रुपया खर्च न करता ३५ गुंठे जागा खरेदी

शैलेन्द्र पाटील
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

साताऱ्यात ‘टीडीआर’ची अंमलबजावणी सुरू; जिल्ह्यात पहिलेच उदाहरण, जागामालकांचाही होणार फायदा 

साताऱ्यात ‘टीडीआर’ची अंमलबजावणी सुरू; जिल्ह्यात पहिलेच उदाहरण, जागामालकांचाही होणार फायदा 

सातारा - अनेक गोष्टींसाठी सातारा पालिका जिल्ह्यातील इतर पालिकांसाठी पथदर्शक ठरते. ‘टीडीआर’ धोरण अंमलबजावणीच्या बाबतीतही सातारा पालिकेने पहिला क्रमांक मिळवत इतर पालिकांना उदाहरण घालून दिले आहे. ‘टीडीआर’ची पद्धती अवलंबत पालिकेने एकही रुपया न खर्च करता शनिवार पेठेत ३५ गुंठे जागा क्रीडांगणसाठी नुकतीच खरेदी केली. या व्यवहारामुळे सरकारी दरानुसार पालिकेची तब्बल १२ कोटी १७ लाख रुपयांची बचत झाली आहे. या पद्धतीने शहरातील अब्जावधी रुपयांच्या इतर आरक्षित जागा पालिकेला लोकोपयोगी सुविधांसाठी ताब्यात घेता येणार आहेत. 

२३९ जागा निधीअभावी पडून 
शनिवार पेठेत, गोरक्षण बोळाजवळ सुमारे ३५ गुंठे खासगी जागा होती. त्यावर खेळाच्या मैदानाचे आरक्षण आहे. सुधारित विकास योजनेमध्ये साताऱ्यातील २३९ जागांवर विविध लोकोपयोगी सुविधांसाठी आरक्षणे आहेत. मात्र, गेल्या १५ वर्षांत यातील बोटावर मोजण्या एवढ्याचा जागा पालिकेला खरेदी करता आल्या. निधीअभावी पालिका आरक्षित जागा खरेदी करू शकत नाही. परिणामी वर्षानुवर्षे त्या जागा तशाच पडून राहिल्या. ही उणीव लक्षात घेऊन शासनाने महापालिका क्षेत्राप्रमाणे पालिका क्षेत्रातही ‘टीडीआर’ पद्धत अनुसरण्याचा निर्णय घेतला. 

काय आहे ‘टीडीआर’
‘टीडीआर’ म्हणजे हस्तांतरणीय विकास हक्क. एखाद्या खासगी जागेवर शाळा, दवाखाना, उद्यान, रस्ता यासाठी आरक्षण टाकले जाते. या आरक्षणाच्या बदल्यात त्या जागामालकाला जमिनीचे पैसे किंवा पर्यायी जागा द्यावी लागते. पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता जागामालकाला जमिनीचा मोबदला देणे पालिकेला परवडत नाही आणि पर्यायी जागा देण्यास जागाच उपलब्ध नाही, अशा परिस्थितीत त्या जागामालकाला ‘टीडीआर’ दिला जातो. म्हणजे जेवढी जागा आहे, ती जागामालकाने पालिकेला मोफत द्यायची व त्या जागेएवढ्या बांधकामाचे क्षेत्र तो कागदोपत्री बिल्डरला विकू शकतो. 

वापरा नाहीतर विका ! 
शनिवार पेठेतील ३५ गुंठ्यांच्या मोबदल्यात पालिकेने जागा मालकांना नियमानुसार तीनपट ‘टीडीआर’ दिला. म्हणजे तीन हजार ५४८ च्या मोबदल्यात दहा हजार ६४५ चौरस मीटर बांधकामाचे ‘टीडीआर सर्टिफिकेट’ देण्यात आले. आता त्यानुसार मूळ जागा मालकांना तेवढे बांधकाम इतर बांधकामांमध्ये अधिक करता येईल. ते हा ‘टीडीआर’ इतर बांधकाम व्यावसायिकांना कागदोपत्री विकू सुद्धा शकतात. त्यातूनही जागा मालकाचा टीडीआर शिल्लक राहिल्यास तो दुसऱ्या बिल्डरला विकू शकतो. 

पालिकेचे वाचले १२ कोटी
पालिका शनिवार पेठेतील ही ३५ गुंठे जागा विकत घ्यायला गेली असती तर सरकारी दरानुसार पालिकेला  १२ कोटी १६ लाख ७८ हजार रुपये मोजावे लागले असते. वाचलेले हे पैसे पालिकेला या जागेवर क्रीडांगण विकसित करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. पर्यायाने पालिकेच्या खर्चात बचत झाली आहे. 

निधीच्या मर्यादेमुळे आरक्षित जागा खरेदीवर बंधन होते. ‘टीडीआर’ पद्धतीमुळे या खर्चात बचत होते. पालिका निधी त्या जागेवरील आरक्षण विकासासाठी खर्च होऊन नागरिकांसाठी अधिक चांगल्या सुविधा निर्माण करता येतील. आरक्षित जागा मालकांचे ‘टीडीआर’ मागणीचे आणखी दोन प्रस्ताव आमच्याकडे आले आहेत. त्यावर योग्य ती कार्यवाही सुरू आहे.
- शंकर गोरे, मुख्याधिकारी, सातारा पालिका