पोलिस उपनिरीक्षकाला लाच देणारा वकील जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - अटकपूर्व जामीन अर्जास न्यायालयात विरोध न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षकांना दहा हजारांची लाच दिल्याप्रकरणी वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. ॲड. माणिक नामदेव डवंग (वय ३०, रा. मंगळवार पेठ, पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. ही माहिती पोलिस उपाधीक्षक उदय आफळे यांनी दिली.  

कोल्हापूर - अटकपूर्व जामीन अर्जास न्यायालयात विरोध न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षकांना दहा हजारांची लाच दिल्याप्रकरणी वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. ॲड. माणिक नामदेव डवंग (वय ३०, रा. मंगळवार पेठ, पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. ही माहिती पोलिस उपाधीक्षक उदय आफळे यांनी दिली.  

याबाबतची माहिती अशी - फिर्यादी दिलीप बाबूराव तिबिले हे चंदगड पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक आहेत. या पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीसंदर्भातील फिर्याद दाखल झाली आहे. याप्रकरणी राहुल ऊर्फ सागर चंद्रकात मिरजे (रा. बुधवार पेठ, पन्हाळा) याच्यासह पाच संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात राहुलला अटक झाली आहे. इतर चार संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. सर्व संशयितांचे वकीलपत्र ॲड. माणिक डवंग याने घेतले. उर्वरित चार जणांच्या अटकपूर्व जामिनासाठी त्यांच्याकडून गडहिंग्लज न्यायालयात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या अर्जाला न्यायालयात विरोध केला जाऊ नये, यासाठी ॲड. डवंग याने पोलिस उपनिरीक्षक तिबिले यांची भेट घेऊन त्यांना ५० हजारांची लाच देण्याचे आमिष दाखविले.  तिबिले यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे काल तक्रार केली. त्यानुसार आज  सापळा रचण्यात आला. ॲड. डवंग याने तिबिले यांना पन्हाळा एस.टी. स्टॅंडवर बोलावून घेतले. तेथील एका हॉटेलशेजारी तिबिले यांच्या मोटारीत ॲड. डवंग याने दहा हजारांची लाचेची रक्कम दिली. त्यानंतर त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्याच्यावर पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

ही कारवाई पोलिस उपाधीक्षक उदय आफळे, सहायक फौजदार मनोहर खणगावकर, सर्जेराव पाटील पोलिस कर्मचारी श्रीधर सावंत, मोहन सौंदत्ती, दयानंद कडूकर, यांनी केली. 

लाच देणारा वकील जाळ्यात सापडल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. शासकीय लोकसेवकास लाच दिल्याबद्दल ॲड. डवंग याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

- उदय आफळे, पोलिस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग