पोलिस अधिकारीच निघाले दरोडेखोर 

पोलिस अधिकारीच निघाले दरोडेखोर 

वारणानगर, कोल्हापूर -वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीत बंद फ्लॅटमधील सुमारे सव्वानऊ कोटी रुपयांच्या रकमेवर एका पोलिस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांनीच दरोडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सांगलीचे पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ धनवट यांच्यासह एक सहायक पोलिस निरीक्षक, एक सहायक फौजदारासह नऊ जणांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांवर संगनमताने चोरीसह अपहार असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेने राज्यातील पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे अशी, सांगलीचे पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल शंकर पाटील, रवींद्र पाटील, पोलिस नाईक दीपक पाटील, कुलदीप कांबळे यांच्यासह मोहिद्दीन मुल्ला (रा. बेथलनगर, सांगली) आणि प्रवीण भास्कर सावंत (रा. वासूद, सांगोला). 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, वारणानगर येथे शिक्षक कॉलनीतील इमारत क्रमांक 5 मध्ये बांधकाम व्यावसायिक झुंजार माधवराव सरनोबत यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमधून 12 मार्च 2016 रोजी मैनुद्दीन ऊर्फ मोहिद्दीन अबुबकर मुल्ला (वय 42, रा. बेथेलहेमनगर, मिरज) याने सुमारे साडेतीन कोटी रुपयांची चोरी केली. याबाबत सरनोबत यांनी कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी चोरटा मैनुद्दीन याला अटक करून चोरीतील 3 कोटी 7 लाख 63 हजाराची रोकड जप्त केली. चौकशी दरम्यान त्यांनी मैनुद्दीन याला चौकशीसाठी पुन्हा वारणानगर येथील संबधित इमारतीत नेले. त्याठिकाणी पोलिसांना पुन्हा सुमारे दीड कोटींची रक्कम मिळून आली. ती त्यांनी जप्त केली. चौकशीत मैनुद्दीन याने चोरलेली रक्कम पोत्यातून भरून मिरजेतील घरात आणल्याची कबुली पोलिसांना दिली होती. त्यामुळे फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी शिक्षण संस्थेतील पदाधिकाऱ्यांसह अनेकांची चौकशी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली होती. 

वारणानगर येथील इमारतीत कोट्यवधीची रक्कम होती. त्याचा सर्वांगीण तपास व्हावा, ती रक्कम नेमकी कोणाची आहे, याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी तक्रार शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने नांगरे-पाटील यांनी याप्रकरणी चौकशीचे अधिकार अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना दिले. शर्मा यांनी या प्रकरणी गेली साडेतीन महिने तपास केला. त्यात धक्कादायक माहिती पुढे आली. झुंजार सरनोबत यांच्या मालकीच्या फ्लॅटमधून चोरीला गेलेल्या रकमेच्या तपासादरम्यान 13 मार्च 2016 रोजी सुमारे 6 कोटीची रक्कम तर 15 मार्च 2016 रोजी 3 कोटी 18 लाख अशी एकूण 9 कोटी 18 लाखांची रक्कम संगनमताने आणि अधिकाराचा गैरवापर करून खुद्द दोन पोलिस अधिकारी व पाच पोलिस कर्मचाऱ्यांनीच लाटल्याचे पुढे आले. याप्रकरणी झुंजार सरनोबत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आज कोडोली पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ धनवटसह दोन पोलिस अधिकारी, पाच कर्मचाऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. या सर्वांवर कलम 454, 380, 120 (ब), 166, 411सह 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास करवीर पोलिस उपअधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. 

वारणेतील मोठं घबाड नेमकं कोणी पळवलं?... 
वारणानगर येथील वारणा शिक्षण मंडळाच्या कॉलनीतील या मोठ्या चोरीच्या प्रकरणाची चर्चा राज्यभर पसरली होती. चोरी झालेल्या ठिकाणी रक्कम कोणाची आणि किती होती, हे अद्याप गुलदस्त्यात असून अनेक वेळा तिथल्या चोरीच्या रकमेचे आकडे वेगवेगळे चर्चेत आले. वर्षभरात काय तपास झाला, प्राप्तिकर व ईडीने चौकशी केली का? ही रक्कम नेमकी कोणाची याची चौकशी व्हावी आणि दोषीना शिक्षा व्हावी, अशी चर्चा वारणा परिसरात असताना आत तब्बल वर्षभरानंतर फिर्यादीने पोलिसांविरुद्ध तक्रार दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणात विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी लक्ष घालून दोषींना शिक्षा होईल, अशा पद्धतीने तपास करावा, अशी मागणी होत आहे. 

आणखी काही मासे गळाला लागतील... 
वारणानगर येथील कोट्यवधीच्या चोरीचे प्रकरण गेले वर्षभर चर्चेत राहिले आहे. हा तपास अधिक खोलात जाऊन केल्यास या प्रकरणात आणखी काही मासे गळाला लागण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com