सभापती निवडींत आमदारकीची गणिते

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

शेखर गोरेंमुळे गेली पोळांची संधी; मानसिंगरावांचाही पत्ता कट 
सातारा - अध्यक्ष, उपाध्यक्षपदांच्या निवडीत खासदारकीची गणिते जुळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने सभापती निवडीतही आमदारकीची गणिते जुळविली. पाटण, माण मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार नसल्याने तेथे संधी दिली. या निवडीवर पक्षाचे नेते अजित पवार यांचा छाप राहिली असली, तरी त्यात आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील हेच ‘डिसिजन मेकर’ ठरले. मात्र, गॉडफादर नसल्याने पोळ कुटुंबीयांना निवडीत डावलले गेले. 

शेखर गोरेंमुळे गेली पोळांची संधी; मानसिंगरावांचाही पत्ता कट 
सातारा - अध्यक्ष, उपाध्यक्षपदांच्या निवडीत खासदारकीची गणिते जुळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने सभापती निवडीतही आमदारकीची गणिते जुळविली. पाटण, माण मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार नसल्याने तेथे संधी दिली. या निवडीवर पक्षाचे नेते अजित पवार यांचा छाप राहिली असली, तरी त्यात आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील हेच ‘डिसिजन मेकर’ ठरले. मात्र, गॉडफादर नसल्याने पोळ कुटुंबीयांना निवडीत डावलले गेले. 

अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी डावल्याने सभापतिपदाची तरी संधी मिळावी, असा आग्रह इच्छुकांनी धरल्याने सभापती निवडीसाठी चुरस वाढली. पाटणचे राजेश पवार, खंडाळ्याचे मनोज पवार, औंधचे शिवाजी सर्वगोड यांची निवड अपेक्षित झाली असली, तरी माजी आमदार (कै.) सदाशिवराव पोळ यांच्या स्नुषा डॉ. भारती पोळ यांचा पत्ता कट झाला. पाटण व माण
तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नसल्याने तेथे बळ देण्यासाठी म्हावशी गट (ता. पाटण) व औंध (ता. खटाव) गटाला अनुक्रमे शिक्षण, समाजकल्याण सभापतिपदाची संधी देत पुढील विधानसभा निवडणुकीची गणिते जुळविण्यात आली. मात्र, एकंदरीत या निवडींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याबरोबरीने शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील यांचे वर्चस्व असल्याचे सिद्ध केले. 

उपाध्यक्षपदासाठी डावलल्याने माजी आमदार विक्रमसिंह पाटणकरांनी लावलेला जोर सर्वाधिक प्रभावी ठरला. सकाळी दहा वाजण्यापूर्वीच त्यांनी अध्यक्षांच्या निवासस्थानी तळ ठोकला होता. त्यापाठोपाठ आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, शेखर गोरे यांनी हजेरी लावली. ‘बळी तो कान पिळी’ या म्हणीप्रमाणे राष्ट्रवादीतही समीकरणे बदलली जातात, हे मानसिंगराव जगदाळे यांना डावलल्याने खरे ठरले.

भारती पोळ यांना महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी सर्वाधिक संधी दिली जाणार, अशी शक्‍यता होती. मात्र, शेखर गोरे यांनी आंधळी (ता. माण) गटातील बाबासाहेब पवार यांनाच पद देण्याचा आग्रह धरला. याचा दुसरा अर्थ पोळ कुटुंबाला नको, असाच राष्ट्रवादीने घेतला. थेट शरद पवार यांच्या भेटीगाठी घेऊन शब्द मिळविलेल्या मनोज पोळ यांचा मात्र पुरता भ्रमनिरास झाला. 

पदावर येण्यासाठी ‘गॉडफादर’ असावा लागतो, हेही आजच्या निवडीने पुढे आले. राजेश पवार हे श्री. पाटणकरांचे अत्यंत निकटवर्तीय असल्याने त्यांना संधी मिळाली. मात्र, डॉ. पोळ यांचे नावच कोणी पुढे न केल्याने सर्वाधिक चर्चेत असलेले नाव रिंगणातून बाहेर पडले. याचा फायदा थेट कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पाटखळ गटाच्या सदस्या वनिता गोरे यांना झाला. या निवडीतून विधानसभा निवडणुकीची गणिते जुळविली असली, तरी त्याचा निश्‍चित किती फायदा होईल, हे येणारा काळ सांगेल. 

मानसिंगराव... पुन्हा लढू
उपाध्यक्षपदासाठी आग्रही मानसिंगराव जगदाळेंच्या पदरी आताही निराशाच पडली. त्यामुळे नाराज झालेले मानसिंगराव पत्ता कट झाल्याचे समजताच अध्यक्षांच्या निवासस्थानातून थेट बाहेर पडण्याच्या मार्गावर होते. त्यांचे डोळे डबडबले होते. अध्यक्ष संजीवराजेंनी त्यांचा हात धरला. त्या वेळी मानसिंगरावांनीही ‘मी आता जातो,’ असे सांगितले. त्यावर संजीवराजेंनी ‘अहो चला, नका जाऊ,’ असे बोलत बैठकीत नेले. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपली नाही.

Web Title: politics in satara zp chairman selection