नेते बदलले...वाड्यावस्त्या तशाच

सुधाकर काशीद
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

कांडवण, मालगावचा धनगरवाडा असाच आहे. तेथे आजही पिण्याच्या पाण्यासाठी एक डबके आहे. जिल्हा टँकरमुक्त, गाव तिथे पाणी अशा घोषणा करीत कोल्हापूर जिल्हा परिषदेतले काही अधिकारी ""लोकप्रिय'' झाले. या लोकप्रियतेतून मोक्‍याच्या पोस्टिंगवर गेले. आजही त्यांनी यावे आणि एकाच डबक्‍यातले पाणी माणसं आणि जनावरं दोघेही कशी पितात हे पहावे, अशी इथल्या रहिवाशांची अपेक्षा आहे.

कोल्हापूर - एक दिवस पाणी आलं नाही तर आपण रास्ता रोको करतो... रस्त्यावर खड्डे पडले तर निदर्शने करून लक्ष वेधून घेतो... स्वच्छता वेळेत झाली नाही तर प्रशासनाला धारेवर धरतो; पण इथं या क्षणी लोक डबक्‍यातले पाणी पितात. रस्ता नाहीच त्यामुळे स्वतःची पायवाट स्वतः निर्माण करतात. सार्वजनिक स्वच्छतेचे नावच सोडा कोणी आजारी पडला तर त्याला एका घोंगड्यात घालून तब्बल सात-आठ किलोमीटर डोली करून नेतात. ही कोणती तरी आदिवासी भागातली परिस्थिती वाटेल; पण आज या क्षणी शाहूवाडी तालुक्‍यातल्या काही धनगरवाड्याची ही अवस्था आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा जिल्ह्यात उठला आहे; पण हे धनगरवाडे अक्षरशः पिढ्यान्‌पिढ्या धुरळ्यात आहेत. 

निवडणुकीच्या निमित्ताने हे केलं, ते केलं, हे करू, ते करू याची जुगलबंदी सुरू आहे. आपापल्या मतदारसंघापुरती ही चर्चा आहे; पण शाहूवाडी हा जिल्ह्याचाच भाग आहे. तिथल्या वाड्यावस्तीतले लोक आपलेच भाऊबंद आहेत. ती आपल्यासारखीच माणसे आहेत या अंगाने विचार होण्याची गरज आहे. नाहीतर निवडणूक येईल, होऊन जाईल; पण या वाड्यावस्तीवरची माणसे तशीच राहतील. 

शाहूवाडी तालुक्‍यात दिग्गज नेते आहेत. मनात आणलं तर एखाद्या लाडक्‍या गावातल्या सगळ्या रस्त्यावर फरशा बसवून ते चकचकीत करण्याची त्यांची ताकद आहे; पण या तालुक्‍यात कांडवण, मालगाव, अंबाई ही वस्ती धनगरवाडे व या धनगरवाड्याला लागून आणखी तुरळक वस्ती आहे. अंबाईवाडी वस्तीत जायला चांदोली जलाशय, त्याला लागून पट्टेरी वाघांचं अस्तित्व असलेलं दाट जंगल व त्यातून जाणाऱ्या वाटेवर आत जंगलाच्या हद्दीला लागून अंबाईची वस्ती. वस्ती अवघ्या 22 ते 23 घरांची. म्हणजे हे केवळ 22 ते 23 घराचंच जग. कारण तिन्ही बाजूला झाडी. एका बाजूला डोंगराचा उतार. अवघ्या 15 ते 20 मीटरवर व्याघ्र प्रकल्पाचे टोक येऊन ठेपलेले आणि जंगल एवढे दाट की दिवस मावळला की दार बंद करून केवळ घरात बसायचे. अशी इथली परिस्थिती. रात्री गावातल्या कुत्र्यांचा भुंकून भुंकून कल्लोळ सुरू झाला की ओळखायचं की बिबट्या किंवा पट्टेरी वाघ वस्तीजवळ आलाय; मग कुत्र्याचं भुंकणं बंद होईपर्यंत जागचं रहायचं. 

तरीही इथं माणसं रहातात, तरुण पोरं हॉटेलात कामासाठी, हमालीसाठी मुंबईला पळतात. जी गावात उरतात ती वयाच्या 50 वर्षांपुढची असतात. गाव आणि कुटुंब सांभाळत रहातात. इथे नेते निवडणुकीच्या वेळी येतात. इतर वेळी बांबवडे, शाहूवाडी, मलकापूर, सरूड अशा वर्दळीच्या परिसरातच ठिय्या मारतात. 

कांडवण, मालगावचा धनगरवाडा असाच आहे. तेथे आजही पिण्याच्या पाण्यासाठी एक डबके आहे. जिल्हा टॅंकरमुक्त, गाव तिथे पाणी अशा घोषणा करीत इथल्या जिल्हा परिषदेतले काही अधिकारी ""लोकप्रिय'' झाले. या लोकप्रियतेतून मोक्‍याच्या पोस्टिंगवर गेले. आजही त्यांनी यावे आणि एकाच डबक्‍यातले पाणी माणसं आणि जनावरं दोघेही कशी पितात हे पहावे, अशी इथल्या रहिवाशांची अपेक्षा आहे. किंवा प्रचाराला येणाऱ्यांनी या डबक्‍यातलं पाणी तोंड वाकडं न करता एकदा पिऊन दाखवावं, अशी भावना आहे. या डबक्‍याशेजारी एक बंधारा घातला आहे. या बंधाऱ्याऐवजी या डबक्‍यातला गाळ काढा, आजूबाजूला खोदाई करून त्याची खोली वाढवा, कडेला कट्टा बांधा, असे इथले लोक सांगत होते; पण ते काम कोणी केलं नाही. बाजूला बंधारा बांधला. महिनाभर डोझरचा घरघराट चालू होता. आज बंधारा आहे; पण कोरडा ठणठणीत आहे. बंधारा का बांधला हे या धनगरवाड्याला पडलेले कोडे आहे. 

तरच त्यांचा विकास साधेल 
शाहूवाडी तालुक्‍यात निवडणूक ईर्षेची आहे. केवळ ईर्षा नव्हे तर ईर्षेचे टोक गाठणारी आहे. शिवसेना, राष्ट्रवादी युती झाली आहे. कालपर्यंत एकमेकांना पराभूत करण्यासाठी धडपडणारे आज एक आहेत. आमदार सत्यजित पाटील, मानसिंगराव गायकवाड, विनय कोरे, सर्जेराव पाटील, करणसिंह गायकवाड या नावांभोवती निवडणूक फिरते आहे. एकेका मतासाठी चुरस होणार आहे, हे स्पष्ट आहे. कारण या साऱ्या नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या त्यांच्या गठ्ठा मतदारसंघात, गावात कामेही केली आहेत; पण मतासाठी एकीकडे काम आणि दुसरीकडे आदिवासीहून वाईट परिस्थिती असलेला भाग अशी विषम परिस्थिती आहे. कोण निवडून येणार हा पुढचा भाग आहे; पण या माणसांसाठी पक्ष, गट, भेद विसरून काही केलं तरंच ही वस्ती खऱ्या अर्थाने माणसात येणार आहे. 

Web Title: Political leaders flourished; people still malnourished