काळानेच घेतला राजकीय सूड

काळानेच घेतला राजकीय सूड

कोल्हापूर - २०११ मध्ये, ११ जानेवारीला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आवारात राजकीय थरार ठरणारा एक प्रसंग घडला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे व त्यांचे चिरंजीव प्रकाश आवाडे हतबल होऊन काँग्रेस कमिटीच्या आवारात उभे होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे समर्थक त्या दोन ज्येष्ठ नेत्यांना वाट्टेल ते बोलत होते. ‘पहिल्यांदा येथून बाहेर जायचं’ म्हणून सुनावत होते. उद्रेकाने सीमा गाठली होती आणि त्या उद्रेकात आवाडेंचा राहुल गाठ हा कार्यकर्ता सापडला. त्याचे कपडे फाडून त्याला मारण्यात आले.आवाडे आणि त्यांच्या समर्थकांना अशा पद्धतीने काँग्रेस कमिटीतून हाकलून काढले गेले. त्या वेळपासून आवाडे तसे राजकीय विजनवासातच गेले.

पण एखाद्या प्रसंगात काळ हाच कसे उत्तर ठरतो, याची प्रचिती आज आली. ज्या आवाडेंना काँग्रेस कमिटीतून हाकलून दिले होते, त्याच आवाडेंच्या घरी जाऊन हातापाया पडायची वेळ काँग्रेसवर आली. आवाडे ज्या बाजूला, त्या बाजूचा अध्यक्ष हे निश्‍चित असल्याने आवाडे दादा, आवाडे अण्णांची मनधरणी सुरू झाली; पण २०११ मध्ये काँग्रेस कमिटीच्या आवारात दादा, अण्णांना झालेली जखम अजून खदखदत होती. त्याची बरोबर परतफेड आवाडेंनी केली आणि पी. एन. पाटील यांच्या मुलाचे संभाव्य अध्यक्षपद सोडाच; पण काँग्रेसच्या हातातलं अध्यक्षपद घालवून दाखवण्याची राजकीय किमया त्यांनी केली. काळच एखाद्यावर राजकीय सूड कसा आणू शकतो, याची प्रचिती त्यांनी पी. एन. पाटील व विशेषतः त्यांच्या काही समर्थकांना दाखवून दिली.

या निवडणुकीत भाजपची जिल्हा परिषदेवर सत्ता जरूर आली. या निमित्ताने महादेवराव महाडिक यांनी आपला ठेवणीतला डाव जरूर दाखवला; पण या साऱ्या घडामोडीत इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले इथल्या राजकारणाचा प्रभावच अधिक दिसला. पी. एन. व आवाडे यांच्यातील धगधगते राजकीय वैर या निमित्ताने उफाळून आले. एक वेळ इतर दोन पक्षांतून फिरून आलेल्या संजय घाटगेंना काँग्रेस अध्यक्ष करेन पण आवाडेंना काँग्रेस कमिटीत येऊ देणार नाही, हा पी. एन. पाटील यांनी निर्धार केला. आवाडे ऐन निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात अंतर्गत खेळी करून आपल्या विरोधकांना मदत करतात, असा पी. एन. पाटील यांच्याकडून आवाडे यांच्यावर थेट आरोप केला जात होता. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर आवाडे समर्थक विलास गाताडे यांना उपाध्यक्षपदाची संधी न देता अप्पी पाटलांना देऊन हा वाद पी. एन. पाटील यांनी आणखी जिवंत ठेवला. या शिवाय या जिल्हा परिषद निवडणुकीत कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नातू राहुल आवाडे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू नये म्हणून प्रयत्न केला. त्यामुळे राहुलऐवजी दुसऱ्याला उमेदवारी मिळाली. त्यांची डिपॉझिट जप्त झाली. पण जिल्हा परिषदेत एकूण बहुमताची आकडेवारी काठावर आली आणि आवाडेंच्या दोन मतासाठी इचलकरंजी वारी करायची वेळ काँग्रेसच्या नेत्यांवर आली. पी. एन. पाटील यांचा मुलगा राहुल अध्यक्षपदाचा उमेदवार असेल तर त्याला आवाडे मतदान करतील, हे केवळ अशक्‍य होते. पण त्यांना अपेक्षित धरून बहुमताचा ३५ आकडा फुगवून तयार करण्यात येत होता. हा आकडा नक्की फसवा होता. पण मुद्दाम पुन्हा पुन्हा मांडला जात होता.

फार न बोलता खेळी
आवाडे यांच्या घरी काँग्रेसचे नेते गेले म्हणजे त्यांनी पाठिंबा दिला, असा संदेश पसरवला जात होता. पण आवाडे दादांसारख्या ज्येष्ठ नेत्याने फार न बोलता खेळी केली आणि राजकीय सूड कसा असतो याची प्रचितीच काळाने पी. एन. पाटील यांना दाखवून दिली. मात्र राजकारणात अगदी नवा कोरा असणारा त्यांचा मुलगा राहुल पाटील याच्या हाता-तोंडाशी आलेली अध्यक्षपदाची संधी मात्र निसटून गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com