सर्व जागा जिंकण्यास राष्ट्रवादी सज्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

ज्येष्ठ नेते यशंवतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या विचारांचा बालेकिल्ला असलेल्या कऱ्हाड उत्तरमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिंकण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारानुसार आमच्या पक्षाचे काम उत्तर मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या स्थापनेपासून कऱ्हाड उत्तर हा बालेकिल्ला राहिला आहे. तो किल्ला अभेद्य राखण्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील जो उमेदवार देतील त्यांच्या पाठीशी सर्व कार्यकर्ते ठामपणे उभे राहून सर्व उमेदवार निवडून आणतील, असा विश्‍वास आहे. आमदार श्री.

ज्येष्ठ नेते यशंवतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या विचारांचा बालेकिल्ला असलेल्या कऱ्हाड उत्तरमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिंकण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारानुसार आमच्या पक्षाचे काम उत्तर मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या स्थापनेपासून कऱ्हाड उत्तर हा बालेकिल्ला राहिला आहे. तो किल्ला अभेद्य राखण्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील जो उमेदवार देतील त्यांच्या पाठीशी सर्व कार्यकर्ते ठामपणे उभे राहून सर्व उमेदवार निवडून आणतील, असा विश्‍वास आहे. आमदार श्री. पाटील यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या विकास निधीतून कऱ्हाड उत्तर मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांची जाण आमदार श्री. पाटील यांना असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्‍नांची सोडवणूक झाली आहे. उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आरफळ कालव्याच्या पाण्याची आवश्‍यकता होती. आमदार श्री. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करून पाणी सोडण्यास भाग पाडले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला होता. लोकांच्या जगण्याशी संबंधित प्रश्‍न आम्ही सोडवले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांतील आमच्या पक्षाचे आणि नेत्यांचे स्थान कायम आहे. मागीलवेळी पंचायत समितीची एक जागा आमची गेली. मागच्या वेळी झालेली चुकीची सुधारणा करून यावेळी पूर्ण ताकदीनिशी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी आम्ही तयारी केली आहे.

- मानसिंगराव जगदाळे, तालुकाध्यक्ष,  राष्ट्रवादी काँग्रेस
 

काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी  

कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हाच आमचा प्रमुख विरोधी आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीत त्यांच्याशी आमची लढत होईल. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात झालेल्या विकासाकामांमुळे उत्तरेतील मतदार काँग्रेसला निश्‍चितपणे निवडून देतील असा विश्‍वास आहे. 

कऱ्हाड उत्तरमध्ये काँग्रेसने स्वबळावर संपूर्ण जागा लढविण्याची तयारी पूर्ण केली आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांत काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी मागणी आहे. राष्ट्रवादीकडून उसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक, भाजपने केलेली नोटाबंदी आदींसह अनेक मुेद्द घेऊन आम्ही मतदारांसमोर जाऊ. प्रामुख्याने आमदार चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी मतदारसंघात केलेली कामे लोकांच्या डोळ्यासमोर आहेत. त्यात बनवडी, ओगलेवाडी रस्त्याचे चौपदरीकरण, पार्लेत मागासवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थिनीसाठी वसतिगृह, ओगलेवाडीत उभारले जाणारे भूकंप संशोधन केंद्र, साखळी बंधाऱ्यांच्या माध्यमातून पांचुद, मेरवेवाडी, किवळ, शामगाव आदी भागांत पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचा केलेला प्रयत्न लोकांनी पाहिला आहे. मतदारसंघाला विकासापासून वंचित ठेवलेल्या भागाला आमदार चव्हाण यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तरेतील किवळनजीकच्या खोडजाईवाडीत पाण्याचा प्रश्‍न गंभीर होता. तेथे २५० ते ३०० टन उसाचे उत्पादन होते. मात्र, साखळी बंधाऱ्यामुळे आज तेथील परिस्थिती बदलली आहे. तेथे आज अडीच हजार टन उसाचे उत्पादन झाले असून, शेतकरी भाजीपाला, दुग्ध व्यवसायामुळे सधन बनल्याचे उदाहरण आहे. आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना दिलेल्या विकासकामांना राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असणाऱ्या ग्रामपंचायतींनी कशाप्रकारे अडचणी निर्माण करत विकासाला आडकाठी केली, हे निवडणुकीच्या निमित्ताने लोकांसमोर आणले जाईल. 

- अविनाश नलवडे, तालुकाध्यक्ष,  काँग्रेस

शिवसेना विकासासाठी लढणार

देश, राज्य व जिल्ह्यात यापूर्वी दोन्ही काँगेसकडे सत्ता राहिली आहे. मात्र, दोन्ही काँग्रेसने कऱ्हाड उत्तरच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. सध्या देशात व राज्याच्या सत्तेत असणारी शिवसेना कऱ्हाड उत्तरच्या विकासासाठी कटिबद्ध असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवेल. युतीबाबातचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असून, सध्यातरी शिवसेनेची तयारी स्वबळावर आहे. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण सामोरे ठेवून शिवसेना या निवडणुकीत उतरणार आहे. शिवसेनेची राज्यात सत्ता असताना १९९६ मध्ये मंजुरी मिळालेली हणबरवाडी - धनगरवाडी योजना २०१९ पर्यंत शिवसेनाच पूर्ण करेल.

विद्यामन लोकप्रतिनिधींकडून सामान्यांची होणार अडवणूक दूर करण्याचे काम शिवसेना करणार आहे. पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे- पाटील व जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या माध्यमातून कऱ्हाड उत्तरमधील विकासकामांसाठी शिवसेना कटिबद्ध आहे. स्मशानभूमी नसणाऱ्या गावांना ती उपलब्ध करून देण्याचा प्रामुख्याने प्रयत्न आहे. मसूर पूर्वचा पिण्याच्या पाण्यापासून वंचित असणारा भाग यासह मतदारसंघातील प्रश्‍न घेऊन व ते सोडविण्याचा ठोस आराखडा घेऊन मतदारांसमोर जाऊ. मसूरपूर्व भागात अनेक गावांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात टॅंकरचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी शिवसेना आराखडा तयार करून तेथील पिण्याचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी निकाली काढेल, आदी मुद्दे प्रचारात घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे. उत्तेरत शिवसेनेने नेत्र चिकित्सा, रक्तदान शिबिरासह विद्यार्थ्यांसाठी केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन याबाबीही मतदारांसमोर ठेवू. त्यामुळे मतदार निश्‍चितच शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम राहतील, असा विश्‍वास आहे. 

- विनायक भोसले शिवसेना, तालुकाप्रमुख

भाजप प्रथमच चिन्हावर रिंगणात

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष कऱ्हाड उत्तरमध्ये पहिल्यांदाच पक्षाच्या चिन्हावर लढवणार आहेत. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, प्रदेश चिटणीस अतुल भोसले,  जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्यासह पक्षाच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कऱ्हाड उत्तरमध्ये आम्ही स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेल्या सर्वमान्यांच्या हिताच्या निर्णर्यामुळे आणि पारदर्शक कारभारामुळे राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. त्यामुळे ग्रामीण भागातही आमच्या पक्षाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फायदा यावेळी आम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी निश्‍चित होईल. आमच्या पक्षाची शिवसेनेबरोबर युती करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल. त्या निर्णयानुसार आम्ही पुढील वाटचाल करू. सध्या प्रत्येक गट व गणात आमचे सक्षम उमेदवार आहेत. अनेकांनी पक्षाकडे गट व गणासाठी उमेदवारीची मागणी केली आहे. अनेक गावचे सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाची ताकद कऱ्हाड उत्तर मतदारसंघामध्ये वाढली आहे. त्यामुळे आमचे उमेदवार विजयी होतील, अशी आम्हाला खात्री आहे. सध्या पाल, उंब्रज, कोपर्डे हवेली गटामध्ये भाजपला चांगले वातावरण आहे. उर्वरित गट व गणांतही अनेकजण आमच्या पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. जनतेच्या सेवेसाठी कऱ्हाड उत्तरमध्ये भाजप प्रभावीपणे काम करेल, त्यासाठी मतदारही आमच्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणतील.  

- सूर्यकांत पडवळ, तालुकाध्यक्ष, , भाजप

Web Title: politics in satara zp