पाटणमध्ये गुलाबी थंडीत भविष्याचे वेध

पाटणमध्ये गुलाबी थंडीत भविष्याचे वेध

देसाई-पाटणकरांचा श्रेयवाद, भाजप प्रवेश, राजकीय बैठका, विनयभंग आदी घटना ऐरणीवर

पाटण - वन विभागातील विनयभंग, गटविकास अधिकाऱ्यांना परत बोलवा, देसाई- पाटणकरांचा नेहमीचा श्रेयवाद, पत्रकबाजी, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी गट व गणनिहाय राजकीय बैठका, तारळे विभागातील रामभाऊ लाहोटी व बाळासाहेब जाधव यांचा भाजपत प्रवेश या घटनांमुळे पाटणचे राजकीय व शासकीय वातावरण गुलाबी थंडीत रंग भरू लागले आहे. २०१७ मध्ये घडणाऱ्या संक्रमणाची तालुक्‍यात सुरवात झाली, असे वातावरण आहे.

पाटणचे गटविकास अधिकारी किरण गौतम यांच्या मनमानी कारभाराविरोधात मासिक सभेत वादाला तोंड फुटले. त्यांना जिल्हा परिषदेने माघारी बोलवावे असा ठराव व कर्मचारी आंदोलन चांगलेच गाजले. त्याच दरम्यान जिल्हा सहाय्यक वन संरक्षक विनायक मुळे यांच्यावर वन विभागातील महिला वन रक्षकाने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांना सेवानिवृत्तीला काही दिवस शिल्लक असताना निलंबित व्हावे लागले. पाटण नगरपंचायतीची निवडणूक व पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या श्रेयवादावरून देसाई- पाटणकरांचा प्रसिद्धीपत्रकाचा जुना खेळ ऐकेरीवर आलेला पाहिला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्त व कोयना धरणग्रस्त आंदोलनामुळे तो विधानभवनापर्यंत गेलेला दिसतो. पंचायत समितीच्या आगामी सभापती निवडी होईपर्यंत त्याचा आलेख वाढलेला दिसेल. आरोप-प्रत्यारोपाचा हा केवळ ‘ट्रेलर’च आहे. ‘पिक्‍चर’ अभी बाकी आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. 

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणनिहाय बैठका सुरू झाल्या आहेत. उमेदवार चाचपणी व कार्यकर्त्यांशी संवाद अशा पक्षीय कार्यक्रमाने वातावरण तापू लागले आहे. आमदार शंभूराज देसाई भूमिपूजन व उद्‌घाटनाच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधत आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम हे शिवसेना मेळाव्यांतून प्रथमच तालुक्‍यात फिरत आहेत. 

गेली दोन वर्षे राजकारणात कमी सक्रिय असणारे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व युवक नेते सत्यजितसिंह पाटणकर हे नगरपंचायतीच्या निवडणुकीने ‘चार्ज’ झाल्यामुळे सक्रिय झालेले दिसतात. नगरपंचायतीत सात उमेदवार उभे करण्याचे यज्ञ करणाऱ्या भाजपच्या भरत पाटील ‘टीम’ने धक्कातंत्राचा अवलंब करून पुढील काळात होणाऱ्या राजकीय घडामोडीची झलक आमदार देसाईंच्या दोन शिलेदारांना घेऊन केली आहे. काँग्रेस पक्ष ढेबेवाडीतील गणितात व्यस्त असल्याने सामसूमच पाहावयास मिळत आहे.
देसाई गटाची तारळे विभागातील जोडगोळी पंचायत समिती सदस्य रामभाऊ लाहोटी व कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश करून देसाई गटाला धक्का दिला आहे. अनेक दिवस सुरू असणारी ही देसाई गटांतर्गत लढाई भाजपला बळ देणारी आहे. 
 

सन २०१७ मध्ये घडणाऱ्या घटनांची झलक
तालुक्‍यात घडत असलेल्या या सर्व घडामोडी सन २०१७ या नवीन वर्षात घडणाऱ्या घटनांची झलक असली तरी गुलाबी थंडीत पाटणचे राजकीय व शासकीय वातावरण चांगलेच गतिमान झाल्याचे व भविष्याची चाहूल देणारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com