आडवाआडवी अन्‌ जिरवाजिरवीची भाषा - सतेज पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

कोल्हापूर - महापालिकेच्या राजकारणात आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील राजकीय संघर्षामुळे आता नगरसेवकांतही आडवाआडवी आणि जिरवाजिरवीची भाषा सुरू आहे. साध्या विषयांनाही आता मतदान घेण्याची वेळ येणार आहे. 

या दोन दिग्गज नेत्यांमधील हा संघर्ष आता चिघळण्याच्या वळणावर आहे. मात्र, महापालिकेत नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची अवस्था केविलवाणी आहे. वर्ष होत आले तरी विकासकामाला निधी नाही. अधिकारी दाद देत नाहीत. त्यामुळे नगरसेवक होऊन उपयोग तरी काय? अशी त्यांच्यात भावना निर्माण झाली आहे. या भावनेला वाचा फोडण्याचे काम शिवसेनेचे गटनेते नियाज खान यांनी केले होते. 

पालिकेच्या राजकारणातही महाडिक आणि सतेज पाटील गटांत चढाओढ सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात पराभव झाल्याने काहीसे बॅकफूटवर गेलेले सतेज पाटील पालिकेची सत्ता मिळवून आणि त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत महादेवराव महाडिक यांचा पराभव करून पुन्हा चर्चेत आले. सतेज पाटील यांनी "गोकुळ‘च्या सभेत उपस्थित राहून अनेक विषय उपस्थित केले. त्यामुळे महाडिक गटाचे नगरसेवक सुनील कदम यांनी पंचतारांकित हॉटेल शेजारील पार्किंगचा विषय उपस्थित केला. त्यानंतर बाजार समितीच्या सभेतही कदम गेले होते. 

या पार्श्‍वभूमीवर पालिकेत कदम यांना रोखण्याचा प्रयत्न दोन्ही कॉंग्रेसकडून कालच्या (ता.27) सभेत झाला. सुनील कदम, सत्यजित कदम आक्रमक होत होते, तेव्हा त्यांना रोखण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीतील प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, कॉंग्रेसचे शारंगधर देशमुख, प्रवीण केसरकर, भूपाल शेटे यांच्याकडून होत होता. हळूहळू कॉंग्रेसचे सर्वच सदस्य बोलण्याचा प्रयत्न करत होते. 

राजकारणातून एकमेकांची उणीदुणी काढण्याचे काम सुरू आहे. महाडिक गटातील नगरसेवकांचे विषय असले की, दोन्ही कॉंग्रेसनी आडवे पडायचे आणि दोन्ही कॉंग्रेसच्या नगरसेवकांचे विषय असले की, भाजप- ताराराणी आघाडीने आडवे पडायचे असे तिरस्काराचे राजकारण सुरू आहे. 

विकासाचे काय? 
महापालिकेत या सुडाच्या राजकारणाने आता विकासकामे होणे कठीण आहे. अधिकारीही राजकारणाला कंटाळले आहेत. त्यामुळे एखाद्या फाइलवर सही करताना अधिकाऱ्यांनाही दहा-दहा वेळा विचार करावा लागत आहे. विकासकामाऐवजी राजकीय ईर्षाच येथे मोठ्या प्रमाणात आहे.