सामान्यांसाठी पोलिस कोठडी म्हणजे छळ छावण्या

सामान्यांसाठी पोलिस कोठडी म्हणजे छळ छावण्या

कोल्हापूर - पेठवडगावच्या पोलिस ठाण्यात कोठडीत मृत्यू झालेल्या सनी पोवार या तरुणाच्या खून खटल्यात तीन पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यांतर पोलिसांच्या कोठडीतील माराहाण प्रकरणाचे काळे रूपच पुढे आले आहे. ठाण्यातील अमानुष छळवणूक एखाद्याचा जीव घेऊ शकते, यावरच न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वीही शाहूपुरी पोलिस ठाण्यात निरपराध तरुण अरुण नामदेव पांडव (वय 22, रा. शनिवार पेठ) याला पोलिस कोठडीत अमानुष मारहाण करून खून केल्याच्या आरोपाखाली तत्कालीन एका पोलिस अधिकाऱ्यासह तीन पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठाविली होती. त्यानंतर जिल्ह्यात कोठडीतील मृत्यूप्रकरणी शिक्षा झालेली ही सर्वात मोठी घटना आहे.

पोलिस कोठडीत मृत्यू ही बाब अत्यंत गंभीर मानले जाते. यापूर्वी शहरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात अशीच घटना घडली होती. अरुण पांडवला 16 डिसेंबर 1985ला ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले व दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह आढळला होता. अरुणचा भाऊ चंद्रकांत नामदेव पांडव याचा मधुकर हॉटेलजवळ गादी कारखाना होता. कावळा नाका येथे राहणाऱ्या उषा मधुकर गायकवाड हिच्याबरोबर त्याचे प्रेमसंबध होते. उषाच्या घरच्या मंडळींचा त्यास विरोध होता. त्यामुळे ते दोघे पळून गेले आणि कणकवलीजवळील हुंबरट येथे राहू लागले. उषा पळून गेल्याने तिचे वडील मधुकर गायकवाड यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिचा छडा लावण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ती हुंबरट येथे असल्याचे कळल्यावर ते तेथे गेले; पण ते तेथून निघून गेल्याचे घरमालकाने सांगितले. पोलिस तेथे जाणार असल्याची माहिती चंद्रकांत व उषाला कोणी सांगितली, याचा तपास पोलिसांनी घेतला असता त्यांना अरुणने ती कळविल्याचे समजले. त्यामुळे 16 डिसेंबर 1985 ला रात्री त्याला घरातून ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्याला बेदम मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला आणि तपास सीआयडीकडे देण्यात आला. सीआयडीने तपास करून या तिघांसह एकूण 11 पोलिसांवर आरोपपत्र ठेवले होते; पण कोल्हापूर सत्र न्यायालयाने 1987 मध्ये सर्व पोलिसांची निर्दोष मुक्तता केली होती. अरुणचा मृत्यू हृदयविकाराने झाला नाही, हे सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाने पुरेसा पुरावा सादर केला नसल्याचे कारण देऊन सत्र न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली होती. त्याविरुद्ध राज्य सरकारने 1988 मध्ये उच्च न्यायालयात अपील दाखल केले व चंद्रकांत पांडव याच्या वडिलांनीही अर्ज केला होता. तब्बल 22 वर्षांनी न्या. डी. जी. देशपांडे व न्या. एस. आर. साठे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होऊन तिघा पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर यातील पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.

अरुण पांडवनंतर सनी पोवार खून खटला गाजला. यात आज तीन पोलिसांना जन्मठेप झाली. या दोन्ही घटनांवर पोलिस ठाण्यातील कोठडी म्हणजे सर्वसामान्यांसाठी छळ छावणीच असल्याचे दिसून येत आहे. कोणालाही तक्रारीवरून आणायचे आणि कोठडीत डांबायचे आणि माराहाणीचे विचित्र प्रकार अवलंबायचे, असेच यावरून दिसत आहे.

आत्मपरीक्षण करायला लावणारा निकाल
पोलिसांना आत्मपरीक्षण करायला लावणारा हा निकाल आहे. कोठडीत अनेक वेळा आरोपी आत्महत्या करतात. ते त्यांना होणाऱ्या पश्‍चाताप किंवा अन्य कारणांनी होत असेलही; पण काही वेळा पोलिसांचा खाक्‍या सहन न झाल्याने जीव गमवावा लागणे म्हणजे ती हत्याच म्हणावी लागेल, हेच आजच्या निकालाने सिद्ध झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com