संजीवराजे, वसंतराव, की मानसिंगराव?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

अध्यक्षपदासाठी वाट बारामतीच्या खलित्याची; उपाध्यक्षपदाबाबतही उत्सुकता

अध्यक्षपदासाठी वाट बारामतीच्या खलित्याची; उपाध्यक्षपदाबाबतही उत्सुकता
सातारा - राष्ट्रवादीच्या आज झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी संजीवराजे नाईक-निंबाळकर, मानसिंगराव जगदाळे, वसंतराव मानकुमरे यांची, तर उपाध्यक्षपदासाठी राजेश पवार, सुरेंद्र गुदगे यांची नावे निश्‍चित करण्यात आली आहेत. अध्यक्षपदासाठी संजीवराजेंच्या नावाचीच जास्त चर्चा असली, तरी उद्या (मंगळवारी) सकाळी दहा वाजता बारामतीहून येणाऱ्या खलित्यात दोघे भाग्यवंत कोण, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे इच्छुकांत अस्वस्थता वाढली आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्षपदांसाठी इच्छुक सदस्यांतून नावे निश्‍चित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी आज राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, प्रदेशचे पक्षप्रतोद शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव पाटील, विक्रमसिंह पाटणकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, नरेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, शेखर गोरे, राजेश पाटील-वाठारकर, बाळासाहेब भिलारे तसेच पदासाठी इच्छुकांसह जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

श्री. रामराजे कालपासून येथे मुक्कामी होते. सकाळी दहा वाजता शशिकांत शिंदे व रामराजेंनी सुमारे तासभर कमराबंद चर्चा केली. यानंतर रामराजे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला निघून गेले. यानंतर जावळीचे वसंतराव मानकुमरे, जयवंत भोसले हे आमदार शशिकांत शिंदेंसोबत विश्रामगृहात उपस्थित होते. दुपारी शेखर गोरे आपल्या समर्थकांसह तेथे आले. आमदार शिंदेंसोबत त्यांनी कमराबंद चर्चा केली. यामध्ये त्यांनी माण तालुक्‍याला पद मिळावे, अशी आग्रही मागणी केली. आमदार शिंदेंनी त्यांना रामराजेंसमोर भूमिका मांडा, असे सांगितले. याच दरम्यान अध्यक्षांच्या निवासस्थानी इच्छुकांसह इतर सदस्यही उपस्थित होते. सर्व आमदार आल्यावर एकत्र बैठक झाली. बैठकीत प्रमुख नेत्यांनी भूमिका मांडली. त्यानंतर सदस्यांची भूमिका ऐकून घेण्यात आली.

त्यानंतर अध्यक्षपदासाठी संजीवराजे, मानसिंगराव जगदाळे, वसंतराव मानकुमरे या तिघांची नावे अंतिम करण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी पाटणचे राजेश पवार आणि सुरेंद्र गुदगे यांची नावे निश्‍चित केली. या नावांवर आज रात्री पुन्हा सर्व आमदार व विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर एकत्रित बसून चर्चा करणार आहेत. त्यातून दोघांची नावे बारामतीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळविणार आहेत. उद्या (मंगळवारी) सकाळी दहा वाजता यापैकी कोणाचे नाव निश्‍चित करायचे, याचा खलिता बारामतीहून येईल. त्यांचीच बिनविरोध निवड करण्यावर राष्ट्रवादीचा भर राहणार आहे. मागील वेळी झालेला दगाफटका लक्षात घेऊन पक्षाने सर्वांना आजच व्हिप बजावला आहे.

'...म्हणून हवे माण-खटावला स्थान'
शासकीय विश्रामगृहात आमदार शशिकांत शिंदे आणि शेखर गोरे व त्यांच्या समर्थकांची कमराबंद बैठक झाली. यामध्ये शेखर गोरेंनी परखडपणे भूमिका मांडली. ते म्हणाले, 'आम्ही तुमच्या सर्वांच्या सूचनेनुसार माणमध्ये जयकुमार गोरेंचे राजकीय जीवन संपविले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत माण-खटावला स्थान मिळालेच पाहिजे.''