त्यांना तिकिटासाठीच पवार चालतात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

सातारा - ""निवडणुकीसाठी अनेकांना तिकीट आणि निवडून येण्यासाठी आमचे नेते शरद पवार आणि अजित पवार हवे असतात; पण निकालानंतर कोण कुठे जातो, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्याला सत्तेच्या विरोधातील लढाई जिंकायची आहे. त्यासाठी शत्रू कोण हे ओळखा,‘‘ असा सल्ला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना नाव न घेता दिला. 

सातारा - ""निवडणुकीसाठी अनेकांना तिकीट आणि निवडून येण्यासाठी आमचे नेते शरद पवार आणि अजित पवार हवे असतात; पण निकालानंतर कोण कुठे जातो, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्याला सत्तेच्या विरोधातील लढाई जिंकायची आहे. त्यासाठी शत्रू कोण हे ओळखा,‘‘ असा सल्ला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना नाव न घेता दिला. 

पाटखळ (ता. सातारा) येथील विविध विकासकामांचे उद्‌घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादीला अडचणीत आणणाऱ्यांचा रामराजेंनी समाचार घेतला. ते म्हणाले, ""अजित पवारांनी जिल्ह्यात लक्ष घालू नये, असे अनेकांना वाटते; पण माझे म्हणणे त्याच्या नेमके उलटे आहे. ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते. जिल्ह्याच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. असे असताना त्यांनी जिल्ह्यात पक्षवाढीसाठी लक्ष घातले तर बिघडले कुठे? अनेकांना निवडणुकीचे तिकीट हवे असेल तर शरद पवार चालतात. विजयासाठी पवार साहेब व अजित पवार चालतात. पण, निवडणूक संपल्यावर कोण कुठे जातात, हे माहिती आहे. आपल्याला सत्तेच्या विरोधातील लढाई जिंकायची आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा सन्मान करायला शिकलेच पाहिजे. राष्ट्रवादीचा जिल्ह्यात शत्रू कोण, हेच ओळखायला आपण विसरलो. त्यामुळेच नुकसान झाले. पण, आता आपण शत्रू शंभर टक्‍के ओळखला आहे. मागील काही दिवसांत जिल्हा परिषदेत जे काही घडले त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासला गेला आहे. येथे ज्या काही गोष्टी सुरू आहेत, त्या योग्य नाहीत. आता खंबीरपणे भूमिका घेणे गरजेचे आहे.‘‘
 

संथ वाहते कृष्णामाई, असे म्हणतात; तरी मला कृष्णा ओलांडून साताऱ्यात येण्यास भीती वाटते, असे सांगून रामराजे म्हणाले, ""जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथील प्रत्येक गावात राष्ट्रवादीअंतर्गतच दोन ते तीन गट आहेत. हे आम्हालाही आणि आमच्या वरिष्ठांनाही अवगत आहे. त्यामुळे प्रत्येक गावाने आपले राजकारण वेशीच्या आतच ठेवावे. सर्वांनी नेतृत्वाकडे बघून चालायला हवे. गावपातळीवरचे राजकारण आपल्या नेत्याला मोठे करण्यात अडचणीचे ठरू शकते. जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्‍कम करावयाची असेल तर आपले नेते शरद पवार आणि अजित पवार जो दगड देतील, तो निवडून आणायचा आहे.‘‘

शशिकांत शिंदेंचे कौतुक...
रामराजेंनी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांचे चांगलेच कौतुक केले. ते म्हणाले, ""कोरेगाव मतदारसंघातील सातारा तालुक्‍यातील गावांत विविध विकासकामांसाठी त्यांनी कोट्यवधींचा निधी आणल्याचे ऐकून मला त्यांचा हेवा वाटतो. हा माणूस सत्ताधारी पक्षात आहे की विरोधी पक्षात, हेच मला समजत नाही. जावळीचा हा "वाघ‘ कोरेगावात आला आणि येथेही वेगाने काम करत आहे.‘‘