बाजार समितीत ‘नळावरची भांडणं’

बाजार समितीत ‘नळावरची भांडणं’

सांगली - संचालकांपेक्षा नेत्यांची संख्या वाढलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताधारी गटात नळावर भांडण सुरू आहेत. एका बाजूला माजी मंत्री अजितराव घोरपडे, तर दुसऱ्या बाजूला विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली सभापती संतोष पाटील यांचा गट उभा आहे. 

भांडणाच्या पटलावर विकासकामांतील ‘खेकडा’ वृत्ती दिसत आहे. ठेकेदार नियुक्तीही डोके वर काढताना दिसत आहे. पायात पाय घालून एकमेकांना तोंडावर पाडण्याची स्पर्धा लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर वसंतदादा मार्केट यार्डमध्ये आज सात कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ होतोय. प्रमुख नेते या भांडखोरांना कानपिळी देतील का? याकडे लक्ष असेल.

सांगली बाजार समितीत काँग्रेस, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी, जनता पक्ष असे वाटेकरी आहेत. ज्येष्ठ नेते पतंगराव कदम मुख्य नेते आहेत. खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार संभाजी पवार, प्रा. शरद पाटील, दिनकर पाटील, ‘वसंतदादा’चे अध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक विक्रम सावंत, जनसुराज्यचे बसवराज पाटील असे दहाहून अधिक पॅनेलप्रमुख आहेत. ही मोळी बांधताना मुख्य सूत्रे घोरपडे यांच्या हाती असतील, असा अलिखित करार झाल्याचे सांगितले जाते. संघर्षाची मुळे करारात दडली आहेत. सभापती संतोष पाटील हे विक्रम सावंत (कदम गट) यांचे कार्यकर्ते, विशाल हेही त्यांना ‘आपला’ मानतात. त्यांनी घोरपडेंच्या ताटाखालचे मांजर न होता आपला हेका चालू ठेवला. उपसभापती जीवन पाटील हे घोरपडे गटाचे. श्री. घोरपडे यांना बाजार समितीत भलताच रस आहे. ते ‘सूक्ष्म’ लक्ष घालतात. त्यामुळे बाकी सारे नाराज आहेत.

माती, पाणी, देठ, द्राक्ष परीक्षण कार्यशाळेला मान्यतेवरून संघर्ष चव्हाट्यावर आला. पहिला प्रस्ताव ३० लाखांचा होता. तो ऐनवेळी बदलून सव्वा कोटीचा करण्यात आला. त्यामागे घोरपडे यांचा हात असल्याचा आरोप झाला. अभ्यास करू, मगच प्रस्ताव पाठवू, नेते म्हणतील तशी मान हलवून आमचा सातबारा अडकवणार नाही, अशी भूमिका घोरपडे विरोधकांनी घेतली. प्रस्ताव बारगळला. पुढे विष्णुअण्णा फळमार्केटमध्ये हॉटेलसाठी खुली जागा देण्यावरून ठिणगी पडली. हा प्रस्ताव स्वाभिमानीचे कार्यकर्ते, सभापती कुमार पाटील यांनी आणला. पाटील यांनी त्याआधी घोरपडे यांच्यावर तोंडसुख घेतले होते. घोरपडे समर्थकांनी हॉलेटचा मुद्दा खिंडीत गाठला. नळावरची भांडणे वार्षिक सर्वसाधारण सभेत पोहोचली. तेथे घोरपडे ‘प्रतिसभापती’ होऊन हल्ला चढवत होते. ‘मलाही माणसं आणता येतात, गर्दी करता येते’, असे सांगत सभापती पाटील यांनी घोरपडे यांना दमात घेतले. फळमार्केट सेस अपहार प्रकरणी निलंबित असलेल्या एस. डी. मेणकुदळे यांना कामावर घेण्यावरून दोन गट पडले. तो वाद आता न्यायालयात आहे. 

या साऱ्यात बाजार समितीत शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल यांच्यासाठी सुविधा निर्माण करण्याचे धोरण कुठेच दिसत नाही. शेतकरी निवास, शेतकऱ्यांना स्वस्त जेवण, स्वच्छतागृह, रस्ते, गटारी, रिकाम्या प्लॉटची स्वच्छता, बेदाण्याला नवा बाजार शोधण्यासाठी पुढाकार, हळद बाजारातील अस्थिरतेवर उपाययोजना याबाबत चर्चाच होत नाही.

तीन तालुक्‍यांच्या नव्या वादाची चिन्हे
मिरज, कवठेमहांकाळ, जत या तीन तालुक्‍यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सांगली बाजार समितीच्या निधी वाटपात असमतोल असल्याचा आरोप सुरू झाला आहे. तोट्यातील जतमध्ये जादा निधी आणि सांगली, मिरजेत हात आखडता, अशी कुजबुज पुन्हा एकदा एकू येऊ लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com