केवळ सत्तेसाठी अनेकांचे गळ्यात गळे

केवळ सत्तेसाठी अनेकांचे गळ्यात गळे

कोल्हापूर - पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय पक्षांनी सोयीने एकमेकांच्या गळ्यात गळे घातले आहेत. त्याला अपवाद मात्र शिवसेना आहे. शिवसेनेने जिल्ह्यात कोठेही भाजपसोबत जाण्याचे टाळल्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीचे चित्र पंचायत समितीच्या सभापती निवडीच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. 

गटबाजीची काँग्रेसला लागलेली वाळवी पक्ष रसातळाला गेला तरी अद्याप थांबली नसल्याचे हातकणंगले पंचायत समितीच्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. तेथे काँग्रेसच्या कृपेने भाजपला दुसरी पंचायत समिती मिळाली आहे.

राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपने ग्रामीण भागातही पक्ष रुजविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी पहिल्या टप्प्यात उमेदवारांची आयात केली. त्यामध्ये सर्वात अधिक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या गळाला लागले. त्याच्या जोरावर त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविल्या. या निवडणुका लढविताना त्यांनी स्थानिक आघाड्यांबरोबरही युती केली. त्याचाही त्यांना फायदा झाल्यामुळे भाजपच्या कमळ चिन्हावर अनेक उमेदवार निवडून आले. या निवडणुका लढविताना तयार झालेल्या आघाड्या पंचायत समितीच्या सभापती निवडीपर्यंतही टिकल्या नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना यांनी कोणाचीही मदत न घेता स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. भाजपने मात्र जनसुराज्य शक्‍ती, ताराराणी आघाडी, स्थानिक आघाड्या यांच्याशी जुळवून घेत पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना दोन ठिकाणी यश आले. 

या निवडणुकीत प्रत्येक तालुक्‍यात राजकीय पक्षांचे विरोधक वेगवेगळे होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाईल, असे वाटत नव्हते; पण गडहिंग्लजमध्ये हे दोन्ही पक्ष भाजपच्या मागे गेले, तर हातकणंगलेमध्ये त्यांना काँग्रेसच्या उमेदवाराने गैरहजर राहून मदत केली. गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता आली. तेथे त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केले. तीच परिस्थिती हातकणंगलेमध्ये राहिली आहे. या तालुक्‍यात काँग्रेसमध्ये आवळे व आवाडे हे दोन मोठे गट. दोघेही विरोधकांना संपविण्यासाठी एकत्र येण्याऐवजी एकमेकांना संपविण्यासाठी दुसऱ्या पक्षाची मदत घेतात. या पंचायत समितीमध्ये भाजपच्या उमेदवारासाठी एका मताची आवश्‍यकता होती. त्यासाठी काँग्रेसचा सदस्य गैरहजर ठेवला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत आघाडी करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खूप प्रयत्न केले; पण खासदार राजू शेट्टी यांच्या मनात भाजपबद्दल द्वेष निर्माण झाल्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे खासदार शेट्टी स्वतंत्र लढले. त्याचा फटका त्यांना चांगलाच बसला. स्वतंत्र लढल्यामुळे त्यांना आपला बालेकिल्ला असणारा शिरोळ तालुकाही आपल्याकडे राखता आला नाही. तेथे काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन आपला झेंडा फडकाविला. मात्र चंदगड पंचायत समितीमध्ये एकच सदस्य निवडून आला असतानाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सभापती झाला तो भाजपच्या पाठिंब्यावर. या तालुक्‍यात काँग्रेसनेही त्यांना पाठिंबा देत राष्ट्रवादीचेही उट्टे काढले. शिवसेनेनेही दोन पंचायत समित्यांवर भगवा फडकविला आहे. त्यामध्ये शाहूवाडी पंचायत समितीमध्ये शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवत आपला सभापती केला आहे.

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कागल पंचायत समितीवर पहिला भगवा फडकविला. कागलमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मंडलिक - मुश्रीफ गट पुन्हा एकत्र येण्याची सुरवात झाली. दोन्ही गटांच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली असली तरी माजी आमदार संजय घाटगे यांच्या गटाची मात्र यामुळे अडचण होण्याची शक्‍यता आहे.

पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते; पण शिवसैनिकांच्या भावना पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीत स्पष्ट झाल्या. भाजप व शिवसेना यांच्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत टोकाचा संघर्ष निर्माण झाल्याने दोघेही सध्या एकमेकाला पाण्यात पाहत आहेत. त्यामुळे शिवसेनेने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कोठेही युती केली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीने मात्र सत्तेसाठी सोयीच्या ठिकाणी भाजपच्या गळ्यात गळे घातले. त्यामुळे शिवसेनेचे भाजपबाबतचे मत या निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्टपणे दिसून आले आहे.

दादांचा बार पुन्हा फुसका
पालकमंत्री चंद्रकांत पाटील महापालिका निवडणुकीपासून घोषणा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी महापालिकेवर भाजप आघाडीचीच सत्ता येणार, अशी घोषणा केली होती; मात्र ते काही सत्यात उतरू शकले नाही. काल पुन्हा त्यांनी सात पंचायत समित्या भाजपच्या ताब्यात येतील, असे सांगितले होते. प्रत्यक्षात दोनच पंचायत समित्यांमध्ये भाजपचे सभापती झाले, तेसुद्धा काँग्रेसच्या मदतीने. त्यामुळे दादांचा बार पुन्हा एकदा फुसका निघाल्याची चर्चा ग्रामीण भागात आहे.

महिला सबलीकरणाची खऱ्या अर्थाने सुरवात 
पंचायत समिती सभापती निवडीमध्ये भारतीय जनता पक्षाने दोन्ही जागांवर सभापती म्हणून महिलांना संधी देऊन खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणाची कृती अमलात आणली आहे. गडहिंग्लज येथे खुल्या गटातून जयश्री तेली यांना संधी दिली, तर हातकणंगलेमधून रेश्‍मा सनदी यांना इतर मागासवर्गीय महिला गटातून सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली. सौ. तेली व सौ. सनदी यांच्या रूपाने भाजपने आपल्याकडील दोन्ही जागांवर महिलांनाच संधी उपलब्ध करून दिली. दिल्ली ते गल्ली एकच सरकारचा नारा देत महिला सबलीकरणाची अंमलबजावणी या दोन ठिकाणी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com