पॉलिशच्या बहाण्याने चोरी करणारी टोळी अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

सोलापूर - सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने ते हातचलाखी करून लंपास करणाऱ्या बिहार, राजस्थान, दिल्ली येथील चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी तिघांकडून 21 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. 

सोलापूर - सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने ते हातचलाखी करून लंपास करणाऱ्या बिहार, राजस्थान, दिल्ली येथील चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी तिघांकडून 21 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. 

अरुणप्रसाद जगदीसप्रसाद कोठारी (वय 53, रा. मधुरापूर, ता. नारायणपूर, जि. भागलपूर, बिहार), रवीप्रसाद सियारामप्रसाद सोनी (वय 35, रा. न्यू अंबावाडी अजमेर, राजस्थान), गुलशनकुमार उपेंद्रकुमार साह (वय 21, रा. जमुनिया, नवगच्छीया, भागलपूर, बिहार) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या टोळीने सोलापुरात मे आणि जून महिन्यात पॉलिशच्या बहाण्याने सोन्याचे दागिने चोरून नेले होते. सोलापूरसह बार्शी, अक्कलकोट, मुंबई, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली येथेही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस निरीक्षक शंकर जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रणजित माने, सहायक पोलिस निरीक्षक नितीन खाडगे, पोलिस कर्मचारी अशोक लोखंडे, रवी परबत, युवराज कोष्टी, विनायक बर्डे, सागर सरतापे, सचिन होटकर, शांतिसागर कांबळे, विशाल गायकवाड, संतोष येळे, चालक राजू राठोड आदींच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे.
 

तुळजापुरात केला मुक्काम
अटक केलेल्या टोळीने सोलापुरातील महानंद गुंजी, सुनंदा कोरे यांचे दागिने चोरून नेले होते. चोरीनंतर ही टोळी तुळजापूर येथील लॉजवर मुक्कामी होती. गुन्हे शाखेने सोलापुरात चोरीच्या घटना घडल्यानंतर सोलापूर परिसरातील शहरांमधील लॉजची तपासणी केली होती. तुळजापुरातील लॉजवर चोरट्यांबाबतची माहिती मिळाल्यानुसार ही टोळी उघडकीस आली. पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी या कामगिरीबद्दल सहायक पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या पथकाला 10 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.
 

पॉलिशच्या बहाण्याने चोरी करणारी टोळी पहिल्यांदाच सोलापूर पोलिसांच्या हाती लागली आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून आम्ही चोरट्यांना जेरबंद केले आहे.
- रणजित माने, सहायक पोलिस निरीक्षक