पोलिस अधीक्षकांसमोर आव्हानांचा डोंगर

पोलिस अधीक्षकांसमोर आव्हानांचा डोंगर

सायबर, आर्थिक गुन्हे, अवैध धंद्यांवर ठेवावा लागणार वचक; प्रभारी पदाचा अनुभव 
कोल्हापूर - कॅशलेस व्यवहारांत होणाऱ्या वाढीबरोबर सायबरसह आर्थिक गुन्ह्यांत झपाट्याने वाढ होत आहे. हे प्रमुख आव्हान नूतन पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांच्यासमोर आहे. त्याचबरोबर संघटित गुन्हेगारी, मटका, जुगार अशा अवैध धंद्यांसह खासगी सावकारी पुन्हा डोके वर काढणार नाही, याच्यावरही नजर त्यांना ठेवावी लागणार आहे. 

शासनाने पाचशे व एक हजाराच्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर चलन तुटवडा झाला. यावर उपाय म्हणून सध्या कॅशलेस व्यवहाराला गती प्राप्त झाली आहे. मोबाइल बॅंकिंग, ऑनलाइन बॅंकिंग व्यवहार सुरू झाले. त्या पटीने ग्राहकांचा पासवर्ड क्रमांक घेऊन फसवणुकीचे प्रकारही वाढू लागले. जसजसे व्यवहार वाढतील त्याच पटीत सायबर गुन्ह्यांची व्याप्ती वाढण्याचा धोका आहे. प्रत्येकाच्या हातात आता मोबाइल आहे.

मोबाइलद्वारे सोशल मीडियाच्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मुख्यालयातील एकमेव सायबर सेल आणि आर्थिक गुन्हे शाखेतील अपुऱ्या मनुष्यबळामुळे या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यावर मर्यादा येत आहेत. अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात ठोस पर्याय उभा करण्याचे आव्हान पोलिस अधीक्षक तांबडे यांच्यासमोर आहे. 

जिल्ह्यातील अनेक भागांत रात्री ‘बाटली बॉस’ची दादागिरी वाढत आहे. त्यातून गुंडांची टोळी उभी राहण्याचा धोका आहे. त्यावर वेळीच उपाय करण्याची गरज आहे. प्रभारी पदाची धुरा सांभाळत असताना तांबडे यांनी एसटी गॅंगवर मोकाअंतर्गत कारवाई करून झलक दाखवली आहे. अशाच प्रकारची कडक भूमिका घेऊन गुंडांवर वचक ठेवण्याची गरज आहे. रुकडी येथे डॉक्‍टर दांपत्याचा झालेला खून, शाहूवाडीत धड वेगळे करून तरुणाचा करण्यात आलेला खून, कणेरीवाडी येथील खून झालेल्या महिलेची अद्याप न पटलेली ओळख, पेठवडगाव हायवेजवळ महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. जिल्ह्यात छुपी खासगी सावकारी, मटका- जुगार, हातभट्ट्या सुरू आहेत. सध्या काही ठिकाणी ऑनलाइन मटकाही सुरू आहे. असे सर्व अवैध धंदे शोधून तक्रारीविना त्यांच्यावर कारवाईचा पवित्रा घेत जिल्हा स्वच्छ करावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे पदोन्नतीच्या प्रशिक्षणासाठी दीड महिन्यापूर्वी हैदराबाद येथे गेले होते. त्यावेळी प्रभारी पोलिस अधीक्षक म्हणून तांबडे यांनी ४० दिवस जिल्ह्याची धुरा सांभाळली. या काळातील अनुभवावरून आव्हाने पेलावीत, अशी मागणीही होत आहे. 

नागरिकांच्या अपेक्षा
सायबर, आर्थिक गुन्ह्यांवर वचक 
छुपा मटका, जुगार अड्ड्यांचा शोध घ्यावा
तक्रारीविना खासगी सावकारांवर कारवाई करावी
डॉक्‍टर दांपत्यासह इतर खुनाच्या गुन्ह्यांची उकल करावी
रात्रीच्या बाटली बॉससह गुंडांवर लगाम घाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com