कवठेमहांकाळ गोळीबारप्रकरणी पिंपळवाडीच्या सरपंचास अटक 

कवठेमहांकाळ गोळीबारप्रकरणी पिंपळवाडीच्या सरपंचास अटक 

सांगली - कवठेमहांकाळ-हिंगणगाव रस्त्यावर भरदुपारी मुकुंद उर्फ सोन्या श्रीकांत दुधाळ (रा. कोगनोळी) याच्यावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी पिंपळवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील सरपंचास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. रमेश अप्पा खोत (42, रा. पिपंळवाडी) असे त्या सरपंचाचे नाव आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील उरशे टोल नाक्‍याजवळ ही कारवाई करण्यात आली. हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी त्यावर गुन्हा दाखल होता. 

अधिक माहिती अशी, की कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिद्धार्थ पेट्रोलपंपासमोर हिंगणगाव रोडवर 25 जुलै रोजी दुपारी एका दुचाकीवरून आलेल्या दोघा हेल्मेटधारी तरुणांनी मुकुंद दुधाळ याच्या डोक्‍यात गोळी झाडली होती. यामध्ये दुधाळ गंभीर जखमी झाले. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिनेश बाळासाहेब राजमाने (वय 22) आणि दत्तात्रय ऊर्फ बंडू मनोहर भुसनूर (वय 23, दोघेही रा. कोगनोळी) यांना यापूर्वी अटक केली. त्यांच्याकडून हल्ल्यात वापरलेले पिस्टल आणि एक जिवंत काडतूस तसेच दुचाकी गाडी जप्त केली होती.

प्राथमिक चौकशीत पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला. हल्ल्याचा कट रचण्यात पिंपळवाडीचा सरपंच रमेश खोत याचा सहभाग असल्याचे तपासात पुढे आले. पोलिस तेव्हापासून त्याच्या मागावर होते. पोलिसांना चकवा देत पळून जात होता. 

दरम्यान, पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा आणि अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी खूनी हल्ल्यातील पसार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश एलसीबीला दिले होते. त्यानुसार निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

हल्लाचा कट रचणारा खोत हा पुणे-मुंबई महामार्गावर असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याचा माग काढला. तळेगाव दाबाडे (पुणे) ग्रामीण पोलिसांच्या मदतीने उरशे टोल नाका परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली. त्याला पुढील तपासासाठी कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे. 

हरोलीच्या सरपंचाचा केला खून 
शिवसेनेचे तालुका प्रमुख दिनकर पाटील यांचे बंधू व हरोली गावचे सरपंच युवराज पाटील यांच्या खूनातही त्याला अटक करण्यात आली होती. यात तो जामीनावर होता. तसचे त्याच्यावर यापूर्वी तडीपारीच्या कारवाईचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com