Koyana-Rehabilitation
Koyana-Rehabilitation

धरणग्रस्त आंदोलनात ‘श्रमिक’ने रचला इतिहास

पाटण - सहा दशकांहून अधिक काळ रखडलेले कोयना पुनर्वसन, सहा जिल्ह्यांत विखुरलेले प्रकल्पग्रस्त एकत्र, प्रकल्पग्रस्तांची तिसरी व चौथ्या पिढीचा सहभाग, तरुण व महिलांची लक्षणीय उपस्थिती, सर्वांत मोठे व २३ दिवस चाललेले कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन शासनस्तरावर सकारात्मक चर्चा व धोरणात्मक निर्णय, एक व तीन महिन्यांच्या कालमर्यादेची अट आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची मध्यस्थी असा इतिहास ‘श्रमिक मुक्ती दला’ने या आंदोलनात रचला, हेच या आंदोलनाचे फलित २३ दिवसांत पाहावयास मिळाले.

२६ फेब्रवारीपासून गेली ६४ वर्षे रखडलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाने कोयनानगर येथील शिवाजी क्रीडांगणावर ठिय्या आंदोलनास सुरवात केली. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त सहभागी झाल्याने कोयना प्रकल्पग्रस्तांचे हे सर्वांत संख्येने मोठे आंदोलन अशी त्याची चर्चा सुरू झाली. डॉ. भारत पाटणकर यांनी श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली. मात्र, या आंदोलनाने इतिहास रचलेला सर्वांनी पाहिला.

सहा जिल्ह्यांतील विखुरलेला प्रकल्पग्रस्त संघटित करण्यात श्रमिक मुक्ती दलाला यश आले. ६४ वर्षे रखडलेल्या व न्यायासाठी आशा सोडलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या तिसऱ्या व चौथ्या पिढीला एका छत्राखाली आणण्याची किमया डॉ. पाटणकरांनी केली. त्याचबरोबर तरुणांसह महिलांचा सक्रिय व लक्षणीय सहभाग श्रमिक मुक्ती दलात आलेली ही राज्यातील पहिली घटना असेल. 

प्रलंबित मागण्यांसाठी व धोरणात्मक निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांशीच चर्चा हे नवीन आंदोलनाचे अस्त्र डॉ. पाटणकरांनी वापरले. दीर्घ चाललेल्या आंदोलनादरम्यान अनेक आंदोलनांतून शासकीय यंत्रणेवर दबाव, जाहीर सभांत प्रशासनावर टीका-टिप्पणी अशा आयुधांचा वापर करण्यात श्रमिक मुक्ती दल यशस्वी झाले, असे म्हणावे लागेल. २३ दिवसांत काढलेले विविध मोर्चे व साजरे केलेले पारंपरिक सण या आंदोलनाला दिशा देऊन गेले.

विविध मार्गातून प्रशासनावर एकीकडे दबाव, जाहीर टीका असा मार्ग व दुसरीकडे प्रशासनाशी सुसंवाद ठेवल्याने सकारात्मक चर्चा झाली. संपूर्ण प्रशासन अंगावर न घेता चांगले झाले त्यास चांगले म्हणणे व तोंडभरून कौतुक करणे याचा एकंदरीत परिपाक या आंदोलनात पाहावयास मिळाला. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांची मध्यस्थी याच सुसंवादाचे उदाहरण आहे. काही मागण्यांना एक महिन्याची व धोरणात्मक निर्णयांना तीन महिन्यांची कालमर्यादा नाही तर पुन्हा आंदोलन त्यासाठी तात्पुरती स्थगिती ही भूमिकाही प्रकल्पग्रस्तांचे मनोधैर्य वाढविणारी आहे.

कोयना जलाशयातील बोटिंग सुरू करणे, संकलन यादी अंतिम करणे, सिंचन व घरगुती वीज मोफत, जमीन वाटप व भविष्य निर्वाह भत्ता अशा महत्त्वपूर्ण निर्णयांचे धोरण सर्व सचिवांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठरविणे या आंदोलनाच्या यशाचे फलित आहे.

आंदोलनाची नोंद सुवर्ण अक्षरात घेण्यासारखी
तब्बल २३ दिवस चाललेले ठिय्या आंदोलन धरणग्रस्त, श्रमिक मुक्ती दल व डॉ. पाटणकर या नवीन समीकरणाचे आगमन दर्शविणारे व प्रशासनाला कामकाज करताना लाल फिती कारभारावर अंकुश ठेवणारे आहे. त्यामुळे कोयना प्रकल्पग्रस्तांच्या या आंदोलनाची नोंद सुवर्ण अक्षरात घ्यावी, अशी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com