लघु औद्योगिक वसाहत उद्योगांच्या प्रतीक्षेत!

जालिंदर सत्रे
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पाटण - इको सेन्सिटिव्ह झोन व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे उभारी घेतलेला पर्यटन व्यवसाय अखेरच्या घटका मोजत आहे. पाटण तालुका हा भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने या तालुक्‍यात लघु औद्योगिक वसाहतीत उद्योजक येत नाहीत. सुशिक्षित तरुणांना रोजगार नसल्याने मुंबईचा रस्ता धरावा लागत आहे. तरुणांच्या रोजगाराचे हे चित्र बदलणार आहे का, असा सवाल सुशिक्षित वर्गातून विचारला जात आहे.

पाटण - इको सेन्सिटिव्ह झोन व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे उभारी घेतलेला पर्यटन व्यवसाय अखेरच्या घटका मोजत आहे. पाटण तालुका हा भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने या तालुक्‍यात लघु औद्योगिक वसाहतीत उद्योजक येत नाहीत. सुशिक्षित तरुणांना रोजगार नसल्याने मुंबईचा रस्ता धरावा लागत आहे. तरुणांच्या रोजगाराचे हे चित्र बदलणार आहे का, असा सवाल सुशिक्षित वर्गातून विचारला जात आहे.

माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नातून १९९२ मध्ये तामकडे गावच्या हद्दीत कोयना नदीच्या तीरावर कऱ्हाड-चिपळूण राज्य मार्गाशेजारी ११ हेक्‍टर क्षेत्रावर लघु औद्योगिक वसाहत सुरू झाली. वीज, पाणी व रस्ते या पायाभूत सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या. ११ हेक्‍टरमध्ये एकूण ३५ प्लॉट असून त्यापैकी ३४ प्लॉटचे वाटप करण्यात आले. त्यातील फक्त दहा प्लॉटमध्येच सध्या उत्पादन सुरू असल्याचे पाहावयास मिळते. प्रकल्प उभारले नाहीत म्हणून कोल्हापूर एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी १५ प्लॉट परत घेतले असून तीन प्लॉटवर कारवाई सुरू आहे. कार्यरत तीन प्रकल्प सोडले, तर नवीन उद्योग येत नाहीत, ही पाटणच्या तरुणांसाठी शोकांतिका आहे. देसाई-पाटणकर गटांच्या राजकारणात युवकही एवढे मग्न आहेत की घरगाडा कशाच्या जिवावर चालवायचा, याचा विचारच ते करताना दिसत नाहीत. तालुक्‍यात वाढदिवस साजरा करण्यासाठी, विधानसभा, पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक मेळावे घेणाऱ्या अनेक संघटना आहेत. मात्र, या संघटना, त्यांचे नेतृत्व करणारी नेतेमंडळी ही वाढदिवस व निवडणुका संपल्या की रोजगाराबाबत मूग गिळून गप्प असतात. सत्ता नाही म्हणून पाटणकरांचे दुर्लक्ष, तर आमदार शंभूराज देसाई हे चाकोरीतील शासकीय निधीच्या विकासाच्या बाहेरच येत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हे चित्र युवकांच्या हाताला काम देईल, असे दिसत नाही. त्यामुळे युवक मेळावे घेऊन हा प्रश्न सुटणार नाही, याची नेते मंडळींना जाणीव करून देण्याची वेळ आली आहे, असे सुशिक्षित तरुण-तरुणी म्हणत आहेत. देसाई-पाटणकर गटांच्या राजकीय संघर्षातून युवकांनी बाहेर येऊन ‘आमचे काय?’ असा सवाल विचारला पाहिजे अन्यथा मुंबई-पुण्याला जाण्याशिवाय पर्याय नाही, हे वास्तव त्यांना स्वीकारावे लागेल, असे ज्येष्ठ सांगत आहेत.

तामकडे येथील लघू औद्योगिक वसाहतीतील १५ प्लॉट पुन्हा ताब्यात घेतले आहेत. तीन प्लॉट मालकांवर कारवाई सुरू आहे. संपूर्ण रिकामे प्लॉट ताब्यात घेतल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने त्याचे वाटप करण्यात येईल. 
- अशोक चव्हाण, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, कोल्हापूर