एकमेव सुस्थितीतील उद्यानाला ठेकेदाराचा विळखा!

एकमेव सुस्थितीतील उद्यानाला ठेकेदाराचा विळखा!

फलटण शहर - प्राथमिक, माध्यमिकसह जवळपास सर्व शाळांच्या सुटीचा कालावधी सुरू झाल्यामुळे येथील मोकळ्या मैदानांवर मुलांची तोबा गर्दी दिसू लागली आहे. परंतु, वाढती लोकसंख्या व शहरीकरणाचा विचार करता शहरातील करमणूक व सार्वजनिक वापरासाठीचे सुस्थितीतील एकमेव उद्यानही ठेकेदाराच्या हाती गेल्याने मुक्तपणे बागडण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याची भावना चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येते.

शहरातील १२ प्रभागांतील एकूण लोकसंख्या लाखाच्या जवळपास आहे. त्यामुळे मध्यमवयीन नागरिकांबरोबरीत किशोरवयीन मुलांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येते. मूलतः नगररचनेत प्रत्येक प्रभागनिहाय आरक्षित मोकळ्या जागा सोडण्यात आल्या आहेत. परंतु, त्यांचा वापर बहुतांश ठिकाणी खासगी कारणांसाठी केला जातो किंवा त्याठिकाणी कचरा डेपो केल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे ज्या जागांवर मुलांनी बागडायचे त्याच जागांवर मोकाट जनावरांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते. अशा जागांचे नियोजन करून या ठिकाणी उद्यानांची उभारणी करण्याची आवश्‍यकता आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे, तर प्रचंड उकाड्यामुळे लहान मुले चारभिंतीबाहेर खेळणे पसंत करताना दिसत आहे. लहान मुलांसाठी सद्य:स्थितीला असलेल्या उद्यानांपैकी एका ठिकाणी सेवाकराची आकारणी केली जात आहे तर दुसऱ्या उद्यानाची दुरवस्था असल्यामुळे मुलांचा तिकडे कल कमीच दिसत आहे. अशा स्थितीमध्ये लहान मुले लायन कॉ. हरिभाऊ निंबाळकर उद्यानात रमत असल्याचे चित्र आहे. परंतु, याठिकाणी सुविधांची वानवा असून खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच झाडांचा सुकलेला पालापाचोळा मोठ्या प्रमाणात इतरत्र विखुरल्याचे दिसून येते आहे. सद्या सकाळच्या वेळेत शाळा असल्याने दुपारनंतर येथील मुधोजी हायस्कूल ग्राउंड, बाजारी शाळा मैदान, घडसोली मैदान, विमानतळ अशा ठिकाणांना मुले पसंती देताना दिसत आहेत. त्यापैकी काही ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सावलीत विसावण्यासाठी झाडे व पाण्याची सुविधा नसल्यामुळे मुलांना नाहक त्रास सहन करण्याबरोबर आरोग्य धोक्‍यात येण्याची चिन्हे दिसत आहे.

पालिका हद्दीतील अपुऱ्या उद्यानांमुळे लक्ष्मीनगर भागातील श्रीमंत छत्रपती आदितीराजे भोसले गार्डनवर अतिरिक्त ताण पडत असून, लोकसंख्येच्या मानाने हे उद्यान अपुरे पडत आहे. तर यामध्ये बागडण्यासाठी दैनंदिन कर भरणे सर्वसामान्य मुलांना न परवडणारे आहे. वन विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले वनउद्यान सर्वांसाठी खुले केल्यास मुलांना सकाळ-संध्याकाळ चांगला पर्याय निर्माण होवू शकतो. तसेच सद्य:स्थितीत मोकळ्या जागांची स्वच्छता केल्यास मुलांना खेळण्यासाठी मुबलक प्रमाणात जागा निर्माण होवून काही अंशी मुलांना दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे.

नगरपालिका अंतर्गत उपलब्ध उद्याने
 मालोजी पार्क, रविवार पेठ
 श्रीमंत रामराजे उद्यान, मलठण
 श्रीमंत छत्रपती अदितीराजे भोसले उद्यान, लक्ष्मीनगर
 लायन कॉ. हरिभाऊ निंबाळकर उद्यान, माळजाई
 वनउद्यान, फलटण (वन विभांतर्गत उद्यान)
शहरातील उद्यानांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या उर्वरित जागांवर कमिन्स कंपनीच्या सहकार्याने आगामी काळात उद्याने भरण्यात येणार असून सद्य:स्थितीला मोकळ्या जागांच्या स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे.
-धैर्यशील जाधव,  मुख्याधिकारी, फलटण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com