मल्याळम दिग्दर्शक शाजी करूण, विक्रम गायकवाड यांना पेंटर स्मृती पुरस्कार

मल्याळम दिग्दर्शक शाजी करूण, विक्रम गायकवाड यांना पेंटर स्मृती पुरस्कार

कोल्हापूर - येथील पाचव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट (किफ) महोत्सवात यंदा मल्याळम दिग्दर्शक शाजी करूण यांचा कलामहर्षी बाबूराव पेंटर स्मृती पुरस्काराने, तर बॉलिवूडचे प्रसिद्ध मेकअपमन विक्रम गायकवाड यांचा चित्रमहर्षी आनंदराव पेंटर स्मृती पुरस्काराने सन्मान होणार आहे. गुरुवार (ता. 22)पासून महोत्सवाला दिमाखदार प्रारंभ होणार असून, स्वातंत्र्याच्या सत्तरीनिमित्त यंदा विशेष चित्रपट विभागातून क्रांतिकारकांच्या संघर्षकथा उलगडणार आहेत. दरम्यान, याबाबतची घोषणा आज कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट यांनी पत्रकार परिषदेत केली.

शाजी करूण केरळा स्टेट चलचित्र अकादमीचे अध्यक्ष असून स्वाहम्‌, वानप्रस्थम्‌, निशाद, कुट्टी श्रंक्‌, स्वप्नम्‌ आदी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केले आहे. सुरवातीच्या काळात त्यांनी छायाचित्रणातही ठसा उमटवला आहे. आजवर त्यांना पद्मश्रीसह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. विक्रम गायकवाड यांचाही प्रवास सर्वांना प्रेरणादायी आहे. "नो मेकअप-मेकअप-लूक' अशा नवीन तंत्राचा पहिला यशस्वी प्रयोग त्यांनी केला. रंगभूषेचा अधिक अभ्यास व तंत्र त्यांनी अमेरिकेत शिकून भारतीय चित्रपट अधिक समृद्ध केला. "मोनेर मानुष', "डर्टी पिक्‍चर', "बालगंधर्व', "जतिश्‍वर' या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय; तर "द मेकिंग ऑफ महात्मा', "सरदारी बेगम', "डॉ. बाबासाहेब आंबेडकर', "मकबूल', "रंग दे बसंती', "थ्री इडिएटस्‌', "भाग मिल्खा भाग', "लोकमान्य' आणि सध्याचा बहुचर्चित "दंगल' आदी दोनशेवर चित्रपटांसाठी त्यांनी उल्लेखनीय रंगभूषा केली आहे. श्री. करूण आणि गायकवाड यांच्या या कार्याला सलाम म्हणून त्यांना पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

राजर्षी शाहू स्मारक भवनात 29 डिसेंबरपर्यंत महोत्सव होणार आहे. विविध भारती विभागात सात प्रादेशिक चित्रपट, भारतीय दिग्दर्शक व विदेशी दिग्दर्शक, मागोवा या विभागात सहा आणि लक्षवेधी देश विभागात सात चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपट पोस्टर प्रदर्शनासह दररोज कलाकार-तंत्रज्ञांशी मुक्त संवाद, पुस्तक प्रदर्शन आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजनही महोत्सव काळात होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या सत्तरीनिमित्त राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या सात चित्रपटांचाही महोत्सवात समावेश आहे. त्यात रिचर्ड ऍटेनबरो यांचा "गांधी', डॉ. जब्बार पटेल यांचा "डॉ. बाबासाहेब आंबेडकर', शाम बेनेगल यांचा "नेताजी सुभाषचंद्र बोस', "शहीद उधमसिंग', "वीर सावरकर', "छोटा सिपाही' आदी चित्रपटांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनपुरस्कृत या महोत्सवाचे आयोजन यंदाही कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीने केले आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, फिल्म डिव्हिजन, डायरेक्‍टोरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल (नवी दिल्ली) आदी संस्थांचे महोत्सवाला विशेष सहकार्य मिळाले आहे. महोत्सवाची सभासद नोंदणी राजर्षी शाहू स्मारक भवनात उद्या (ता. 21) पासून सकाळी अकरा ते रात्री आठपर्यंत सुरू राहील. फिल्म सोसायटी व चित्रपट महामंडळाचे सभासद व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सभासद शुल्कात विशेष सवलत आहे. त्याशिवाय एक दिवसाच्या प्रवेशिकाही उपलब्ध केल्या आहेत.

असा असेल महोत्सव
- राजर्षी शाहू स्मारक भवनात तीन स्क्रीनवर रोज पंधरा चित्रपट
- वर्ल्ड सिनेमा, विविध भारती, दिग्दर्शक मागोवा अशा विभागांसह लक्षवेधी विभागात इराणचे चित्रपट
- श्रद्धांजली विभागात दिग्दर्शक अब्बास किरोस्तोमी, आंद्रेज वाजदा आणि जयललिता यांच्या चित्रपटांची पर्वणी
- मायमराठी विभागात सात नवीन अप्रकाशित चित्रपट, त्यातून पुरस्कारांची घोषणा
- लघुपटांसह माहितीपटांचीही पर्वणी, दररोज सायंकाळी पाच वाजता कलाकार, तंत्रज्ञांशी संवाद
- उद्‌घाटन सोहळ्यात शाजी करूण यांचा तर सांगता सोहळ्यात विक्रम गायकवाड यांचा गौरव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com