साताऱ्यामध्ये प्रभाव टाकण्याचा भाजपचा प्रयत्न

साताऱ्यामध्ये प्रभाव टाकण्याचा भाजपचा प्रयत्न

सातारा - पालिका निवडणुकीत सहा नगरसेवक निवडून आणून भाजपने शहरात आजही काही प्रमाणात आपली ताकद असल्याचे सिद्ध केले आहे.

आता भाजपने विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्या रणनीतीचा एक भाग म्हणून की काय, पूर्वाश्रमीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक व बालाजी ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांना चुचकारले आहे. श्री. चोरगे यांना ताकद देऊन भाजपने शहरातील राजकारणावर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार १९९१ च्या पंचवार्षिक निवडणुकीत पालिकेत निवडून गेले होते. त्यानंतर ९६ च्या निवडणुकीत संजय जोशी व रवींद्र शहा हे दोघेच पक्षाचे नगरसेवक झाले. 

उदयनराजेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी नगरसेवक अमित कुलकर्णी यांच्यासारखी मोजकी मंडळी वगळता पालिकेशी संबंधित बहुतांश मंडळी काँग्रेसच्या तंबूत डेरेदाखल झाली. उदयनराजे कोणत्याही पक्षात असले तरी शहर भाजप सातारा विकास आघाडीच्या वळचणीला राहिला. 
पालिका निवडणुकीच्या तोंडावर खासदार उदयनराजे यांनी मनोमिलनाला सुरुंग लावला. भाजपने त्यापूर्वीच पक्षाच्या चिन्हावर लढण्याचे जाहीर केले होते. दोन राजांतील संघर्ष भाजपच्या पथ्यावर पडला. त्याचे फलित सहा जागांवर कमळ फुलले! गत विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार दीपक पवार यांना शहरातून चांगले मताधिक्‍य मिळाले होते. पालिका निवडणुकीतही पक्षाचा आलेख चढता राहिला. त्यामुळे सातारा शहर भाजपच्या अपेक्षा वाढल्या आहेत. निवडक विश्‍वासू सहकाऱ्यांना बरोबर घेऊन बांधकाम व्यावसायिक राजेंद्र चोरगे यांनी साताऱ्यात १९९९ मध्ये बालाजी चॅरिटेबल ट्रस्टची मुहूर्तमेढ रोवली. कैलास स्मशानभूमी प्रकल्पाच्या माध्यमातून ट्रस्टचे नाव सर्वदूर पोचले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून श्री. चोरगे राजकीय गोटातही चर्चेत राहिले.

विविध समाजोपयोगी कामांच्या माध्यमातून बालाजी ट्रस्टने समाजमनावर वेगळा ठसा उमटविला. वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन श्री. चोरगे यांनी लोकशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून २००६ ची पालिका निवडणूक लढविली. सदरबझारमधील शारदा जाधव या एकमेव अधिकृत उमेदवार ‘लोकशक्ती’च्या माध्यमातून पालिकेवर निवडून गेल्या. २०११ च्या पालिका निवडणुकीत ‘लोकशक्ती’ने पॅनेल टाकले नाही. नंतर सुमारे वर्षभर राजेंद्र चोरगे यांच्या डोक्‍यावर ‘आप’ची टोपी दिसत होती. आम आदी पार्टीतून त्यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूकही लढविली. त्यांना मिळालेल्या ८० हजार मतांमध्ये पक्षाचा किती वाटा आहे हे नेमके सांगता येणार नसले, तरी स्वत: चोरगे यांचा सिंहाचा वाटा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ‘आप’ची टोपी फारशी दिसलीच नाही. मनोमीलन नसताना आणि असतानाही श्री. चोरगे स्वत:ची स्वतंत्र प्रतिमा तयार करण्यात आणि जपण्यात यशस्वी ठरले. याच प्रतिमेचा उपयोग शहरात पक्षसंघटन वाढविण्यासाठी भाजपने करून घेण्याचे ठरविलेले दिसते. संघपरिवाराशी जवळीक असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री. चोरगे यांच्याशी केलेली कमराबंद चर्चा भाजपची भविष्यकालीन वाटचाल अधोरेखित करते. अडीच वर्षांनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही भाजपची साखरपेरणी आहे.

‘शत-प्रतिशत’कडे वाटचाल?
राजेंद्र चोरगे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. समविचारी असलेल्या; तथापि स्वतंत्रपणे काम करणाऱ्यांना भाजपच्या प्रवाहात आणण्याच्या पक्षाच्या धोरणाशी हे सुसंगतच आहे. ‘शत-प्रतिशत भाजप’ या एकमेव अजेंड्यावर भाजपची वाटचाल सुरू झाली आहे. सक्षम नेतृत्वाअभावी क्षीण झालेली शिवसेना आणि व्यक्तीकेंद्रित झालेल्या दोन्ही काँग्रेस यातून काय बोध घेतात, हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com