आष्ट्यात विलासरावांचा ‘करेक्‍ट’ कार्यक्रम

आष्ट्यात विलासरावांचा ‘करेक्‍ट’ कार्यक्रम

आष्टा - आष्टा पालिका निवडणूक निकालावरून शहरातील वीस वर्षांपासून सुरू असलेली जयंत पाटील - विलासराव शिंदे गटाची युती जनतेला रुजली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तडजोडीपायी मिळत असलेल्या कमी जागा, मानसन्मान, अधिकारशून्य वाणी आणि बरबाद झालेले राजकीय भवितव्य यामुळे जयंत सेनेने या खेपेस उलटा डाव टाकत विलासराव शिंदे गटाचा करेक्‍ट कार्यक्रम केल्याचा सूर आहे. 

जयंत पाटील गटाच्या छुप्या सहकार्यामुळेच शिंदे गटाच्या चौघा जणांना पराभव स्वीकारावा लागल्याचे निष्कर्ष बांधले जात आहेत.

आष्ट्याच्या राजकारणाला साठच्या दशकात तालुका स्तरावरील नेतृत्वाचा टच मिळाला. राजारामबापूंच्या नेतृत्वाखाली निवडणुका होत असत. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत विलासराव शिंदेंनी राजारामबापूंचा पराभव केला अन्‌ पाटील - शिंदे या पारंपरिक विरोधकांत शहरात सत्तासंघर्ष जुंपला. १९८६ ला जयंतरावांनी आष्ट्यात लक्ष घातले आणि ८६ व ९१ ची पालिका निवडणूक जिंकली, तर ९६ ला विलासरावांनी सत्तांतर केले. 

दरम्यान, दोन्ही नेते राष्ट्रवादीमय झाले. २००१ची पालिका निवडणूक विलासराव-जयंतरावांची नुरा आणि शागिर्दांची खडाजंगी अशी झाली. जयंत गटाला चार जागा मिळाल्या. २००६ ची निवडणूक बिनविरोध झाली. त्यात जयंत गटाला ५ जागा मिळाल्या. या गटाची ‘असून अडचण, नसून घोटाळा’ अशी अवस्था होती. या काळात जयंतरावांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी शिंदे गटाच्या विरोधात भूमिका घेता येत नव्हती. सत्ताधारी असूनही सत्तेत सहभाग नव्हता. केवळ पाट्या टाकण्याचे काम करावे लागत होते. यातून २०११ ची निवडणूक तापली. आरोप-प्रत्यारोप झाले. उणी-दुणी काढली. मात्र जयंतरावांनी सहा जागेवर तडजोड करीत समझोता घडवला. 

सत्तासारीपाटावर सर्वच आघाड्यांवर शिंदे गटापेक्षाही सरस ताकद असूनही नेत्याच्या आदेशापायी पाटील गटाची पीछेहाट झाली. १५ वर्षांत केवळ १७ ते २० जणांना पालिकेत संधी मिळाली. अनेकजण दूरच राहिले. अनेक घराणी प्रवाहाबाहेर गेली. अनेकांची वीस वर्षांची कारकीर्द वाया गेली. यातच शिंदे गटाकडून मिळत नसलेले अधिकार, सापत्नतेची वागणूक यातून दोन्ही गटात सुप्त संघर्ष सुरु होता. त्याचा स्फोट १६ च्या पालिका निवडणुकीत होणार, दोन्ही गट वेगळे लढणार, असे चित्र झाले. पण जयंतरावांनी सज्जड दम देत कार्यकर्त्यांना एकत्रित लढण्याचा इशारा दिला.

असंतोष उफाळला...
केवळ आठ जागा मिळाल्याने पाटील गटात असंतोष उफाळला. अनेकांना उमेदवारीविना (शिंदे घराण्याला) अलिप्त राहावे लागले. परिणामी बंडखोरी उफाळली. असंतुष्ट पाटील गटाची छुपी मदत बंडखोरांना मिळाली. तीन ठिकाणी विलासरावांच्या अधिकृत उमेदवारांचा पाडाव करीत बंडखोरांनी बाजी जिंकली. शैलेश सावंत यांनी मात्र बंडखोरांविरुद्धही गड राखला. प्रभाग चारमध्येही जयंत सेनेने विलासरावांच्या विरोधात जात त्यांच्या पत्नी आणि नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे यांचा ‘करेक्‍ट कार्यक्रम’ केला. हा पराभव शिंदे गटाच्या जिव्हारी लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com