पोळतात्यांच्या दोन्ही सुना रिंगणात 

विशाल गुंजवटे - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

बिजवडी - माण तालुक्‍यात एकेकाळी एकहाती सत्ता गाजवणारे माजी आमदार (कै.) सदाशिव पोळ (तात्या) यांच्या डॉ. भारती संदीप पोळ व सोनाली मनोजकुमार पोळ या दोन्ही सुना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. या दोघींबरोबरच त्यांचे "श्री'ही विजयासाठी कामाला लागल्याचे दिसून येते. 

बिजवडी - माण तालुक्‍यात एकेकाळी एकहाती सत्ता गाजवणारे माजी आमदार (कै.) सदाशिव पोळ (तात्या) यांच्या डॉ. भारती संदीप पोळ व सोनाली मनोजकुमार पोळ या दोन्ही सुना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. या दोघींबरोबरच त्यांचे "श्री'ही विजयासाठी कामाला लागल्याचे दिसून येते. 

माण तालुक्‍यात किंगमेकरची भूमिका बजावत पोळतात्यांनी राष्ट्रवादीला उभारी देण्याबरोबरच जिल्ह्यातील राजकारणात तालुक्‍याचे चांगले वजन निर्माण केले. तात्यांनी आजपर्यंत अनेकांना आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बॅंकेत विविध पदे मिळवून देताना किंगमेकरची भूमिका बजावली. मात्र, अनेक निवडणुकांत आपल्या घरातील वारसदारांना त्यांनी उमेदवारी न देता पक्षाचा विचार करून पक्षातील इतर कार्यकर्त्यांना संधी देत पक्षसंघटना मजबूत करण्याचे कार्य केले. 

तात्यांच्या निधनानंतर तालुक्‍यात पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती पोकळी भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेमंडळी नेतृत्वाच्या शोधात असताना तात्यांच्या वारसदारांपैकी कोणाकडे नेतृत्व द्यायचे, यावर अनेकदा चर्चा झाली. मात्र, तालुक्‍यात राष्ट्रवादीची चाललेली वाताहात थांबवून पक्षाला उभारी देण्यासाठी सर्व बाजूने सक्षम अशा नेतृत्वाची गरज असल्याने तात्यांनंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व शेखर गोरेंच्याकडे सोपवण्यात आले. त्यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले. निवडणुका मोठ्या ताकदीने लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. गट व गणांच्या निवडणुकीत तात्यांचे वारसदार डॉ. संदीप पोळ यांच्या पत्नी डॉ. भारती यांना गोंदवले गटातून, तर मनोजकुमार पोळ यांच्या पत्नी सोनाली यांना मार्डी गणातून उमेदवारी देण्यात आली आहे. 

शेखर गोरे यांनीही पोळतात्यांच्या आचार, विचारांचा वारसा जपत पक्षसंघटना बळकट करण्याकडे लक्ष दिले. बरोबर आलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता राष्ट्रवादीतील जुन्या नेतेमंडळींना विश्वासात घेऊन बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीच्या कट्टर कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिल्या आहेत. त्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे, कुमार मगर, बाबासाहेब पवार, तानाजी मगर, रमेश पाटोळे, पिंटू जगताप यांच्या मातोश्री, पोळतात्यांच्या दोन्ही सुना आदींचा समावेश आहे. 

लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष 
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रचारात आता खरी रंगत आली असून सर्वच गटांतील लढती संघर्षपूर्ण व लक्षवेधी होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तरीही (कै.) सदाशिवराव पोळ यांच्या दोन्ही सुनांच्या गटातील निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहील.