सीटी स्कॅनमधून हजार रुग्णांचे स्कॅनिंग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

कोल्हापूर  - सीपीआरमध्ये 6 कोटी 77 लाख रुपये खर्चून बसविलेले सीटी स्कॅन मशीन शहरातील उच्च तंत्रज्ञानातील एकमेव आहे. तीन महिन्यांत हजाराहून अधिक सीटी स्कॅन काढले आहेत. अजूनही चाचणी तत्त्वावर मशिनचा वापर नियमितपणे केला जात आहे. केवळ तीन हजार रुपयांत अँजिओग्राफी होत असल्याने सर्वसामान्यांसाठी ही सेवा वरदान ठरली आहे. ट्रॉमा केअर युनिटचेही काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

सीटी स्कॅन मशीन वारंवार बंद पडत असल्याने रुग्ण व जखमींना खासगी रुग्णालयात जावे लागत होते. हा त्रास आता वाचला आहे. दीड वर्षापासून वैद्यकीय संचालक व शासनाकडे पाठपुरावा करून सीटी स्कॅन मशीन खरेदी केले. कंपनीचे खास तंत्रज्ञ बोलावून मशीन दोन महिन्यांपूर्वी बसविले. त्यानंतर सीटी स्कॅन मशीन स्वतंत्र विभाग सीपीआरमध्ये कार्यान्वित केला. त्यासाठी पाच स्वतंत्र कक्ष आहेत, सात डॉक्‍टर आहेत, सहा तंत्रज्ञ, याशिवाय परिचारिका असे कर्मचारी आहेत. एका कक्षात वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वतंत्र लॅपटॉपद्वारे रुग्णांची होणारी तपासणी व इमेज पाहता येतात. रुग्ण व डॉक्‍टरांच्या संवादासाठी स्वतंत्र कक्ष आहे. याशिवाय कर्मचारी वर्गासाठी दोन स्वतंत्र कक्ष व पॅन्ट्री रूमही आहे. एका कक्षात सर्व यंत्रणा नियंत्रित करण्यासाठी तांत्रिक कंट्रोल रूम आहे.

दोन-तीन वर्षांत बंद मशिनचे भांडवल करून सीपीआरचा अपप्रचार झाला. त्यासाठी यंत्रणाही कार्यरत राहिली. त्यामुळे सीपीआरमधील चांगल्या सेवेपेक्षा सीपीआर म्हणजे बंद पडणारी यंत्रणा असा समज पसरविण्यात आला; पण सीटी स्कॅन विभागातर्फे सुरू असलेली ही सेवा सर्वसामान्य रुग्ण, जखमींसाठी आधार ठरली आहे.

सीपीआरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके यांनी पाठपुरावा केला. त्यातून टप्प्याटप्प्याने सुविधा मिळत आहेत. ट्रॉमा केअर युनिटचे कामही अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी साधारण आणखी महिनाभर लागणार आहे.

दृष्टिक्षेपात मशीन
सीटी स्कॅन मशिनची क्षमता 128 स्लाइस इतकी आहे. एवढी अद्ययावत सुविधा असलेले पश्‍चिम महाराष्ट्रातीलही हे एकमेव सीटी स्कॅन मशीन आहे. यात एका वेळी मानवी अवयवाचे 128 इमेज निघतात. त्यातून निदान प्रक्रिया अधिक सुलभ होते व अचूकता येण्यास मदत होते.