला. 

कोल्हापूर - शहरातील पार्किंगसह वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. तो सोडविण्यासाठी आक्रमक भूमिका घ्या. फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करण्याबाबत महापालिकेला सूचना करा, असा सूर आजच्या जनता दरबारामध्ये उमटला. 

जुना राजावाडा पोलिस ठाण्यात विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या तपासणीनिमित्त जनता दरबार घेतला. त्यात जनतेच्या वतीने मान्यवरांनी भूमिका मांडली. महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडप, बिंदू चौक, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, शिंगोशी मार्केट आदी गर्दीच्या ठिकाणच्या रहिवाशांकडे पार्किंगची सुविधा नाही. त्यांची वाहने थेट रस्त्यावर लावली जातात. त्यात प्रत्येक दुकानदाराच्या दारातील फेरीवाल्यांमुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे. त्याचा सामान्य नागरिकांना त्रास सहान करावा लागत आहे. पोलिस प्रशासनाने वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांसह रिक्षा व इतर वाहनांवर तातडीने कडक कारवाई करा. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करा. ओपन बारसह छेडछाडीच्या ठिकाणी गस्तीचे प्रमाण वाढवा. सोशल मीडियावरून जाती तेढ निर्माण करणाऱ्यावर कारवाई करा. महालक्ष्मी मंदिर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. त्याच्या सुरक्षिततेबाबत तातडीने उपाययोजना करा. वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींच्या पालकांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशा सूचना दरबारात मान्यवरांनी मांडल्या. 

निवास साळोखे म्हणाले, ‘‘शहरातील पार्किंग व्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. तो मार्गी लावण्यासाठी पोलिस प्रशासनाने महापालिकेची तसेच जनतेचीही मदत घ्यावी.’’ नगरसेवक किरण नकाते म्हणाले, ‘‘महाद्वार रोड ते गुजरी येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नेमा. क्रीडा संकुल आणि हॉकी स्टेडियम परिसरातील ओपन बार बंद करा.’’ रणरागिणी संस्थेच्या दिव्या मगदूम म्हणाल्या, ‘‘कौटुंबिक तक्रारींबाबत पोलिस ठाण्यात येणाऱ्या महिलांना तातडीने न्याय द्या.’’ भाजपचे महेश जाधव म्हणाले, ‘‘वाहतुकीस अडथळा करणाऱ्या फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करा. फेरीवाल्यांना शिस्त लावा.’’ नगरसेवक अजित ठाणेकर म्हणाले, ‘‘महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडप, भाऊसिंगजी रोड येथील फेरीवाले व रिक्षावाल्यांवर पोलिसांनी लक्ष ठेवावे.’’ सीमा पाटील म्हणाल्या, ‘‘फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या.’’ 

आदिल फरास म्हणाले, ‘‘जे फेरीवाले वाहतुकीस अडथळा करतात त्यांच्यावर कारवाई जरूर झाली पाहिजे. मात्र कारवाईत इतरांवर अन्याय करू नका. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्व नगरसेवकांची व्यापक बैठक पोलिस प्रशासनाने घ्यावी.’’ अशोक देसाई म्हणाले, ‘‘रंकाळा तलावावर टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे. सर्व शाळा- महाविद्यालयांवर विद्यार्थिनींसाठी पोलिसांनी ‘मेल बॉक्‍स’ बसवावेत.’’ महेश उरसाल म्हणाले, ‘‘महाद्वार रोड व ताराबाई रोड नो व्हेइकल झोन करा.’’ माजी नगरसेवक अजित राऊत महणाले, ‘‘शहरातील सिग्नल दिवसभर सुरू ठेवा.’’ माजी नगरसेवक माणिक मंडलिक म्हणाले, ‘‘चर्चेतून पोलिस प्रशासनाने वाद मिटवावेत; मात्र  फुटबॉल स्पर्धा बंद पाडू नयेत.’’ यानंतर उदय गायकवाड, गणी आजरेकर, कादर मलबारी, बाबा पार्टे, नगरसेवक शेखर कुसाळे आदींनी सूचना मांडल्या. 

या वेळी पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, माजी नगरसेवक अनिल चौगुले, दुर्वास कदम, श्रीकांत भोसले, सुरेश जरग, राजू मेवेकरी, नगरसेवक विजय खाडे, पद्माकर कापसे, विकास जाधव, समीर नदाफ, सुजित चव्हाण, लाला गायकवाड आदी उपस्थित होते. 

नागरिकांनी खुल्या पद्धतीने प्रश्‍न मांडले आहेत. त्यांनी पोलिसांशी चर्चा जरूर करावी; मात्र कोणत्याही बेकायदेशीर कामाची पाठराखण करू नये. अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबाबाला बळी न पडता आणि पारदर्शीच काम करावे. 

- विश्‍वास नांगरे-पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक